ल्युपो/लुप्पो नावाच्या कंपनीच्या केकमध्ये लहान मुलांना अर्धांगवायू होईल अशा गोळ्या सापडल्या, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये केकमध्ये पांढऱ्या गोळ्या निघाल्याचे दिसते.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ भारतातील नाही. तसेच तो खोडसाळपणे कोणीतरी तयार केला होता.

काय आहे दावा?

45 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती Luppo कोकोनट केक बारचे पॅकेट उघडून त्यातून पांढऱ्या गोळ्या बाहेर काढतो. सोबतच्य मेसेजमध्ये म्हटले की, “नवीन केक बाजारात आला आहे. ल्युपो कंपनीचा एक टॅबलेट आहे जो लहान मुलांना अर्धांगवायू करतो, कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा तो फक्त हिंदू प्रदेशात विकला जातो. तुमच्या मुलांची काळजी घ्या आणि स्वतःचीही काळजी घ्या.”

https://twitter.com/GaneshGavli12/status/1560251584797642753

हा व्हिडिओ फेसबुकवरदेखील याच दाव्यासह व्हायरल होत आहे.

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

गुगलवर यासंबंधी शोध घेतला असता कळाले की, हा व्हिडियो जगभरात व्हायरल होत आहे. याहू न्यूज (युके) वेबसाईटच्या बातमीनुसार, हा व्हिडियोमध्ये करण्यात आलेल्या दाव्याला कोणताही आधार नाही. लुप्पो केक तुर्कस्तानमध्ये तयार होतात.

तेयीत वेबसाईटनुसार, हा व्हिडियो सर्वप्रथम 28 ऑक्टोबर 2019 रोजी युट्यूबवर शेयर करण्यात आला होता. व्हिडियोच्या 45 सेंकदाला इरकी-कुर्दिस्तान भागात बोलली जाणारी सोरानी बोलीभाषा ऐकू येते. तसेच खाली फ्रीजमध्ये Ace Aspiliç कंपनीचे उत्पादनही दिसते. हे उत्पादन तुर्कस्तानातून इराकमध्ये निर्यात केले जाते. यावरून हा व्हिडियो इराक-कुर्दिस्तान भागातील असण्याची अधिक शक्यता आहे.

व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर दिसते की, वेष्टणाच्या बाहेर केक काढल्यावर त्यात दोन छिद्र दिसतात. त्यामुळे केकमध्ये नंतर गोळ्या टाकल्याची शक्यता आहे.

फ्रान्स 24 वेबसाईटनुसार, हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर कुर्दिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने याची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आरोग्य अधिकाऱ्यांनी लुप्पो केकची जागोजागी तपासणी केली. या तपासणीचा व्हिडियोदेखील फेसबुकवर शेयर करण्यात आला होता. लुप्पो केकमध्ये कोणतीही गोळी आढळून आली नाही.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक

लुप्पो केक भारतात उपलब्ध नाही

स्नोप्स वेबसाईटनुसार, तुर्कस्तानमधील शोलॅन कंपनीतर्फे लुप्पो केक तयार करण्यात येतात. हे उत्पादन केवळ इराकमध्ये विक्री केले जाते. भारतात हे उत्पादन उपलब्ध नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. तसेच अशा गोळ्यांनी अर्धांगवायुचा धोका संभवत नाही. त्यामुळे हा दावादेखील निराधार आहे.

शोलॅन कंपनीशी जेव्हा फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला असता कंपनीने ईमेलद्वारे उत्तर दिले की, हा व्हिडियो पूर्णतः चुकीचा आहे. कंपनीतर्फे आंतरराष्ट्रीय नियम व अटींनुसारच अन्न सुरक्षा व स्वच्छतेची काळजी घेतली जाते. हा व्हिडियो कंपनीला बदनाम करणाच्या उद्देशाने फिरवला जात आहे. आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही वाचकांपर्यंत ही खरी बातमी देऊ इच्छितो.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, लुप्पो केकमध्ये मुलांना अर्धांगवायू होऊ शकणाऱ्या गोळ्या सापडलेल्या नाहीत. कोणीतरी खोडसाळपणे हा व्हिडियो तयार केला होता. तसेच हा केक भारतात मिळत नाही. तो केवळ इराकमध्ये विक्रीस आहे. त्यामुळे भारतात याविषयी काळजी करण्याची गरज नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:ल्युपो कंपनीच्या केकमध्ये अर्धांगवायूच्या गोळ्या सापडल्याचा व्हिडिओ फेक; विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False