FALSE ALERT: आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना खरंच मुक्त केले का? वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International राजकीय | Political

पाकिस्तानमध्ये कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मुक्त केले, अशा पोस्ट सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. कुलभूषण यांना पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून हेरगीरीच्या आरोपाखाली 2016 साली अटक करण्यात आल्यानंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांची मुक्तता होणे ही भारतीय मुत्सद्देगीरीसाठी मोठे यश असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

विविध फेसबुक युजर्स आणि पेजवरील पोस्टमध्ये हिंदीतून लिहिले आहे की, कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मुक्त केले. भारतासाठी हा मोठा विजय आहे. वकील हरीश साळवे यांच्या प्रयत्नांना यश.

काय आहे प्रकरण?

भारतीय नौदलातील निवृत्त लष्करी अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने दहशतवाद व हेरगिरीच्या आरोपाखाली दोषी ठरवून 10 एप्रिल 2017 रोजी फाशीची शिक्षा सुनावली. याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 18 मे 2017 रोजी फाशीला स्थगिती दिली. या प्रकरणी अंतिम निकाल लागेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होता कामा नये, असे न्यायालयाने पाकला बजावले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयात या खटल्याची चार दिवस सुनावणी झाली. भारताच्यावतीने ज्येष्ठ वकिल हरिश साळवे बाजू मांडत आहेत. (संदर्भः लोकसत्ता)

तथ्य पडताळणी

गुगलवर याप्रकरणासंबंधी शोध घेतला असता महाराष्ट्र टाईम्सची 4 जुलै रोजीच एक बातमी समोर आली. यानुसार, कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय येत्या 17 जुलै रोजी आपला निर्णय देणार आहे, अशी माहिती इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसद्वारे (आयसीजे) एक प्रसिद्धीपत्रक जारी करून देण्यात आली. न्यायमूर्ती अब्दुलकवी अहमद युसूफ या प्रकरणी अंतिम सुनावणी करणार आहेत.

मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्सइकोनॉमिक टाईम्स

आंतरराष्ट्रीय न्यायालयाची अधिकृत वेबसाईट आणि ट्विटर हँडलवरून 4 जुलै रोजी यासंबंधी माहिती देण्यात आली होती. जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले की, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख न्यायिक अंग असलेले आंतरराष्ट्रीय न्यायालय कुलभूषण जाधव प्रकरणी (भारत वि. पाकिस्तान) बुधवारी, 17 जुलै 2019 रोजी आपला निर्णय जाहीर करणार आहे. हेग येथे दुपारी तीन वाजता पीस पॅलेस येथे सुनावणीला सुरुवात होईल. न्यायालयाचे अध्यक्ष ना. अब्दुलकवी अहमद युसूफ कोर्टाच्या निर्णयाचे वाचन करतील.

ट्विट अर्काइव्ह । प्रेस रिलीज

दूरदर्शन न्यूजनेदेखील ही बातमी दिली होती. त्यांनी ट्विट केले होते की, आंतरराष्ट्रीय न्यायालय 17 जुलै रोजी कुलभूषण जाधव प्रकरणी निर्णय देणार आहे. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने त्यांना त्यांची बाजू मांडायची संधी न देता फाशीची शिक्षा सुनावली होती, असे भारताने म्हटले आहे.

अर्काइव्ह

निष्कर्ष

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणी अद्याप निर्णय दिलेला नाही. येत्या 17 जुलै रोजी याप्रकरणी निकाल सुनावण्यात येणार आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयानेच जाहीर केले आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:FALSE ALERT: आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना खरंच मुक्त केले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False