नितीन गडकरी यांनी भाजप सरकारला जुमलेबाज-लुटारू म्हटले का? वाचा सत्य 

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय

आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये ते आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत त्यांनी जनतेला जुमलेबाज, धोकेबाज, लुटारू सरकारवर विश्वास न ठेवण्याचे कथित आवाहन केलेले आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पोस्ट बनावट आहे. नितीन गडकरी यांच्या वक्तव्याशी छेडछाड करून चुकीची माहिती पसरविली जात आहे. 

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये नितिन गडकरी यांचा फोटो आणि महाराष्ट्र देशा वृताचा लोगोसह लिहिलेले आहे की, “या जुमलेबाज, धोकेबाज, लुटारू सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी स्वतः सरकारमध्ये आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम महाराष्ट्र देशाच्या फेसबुक पेजवर नितीन गडकरींनी केलेल्या विधानाचे ग्राफिक कार्ड आढळले. यामध्ये कुठेही “ जुमलेबाज, धोकेबाज, लुटारू” अशा शब्दांचा उल्लेख नाही.

“सरकारच्या भरवश्यावर राहू नका, मी सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय” असे नितीन गडकरी म्हणाले होते.

अपिडा आणि अॅग्रोव्हिजन फाउंडेशनने 10 सप्टेंबर 2022 रोजी नागपूरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाजीपाला व फळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना संबोधित करताना नितीन गडकरींना असे वक्तव्य केले होते. 

या कार्यक्रमाती संपूर्ण भाषण गडकरींच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

वरील भाषणामध्येसुद्धा गडकरी यांनी भाजप सरकारला “जुमलेबाज, धोकेबाज, लुटारू” असे म्हटलेले नाही.

एबीपी माझाच्या बातमीनुसार नितीन गडकरींनी शेतकऱ्यांना सरकारवर जास्त अवलंबून न राहता आपले मार्केट शोधण्याचा सल्ला दिला होता.

“सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका! मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो. कृषी क्षेत्रात विकास करायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. सरकारच्या भरवश्यावर न राहता स्वतः कृती करायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी प्रगती केली आहे, अशा शेतकऱ्यांचा आदर्श घेतला पाहिजे,” असे ते म्हणाले होते. सदरील वक्तव्य आपण येथे पाहू शकतात.

यापूर्वीसुद्धा गडकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे तथ्यहीन व बनावट विधान व्हायरल झाले होते. त्याचे फॅक्ट-चेक येथे वाचू शकतात.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले पोस्ट एडिट केलेले आहे. गेल्या वर्षी नितीन गडकरींनी शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्याचा सल्ला देताना सरकारवर जास्त विसंबून न राहण्याचा सल्ला दिला होता. यावेळी त्यांनी भाजप सरकारला “जुमलेबाज, धोकेबाज, लुटारू” असे म्हटले नव्हते. त्याच्या नावाने चुकीचे वक्तव्य पसरविले जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नितीन गडकरी यांनी भाजप सरकारला जुमलेबाज-लुटारू म्हटले का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Missing Context