
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताच उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम अमित देशमुख यांना 4.7 कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. दोन हाणा पण पुढारी म्हणा या पेजवरील पोस्टमध्ये म्हटलेय की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सुरुवात केली पण आहे, सगळ्यात पहिला नंबर लागला महाराष्ट्राचे सगळ्यात गरीब शेतकरी, आदर्श घोटाळा करणाऱ्यांचे अतिशय गरीब पुत्र अमित राव देशमुख ह्यांचे 4 करोड रुपये कर्ज माफ केले आहे. साहेब धन्यवाद. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेनेने फडणवीस ह्यांना सोडले.”
फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली नाही. मग रितेश व अमित देशमुख यांना कर्जमाफी कशी मिळाली?
सदरील व्हायरल पोस्टमधील फोटोमध्ये सातबारा दिलेला आहे. त्यानुसार, अमित व रितेश देशमुख यांच्या शेतजमिनीवर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 4 कोटी 70 लाख रुपयांचा कर्जाचा बोजा दाखविण्यात आलेला आहे. यावरून दावा केला जातोय की, त्यांना 4.7 कोटींची कर्जमाफी मिळाली.
सातबाऱ्याचे नीट निरीक्षण केल्यावर दिसते की, बोजाची नोंद कंसात दिली असून समोर (1326) क्रमांक दिला आहे सात-बारावर एखादी नोंद कंसात दिलेली असेल तर ती रद्द समजण्यात येते. सातबारा संगणकीकरणाचे काम पाहणारे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत संपर्क साधल्यावर त्यांनी याला दुजोरा दिला. या बाबतचे वृत्त सरकारनामा या संकेतस्थळानेही दिले आहे. ते आपण खाली पाहू शकता.
सरकारनामा संकेतस्थळावरील सविस्तर वृत्त / Archive
अमित आणि रितेश देशमुख यांच्या या जमिनीचे प्रकरण नेमके आहे तरी काय याबाबत दैनिक लोकसत्ताने 17 जुलै 2019 रोजी वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तात आदिती आणि रितेश देशमुख यांनी कर्ज उचलले नसल्याचे आणि अन्य कर्जाची परतफेड 2016 मध्येच करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यावेळच्या नियमानुसार जेवढे कर्ज घेतले त्याच्या तिप्पट बोजा चढविण्यात आल्याचेही यात म्हटले आहे. तो बोजा कमी करुन न घेतल्याने तो तसाच राहिला आणि देशमुख यांची समाजमाध्यमातून बदनामी झाल्याचेही या वृत्तात म्हटलेले आहे.
रितेश देशमुख यांनी ट्विटरवरून देखील याबाबत खुलासा केला की, हे सोशल मीडियावरील दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, मुख्यमंत्री होताच उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांना कर्जमाफी दिलेली नाही. सातबाऱ्याच्या प्रतिचा चुकीचा अर्थ काढून देशमुख कुटुंबाला 4.7 कोटींची माफी दिल्याचे पसरविले जात आहे.

Title:Fact Check: अमित देशमुख, रितेश देशमुख यांना 4.7 कोटींची कर्जमाफी मिळाली का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
