खाद्यपदार्थांमधील भेसळ हा गंभीर मुद्दा आहे. बंद पाकिटातील खाद्यपदार्थदेखील सुरक्षित नसल्याचे अधुनमधून सांगितले जाते. अशाच एका व्हिडियोमध्ये दावा करण्यात येतोय की, लुप्पो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्या असून, त्यामुळे लहान मुलांना पक्षाघात (पॅरालिसिस) होऊ शकतो. सोशल मीडियावर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

50 सेंकदाच्या या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती लुप्पो केकचे पॅकेट उघडून त्यात पांढऱ्या रंगाच्या दोन छोट्या गोळ्या असल्याचे दाखवतो. सोबत लिहिले की, सर्वांना सूचित करण्यात येते की लुपो या कंपनीचे केक मार्केटमध्ये विक्रीस आले आहेत. त्यात सॉफ्ट टॅबलेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुलांना पॅरालिसिस होत आहे. त्यामुळे कुणीही आपल्या मुलांना असे केक खाण्यासाठी देऊ नयेत ही विनंती.

हा व्हिडियो खाली पाहू शकता.

मूळ व्हिडियो येथे पाहू शकता – फेसबुक

तथ्य पडताळणी

गुगलवर यासंबंधी शोध घेतला असता कळाले की, हा व्हिडियो जगभरात व्हायरल होत आहे. याहू न्यूज (युके) वेबसाईटच्या बातमीनुसार, हा व्हिडियोमध्ये करण्यात आलेल्या दाव्याला कोणताही आधार नाही. लुप्पो केक तुर्कस्तानमध्ये तयार होतात. बातमीत फ्रान्स ऑब्जर्व्ह, तेयीत आणि स्नोप्स वेबसाईटने केलेल्या पडताळणीची माहिती दिलेली आहे.

तेयीत वेबसाईटनुसार, हा व्हिडियो सर्वप्रथम 28 ऑक्टोबर 2019 रोजी युट्यूबवर शेयर करण्यात आला होता. व्हिडियोच्या 45 सेंकदाला इरकी-कुर्दिस्तान भागात बोलली जाणारी सोरानी बोलीभाषा ऐकू येते. तसेच खाली फ्रीजमध्ये Ace Aspiliç कंपनीचे उत्पादनही दिसते. हे उत्पादन तुर्कस्तानातून इराकमध्ये निर्यात केले जाते. यावरून हा व्हिडियो इराक-कुर्दिस्तान भागातील असण्याची अधिक शक्यता आहे.

व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर दिसते की, केक वेष्टणाच्या बाहेर काढल्यावर त्यात दोन छिद्र दिसतात. त्यामुळे केकमध्ये नंतर गोळ्या टाकल्याची शक्यता आहे. फ्रान्स 24 वेबसाईटनुसार, हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर कुर्दिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने याची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आरोग्य अधिकाऱ्यांनी लुप्पो केकची जागोजागी तपासणी केली. या तपासणीचा व्हिडियोदेखील फेसबुकवर शेयर करण्यात आला होता. लुप्पो केकमध्ये कोणतीही गोळी आढळून आली नाही.

मूळ व्हिडियो येथे पाहा - फेसबुक

लुप्पो केक भारतात उपलब्ध नाही

स्नोप्स वेबसाईटनुसार, तुर्कस्तानमधील शोलॅन कंपनीतर्फे लुप्पो केक तयार करण्यात येतात. हे उत्पादन केवळ इराकमध्ये विक्री केले जाते. भारतात हे उत्पादन उपलब्ध नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. तसेच अशा गोळ्यांनी पक्षाघाताचा धोका संभवत नाही. त्यामुळे हा दावादेखील निराधार आहे.

शोलॅन कंपनीशी जेव्हा फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला असता कंपनीने ईमेलद्वारे उत्तर दिले की, हा व्हिडियो पूर्णतः चुकीचा आहे. कंपनीतर्फे आंतरराष्ट्रीय नियम व अटींनुसारच अन्न सुरक्षा व स्वच्छतेची काळजी घेतली जाते. हा व्हिडियो कंपनीला बदनाम करणाच्या उद्देशाने फिरवला जात आहे. आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही वाचकांपर्यंत ही खरी बातमी देऊ इच्छितो.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, लुप्पो केकमध्ये मुलांना पॅरालिसिस करणाऱ्या गोळ्या सापडलेल्या नाहीत. कोणीतरी खोडसाळपणे हा व्हिडियो तयार केला होता. तसेच हे उत्पादन भारतात मिळत नाही. ते केवळ इराकमध्ये विक्रीस आहे. त्यामुळे भारतात याविषयी काळजी करण्याची गरज नाही.

Avatar

Title:FACT CHECK: लुप्पो कंपनीचे केक खाल्ल्याने मुलांना पॅरालिसिस होण्याचा धोका असतो का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False