VOTING FACT: भाजपच्या विविध उमेदवारांना एकसमान 2,11,280 मते मिळाली का?

False राजकीय | Political

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमचा मुद्दा खूप गाजत आहे. विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत त्यात फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. आता सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, उत्तर प्रदेशमधील भाजपच्या सात उमेदरवारांना एकसमान 2 लाख 11 हजार 280 मते मिळाली. त्याच ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना 1 लाख 40 हजार 295, तर बसपला 24 हजार 396 मते मिळाली. असा योगायोग कसा काय जुळून आला? असा प्रश्न विचारून ईव्हीएमच्या विश्वासाहर्तेवर शंका उपस्थित केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये

पोस्टमध्ये भाजपच्या भोला सिंह, मेनका गांधी, उपेंद्र नर्सिंग, हरीश द्विवेदी, सत्यपाल सिंह, संग मित्र मौर्य आणि कुंवर भारतेंद्र सिंह या सात उमेदवारांना समसमान 2 लाख 11 हजार 280 मते मिळाली असे म्हटले आहे. हा योगायोग म्हणावा की ईव्हीएमशी छेडछाड? ईव्हीएम सेटिंग शिवाय हे कसे शक्य आहे असा सवालदेखील विचारण्यात आला.

तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये दिलेली आकडेवारी आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारी यांची तुलना करून या एक-एक करीत पडताळणी केली आहे. पोस्टमध्ये उल्लेख केलेले उमेदवारांचे मतदारसंघ असा आहे- भोला सिंह (बुलंदशहर), मेनका गांधी (सुल्तानपूर), उपेद्र नर्सिंग (बाराबंकी), हरीश द्विवेदी (बस्ती), सत्यपाल सिंह (बागपात), संग मित्र मौर्य (बदायू), कुंवर भारतेंद्र सिंह (बिजनौर).

1. बुलंदशहर

या मतदारसंघात भोला सिंह (भाजप), बंसी सिंह ऊर्फ बंसीलाल पहाडिया (काँग्रेस) आणि योगेश वर्मा (बसप) यांच्यामध्ये लढत झाली. अंतिम निकालानुसार भाजपला 6 लाख 81 हजार 321 मते मिळाली. त्याच तुलनेत बसपला 3 लाख 91 हजार 264 मते पडली. काँग्रेसला मात्र 2.62 टक्के लोकांनी मते दिली. त्यामुळे त्यांना केवळ 29 हजार 465 एवढीच मते मिळाली. अधिकृत आकडेवारी पोस्टमधील आकडेवारीपासून पूर्णतः भिन्न आहे.

मूळ निकाल येथे पाहा – बुलंदशहर निकाल

2. सुल्तानपूर

या मतदारसंघात मनेका गांधी (भाजप), डॉ. संजय सिंग (काँग्रेस) आणि चंद्रभद्र सिंग (बसप) उभे होते. अंतिम निकालाअंती मनेका गांधी यांनी 4 लाख 59 हजार 196 मते मिळवत विजयी झाल्या. येथे बसपला 4 लाखा 44 हजार 670, तर काँग्रेसला फक्त 41 हजार 681 मते मिळाली. म्हणजे ही आकडेवारीसुद्धा पोस्टमधील माहितीपेक्षा वेगळी आहे.

मूळ निकाल येथे पाहा – सुल्तानपूर निकाल

3. बाराबंकी

बाराबंकी येथे भाजपकडून उपेंद्र सिंग रावत, काँग्रेसकडून तनुज पुनिया तर समाजवादी पक्षाकडून राम सागर रावत यांच्यामध्ये लढत होती. भाजपने येथे बाजी मारत 5 लाख 35 हजार 917 मते मिळवली. काँग्रेसला 1 लाख 59 हजार 575 तर, सपला 4 लाख 56 हजार 624 मते मिळाली. येथे बसपचा उमेदवारच नाही.

मूळ निकाल येथे पाहा – बाराबंकी निकाल

4. बस्ती

येथे भाजपचे हरीश द्विवेदी काँग्रेसचे राज किशोर सिंग आणि बसपचे रामप्रसाद चौधरी रिंगणात होते. हरीश द्विवेदी 4 लाख 71 हजार 162 मते घेत विजयी ठरले. दुसऱ्या क्रमांकावर 4 लाख 40 हजार 808 मतांसह बसप तर काँग्रेसला 86 हजार 920 मते मिळाली. म्हणजे येथेही आकडेवारी पोस्टशी जुळत नाही.

