Fact Check : पुण्यात मॉब लिंचिंगची घटना घडली का?

False सामाजिक

मॉब लिंचिंगची घटना पुण्यात पीडित हिंदू या व्यक्तीच नाव आहे हितेश मुलचंदानी याला परवा च्या दिवशी मुस्लिम लोकांनी जिवंत जाळून मारलं, मरणारा हिंदू आहे आणि मारणारा मुस्लीम यामुळे याला मीडिया दाखवणार नाही. आता आपल्यालाच उभं रहायची गरज आहे. समजू द्या जगाला हिंदू किती प्रताडीत झालाय आपल्या देशातच दुय्यम झालाय… 49 बुद्धिजीवी हिजड्यांची गॅंग कुठे आहे??? हिंदू मारला गेला हिंदूंनो कधी जाग होणार. आपल्या नंबर आल्यावर?? अशी पोस्ट रविंद्रसिंह लक्ष्मी नरसिंह शेल्हाळकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी  

हितेश मुलचंदाणी यांच्या खूनप्रकरणात ही मॉब लिंचिंगची घटना असून माध्यमांनी वृत्तांकन केले नाही, असा दावा करण्यात आल्याने आम्ही hitesh mulchandani murder case असा शब्दप्रयोग करुन शोध घेतला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला.  

या परिणामात दैनिक महाराष्ट्र टाईम्सने आपल्या संकेतस्थळावर दिलेले वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात हितेशच्या खुनानंतर व्यापाऱ्यांनी बंद पाळल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आम्ही आमचा तपास आणखी पुढे नेला त्यावेळी दैनिक लोकमतच्या संकेतस्थळाने दिलेले वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात हितेशचे अपहरण करुन त्याचा खून करण्यात आल्याचे म्हटले आहे. याप्रकरणात अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा, योगेश विठ्ठल टोगपे उर्फ लंगडा (दोघे रा. सांगवी) यांना अटक करण्यात आली आहे. अमिज फिरोज खान या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शाहबाज सिराज कुरेशी आणि आरबाज शेख हे आरोपी फरार आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे. यातून हे स्पष्ट होत आहे की आरोपी हे कोणत्या विशिष्ट समाजाचे अथवा समुदायाचे नाहीत. हा मॉब लिंचिंगचा प्रकार असल्याचेही या वृत्तात कुठेही म्हटलेले नाही. 

दैनिक लोकमत / Archive

द टाईम्स ऑफ इंडियाने या घटनेचे अतिशय सविस्तर वृत्त दिले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी कॅम्प परिसरात रोहित सुखेजा (वय. 26) यांचे हॉटेल आहे. या ठिकाणी मंगळवारी पहाटेच्या वेळी स्वच्छतेचे काम सुरु होते. त्यावेळी त्याठिकाणी चार जण आणि एक 17 वर्षाचा मुलगा कारमधून आले. त्यांनी या दुकानातील कर्मचाऱ्यांना पैसे देत बियरच्या बॉटसची मागणी केली. बियर बॉटल देत असतानाच कर्मचाऱ्यांना त्यांच्यापैकी एक जण हॉटेलच्या कम्पाऊंडजवळ लघुशंका करत असताना दिसला. त्यावर कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेताच त्या व्यक्ती आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी झाली. या व्यक्तींपैकी एकाने कैलास पाटील या कर्मचाऱ्याच्या डोक्यात बियरची बॉटल घातली. त्यानंतर सुखेजा यांनी त्यांचा नातलग लखन सुखेजा याला फोनवरुन घटनास्थळी बोलवले. याठिकाणी लखन सुखेजा हे हितेश मुलचंदाणी यांना घेऊन आले. त्यामुळे कारमधील ते चौघे आणि 17 वर्षाचा मुलगा पळून जाऊ लागले. यापैकी 17 वर्षाच्या मुलाला कर्मचाऱ्यांनी पकडताच कारमधील चौघांनी मुलचंदाणी यांना पकडून कारमध्ये टाकले आणि ते पळून गेले. 

  सुखेजा यांनी मुलचंदाणी यांच्या फोनवर फोन करुन आरोपींना मुलचंदाणी यांना सोडून देण्यास सांगितले. आपण 17 वर्षाच्या मुलास सोडून देऊ, असे आश्वासनही दिले. आरोपींना मात्र मुलचंदाणी यांनी आपल्याला मारहाण केली असून आपण त्यांना सोडणार नसल्याचे सांगितले. मुलचंदाणी सकाळी साडेसहाच्या सुमारास बेशुध्दावस्थेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागे सापडले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मुलचंदाणी यांच्यावर तीक्ष्ण हत्यार आणि स्क्रु-ड्रायव्हरने हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या छातीवर खोल जखमा होत्या, असे पोलिसांनी सांगितले.  

द टाईम्स ऑफ इंडिया / Archive

स्थानिक आमदार गौतम चाबुकस्वार यांनी पिंपरी कॅम्प परिसरातील बियर बार आणि परमिट रुम रात्री उशिरापर्यंत उघडे असतात, यामुळेच ही घटना घडल्याचे म्हटले आहे. 

वरील सर्व माहितीतुन हे दिसून येते की, हितेश मुलचंदाणी यांचा तीक्ष्ण हत्याराने आणि स्क्रु ड्रायव्हरने जखमी करुन खून झाला आहे. त्याला धार्मिक कारण नाही. त्यांना जाळण्यात आले हे देखील असत्य आहे. आरोपी विशिष्ट धर्माचे असल्याचे आणि हा मॉब लिंचिंगचा प्रकार असल्याचेही असत्य आहे.

या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस निरीक्षक रघुनाथ उंडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे मॉब लिंचिंगचे प्रकरण नसल्याचे स्पष्ट केले. 

निष्कर्ष

हितेश मुलचंदाणी यांचा किरकोळ कारणावरुन खून झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हा मॉब लिंचिंगचा प्रकार नाही. स्थानिक आमदारांनी या घटनेबद्दल उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या बियर बार आणि परमिट रुमला जबाबदार धरल्याचे आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : पुण्यात मॉब लिंचिंगची घटना घडली का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False