
हैदराबादमधील युवतीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आल्यानंतर देशभर या घटनेची चर्चा होत आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर पोलिसांनी याबाबत वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी मोफत परिवहन योजना सुरु केली आहे. जर एखादी महिला एकटी असेल आणि तिला रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत घरी जाण्यासाठी वाहन मिळत नसेल तर ती पोलिसांना 1091 आणि 7837018555 या क्रमांकावर फोन करुन वाहनासाठी विनंती करु शकते. ते 24×7 काम करतील. नियंत्रण कक्ष वाहन किंवा सीआर वाहन / एसएचओ वाहन या महिलेला सुरक्षितरित्या पोहचवेल. ही सेवा मोफत आहे. हा संदेश आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अशी माहिती बौद्ध चैत्तन्य मैत्रिय यांनी आपला नागपुर या पेजवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
नागपूर पोलिसांनी महिलांनी खरोखरच काय उपाय केले आहेत का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही नागपूर पोलिसांच्या संकेतस्थळाला भेट दिली त्याठिकाणी आम्हाला आपातकालीन क्रमांक दिसून आले. मात्र हे क्रमांक पोस्टमध्ये दिलेल्या क्रमांकापेक्षा वेगळे असल्याचे दिसून आले. नागपूर पोलिसांच्या संकेतस्थळावर दिलेले क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
नागपूर पोलिसांचे संकेतस्थळ / Archive
नागपूर पोलिसांच्या ट्विटर खात्यावरही आम्हाला खालील ट्विट दिसून आले.
त्यानंतर दैनिक लोकमतच्या संकेतस्थळावर दिनांक 4 डिसेंबर 2019 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात म्हटले आहे की, हैदराबादमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अभिनव पाऊल उचलले आहे. शहरातील कुठल्याही भागात रात्री 9 नंतर एकट्या महिलेला घरी जाण्यासाठी वाहतूकीचे साधन मिळत नसेल तर पोलीस नियंत्रण कक्षातील 100 नंबर अथवा 0712-2561222 या क्रमांकावर संपर्क साधायचा आणि माहिती द्यायची आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, नागपूर पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी असा उपक्रम हाती घेतला आहे. समाजमाध्यमात मात्र याबाबत चुकीचा क्रमांक पसरत असल्याचे दिसून येत आहे. योग्य क्रमांक 7122561222 असा आहे.
नागपूर पोलिसांनी योग्य क्रमांक सांगितल्याने प्रश्न होता की, मग 837018555 हा क्रमाक कुठला आहे. त्यामुळे आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला त्यावेळी आम्हाला हिंदूस्तान टाईम्सच्या संकेतस्थळावर एक डिसेंबर 2019 रोजी प्रसिध्द झालेले खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात म्हटले आहे की, लुधियाना पोलिसांनी रात्रीच्या वेळी महिलांसाठी मोफत पिक-अप आणि ड्रॉप सुविधा सुरु केली आहे. लुधियानाचे पोलीस आयुक्त राकेश अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही महिलेला घरी जाण्यासाठी वाहन मिळत नसल्यास ती रात्री 10 ते सकाळी सहा वाजेपर्यंत 112, 1091 आणि 7837018555 या क्रमांकावर संपर्क करु शकते. ही सुविधा रोज उपलब्ध असणार आहे.
या माहितीतून हे स्पष्ट झाले की, 7837018555 हा क्रमांक नागपूर पोलिसांचा नसून लुधियाना पोलिसांचा आहे.
निष्कर्ष
नागपूर पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी सुरु केलेला क्रमांक हा 7122561222 असा आहे. 7837018555 हा क्रमांक नागपूर पोलिसांचा नसून लुधियाना पोलिसांचा आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट अर्धसत्य आढळली आहे.

Title:Fact : नागपूर पोलिसांच्या उपक्रमाचा चुकीचा क्रमांक व्हायरल
Fact Check By: Ajinkya KhadseResult: Partly False