मूळ निकाल येथे पाह – बस्ती निकाल

5. बागपत

बागपत येथे डॉ. सत्यपाल सिंग यांनी भाजपकडून विजय मिळवला. त्यांना 5 लाख 25 हजार 789 मते मिळाली. त्यांच्याविरोधातील राष्ट्रीय लोक दलातर्फे उभे असलेल्या जयंत चौधरी यांना 5 लाख 2 हजार 287 मते प्राप्त झाली. विशेष म्हणजे या मतदारसंघात बसप आणि काँग्रेसचा उमेदवारच नव्हता.

मूळ निकाल येथे पाहा – बागपत निकाल

6. बदायू

बदायू येथून भाजपतर्फे डॉ. संगमित्र मौर्य उभे होते. त्यांच्यासमोर काँग्रेसचे सलीम इकबाल आणि समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांचे आव्हान होते. परंतु, भाजपने 5 लाख 11 हजार 352 मतांसह ही जागा जिंकली. काँग्रेसला 51 हजार 947 मतेच मिळाली. सपला 4 लाख 92 हजार 898 मते प्राप्त झाली. त्यामुळे हा निकालसुद्धा पोस्टमधील दाव्यापेक्षा वेगळा आहे.

मूळ निकाल येथे पाहा – बदायू निकाल

7. बिजनोर

बिजनोर येथे भाजपला हार पत्कारावी लागली. राजा भारतेंद्र सिंग हे भाजपचे उमेदवार होते. त्यांना 4 लाख 91 हजार 104 मते मिळाली. बसपच्या मलूक नागर यांनी या मतदारसंघात विजय प्राप्त केला. त्यांना 5 लाख 61 हजार 45 मते मिळाली. काँग्रेसला 2.35 टक्के लोकांनी मत दिली. त्यांना केवळ 25 हजार मते मिळाली.

मूळ निकाल येथे वाचा – बिजनोर निकाल

8. बलिया

भाजपच्या विरेंद्र सिंह यांनी बलिया मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांना 4 लाख 69 हजार 114 मते प्राप्त झाली. त्यांच्याविरोधातील सपचे उमेदवार सनातन पांडे यांना 4 लाख 35 हजार 595 मते मिळाली. येथे काँग्रेस आणि बसपचे उमेदवार उभे नव्हते.

वरील आकडेवारीवरून सिद्ध होते की, भाजपच्या या सात उमेदवारांना एकसारखे 2,11.820 मते मिळालेली नाहीत. तसेच काँग्रेस आणि बसपला देखील पोस्टमध्ये दावा केल्याप्रमाणे समसमान मते प्राप्त झालेली नाही.

काही पोस्टमध्ये मतमोजणी दरम्यानचे मोबाईल स्क्रीनशॉट दिलेले आहेत. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारची ही आकडेवारी यामध्ये दिली आहे.

फेसबुकअर्काइव्ह

येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की, बलिया, बागपत या दोन ठिकाणी काँगेस आणि बसपचा उमेदवारच नाही. बाराबंकी येथे बसप लढत नव्हती. म्हणून त्यांना या मतदारसंघात पोस्टमधील दाव्यानुसार अनुक्रमे 1,40,295 आणि 24,396 अशी मते मिळण्याचा प्रश्नच नाही.

उत्तर प्रदेशमधील काँग्रेसची उमेदवार यादी आणि बसपची यादी येथे पाहा.

दुसरी आश्चर्यकारक गोष्ट अशी की, मतमोजणी दरम्यान काँग्रेसला 1 लाख 40 हजार 295 मते असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रत्यक्षात बदायू (51 हजार), बस्ती (86 हजार), बुलंदशहर (29 हजार), सुल्तानपूर (41 हजार), बिजनोर (25 हजार) या मतदारसंघात अंतिम निकालामध्ये काँग्रेसला यापेक्षा कमी मते आहेत. म्हणजे सात मतदारसंघात काँग्रेसला 1,40,295 पेक्षा कमी मते पडली आहेत.

निष्कर्ष

सोशल मीडियावरील दाव्याप्रमाणे भाजप आणि काँग्रेसच्या सात उमेदवारांना अनुक्रमे एकसारखीच 2,11,820 आणि 1,40,295 मते मिळालेली नाहीत. पोस्टमधील स्क्रीनशॉट्सची वैधतादेखील पडताळणीमध्ये खोटी ठरली.

Avatar

Title:VOTING FACT: भाजपच्या विविध उमेदवारांना एकसमान 2,11,280 मते मिळाली का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False