नुकतेच भारताने 75 वा स्वातंत्र्या दिन साजरा केला. सोशल मीडियावर शुभेच्छांच्या वर्षावाबरोबरच भारताचे इंग्रजी नाव (India) कसे पडले याविषयी एक रंजक मेसेजदेखील व्हायरल झाला.

व्हायरल मेसेजनुसार, भारत ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र झाला म्हणून त्याला INDIA (Independent Nation Declared In August) असे म्हणतात. सोबत ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये ही माहिती दिल्याचा दाखला दिलेला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.

आमच्या पडताळणीत हा मेसेज धदांत खोटा निघाला. इंडिया नावामागे वेगळा इतिहास आहे.

काय आहे दावा?

व्हायरल मेसेजमध्ये इतर देशांचे मूळ नाव आणि इंग्रजी नाव एकच असल्याचे सांगत पुढे म्हटले की, “पण मग भारतालाच English मध्ये India का म्हणतात? तर Oxford Dictionary नुसार India हा शब्द कसा आला याची ९९% लोकांना माहिती सुद्धा नाही -

I - Independent

N- Nation

D- Declared

I - In

A- August

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. परंतु, आपल्याला हे माहिती आहे की, इंडिया हा शब्द त्यापूर्वीपासून वापरात आहे. इस्ट ‘इंडिया’ कंपनीची स्थापना तर 1600 मध्ये झाली होती. अनेक ऐतिहासिक कागदपत्रात भारताला इंडिया असे संबोधण्यात आलेले आहे. त्यामुळे इंडिया शब्दाला लॉगफॉर्म Independent Nation Declared In August असा तर बिलकूल नाही.

ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये सुद्धा India शब्दाची व्युत्पत्ती व्हायरल मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे झाल्याचे म्हटलेले नाही.

मग इंडिया नाव आले कुठून?

इंडिया (India) हा शब्द इंडस (Indus) या शब्दापासून तयार झाला आहे. संस्कृत भाषेतील मूळ शब्द सिंधू (Sindu) आहे.

प्राचीन काळी इराण आणि अरब प्रांतातील लोक ‘स’ अक्षराला ‘ह’ उच्चार करायचे. त्यामुळे ते सिंधू प्रांताला हा Hindos म्हणायचे तर ग्रीक लोक Indos म्हणायचे.

अडीच हजार वर्षांपूर्वी जेव्हा ग्रीक आणि इराणी लोक या प्रदेशात आले ते Sindu प्रांताला Hindos किंवा Indos असे म्हणायचे.

प्राचीन काळी इराण आणि अरब प्रांतातील लोक ‘स’ अक्षराला ‘ह’ उच्चार करायचे. त्यामुळे सिंधू हा हिंदू (Hindu) म्हणायचे.

मेसेडोनिआचा राजा अलेक्झांडरने भारतावर चालून आल्यावर सिंधू नदीच्या आसपासचा प्रदेश इंडिया नावाने ओळखला जाऊ लागला. नवव्या शतकातील Old English Orosius पुस्तकात इंडिया असा उल्लेख आहे. किंग जेम्स बायबलमध्ये Indie असा उल्लेख आहे.

याविषयी अधिक सखोल माहिती येथे वाचा.

India that is Bharat

18 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वतंत्र देशाचे नाव काय असावे याविषयी खल केला. त्यावेळी भारत, हिंदूस्थान, हिंद, भारतभूमी, भारतवर्ष असे विविध पर्याय सुचविण्यात आले. शेवटी संविधानच्या आर्टिकल 1 मध्ये India, that is Bharat, shall be a Union of States असे निश्चित करण्यात आले. भारताने द्विनाम पद्धती स्वीकारली.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, भारताला ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य मिळाले म्हणून देशाचे नाव इंडिया ठेवण्यात आले नाही. सदरील व्हायरल मेसेज फेक आहे. इंडियाचे नावाचा फुल फॉर्म Independent Nation Declared In August नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र झाला म्हणून भारताचे नाव INDIA ठेवण्यात आले नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False