फोटोतील आजीबाईंनी काबाड कष्ट करून या मुलीला इन्स्पेक्टर केले का? वाचा या फोटोमागील सत्य

False सामाजिक

शेतकरी, मजूर, कामागार आणि अत्यंत गरीब परिस्थितील श्रमिक आईवडिलांनी जीवाचे रान करून आपल्या मुलांना शिकवून मोठे केल्याची अनेक उदाहरणे आहेत. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असणाऱ्या या कष्टकऱ्यांच्या घरातील मुलं-मुली जेव्हा मोठ्या हुद्द्यावर पोहचतात तेव्हा नक्कीच त्यांचा अभिमान वाटतो. अशीच एक प्रेरणदायी घटना सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. पोलिसांच्या वर्दीतील तरुणीचा एका आजीबाईसोबतचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, या आजीबाईंनी मोलकरीण म्हणून काम करीत त्यांच्या नातीला पोलीस निरीक्षक बनविले. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची सत्यता तपासली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुक पोस्टमधील फोटोमध्ये पोलीस तरुणी हातात जेवणाचे ताट असलेल्या एका ज्येष्ठ महिले शेजारी उभी आहे. सोबत लिहिले की, पतीच्या मृत्यू पश्चात या आजीबाईंनी लोकांच्या घरात भांडे घासून मोठ्या कष्टाने त्यांच्या नातील शिकवून इन्स्पेक्टर बनवले.

तथ्य पडताळणी

हा फोटो कुठला आहे, या तरुणीचे नाव काय याची काहीच माहिती या पोस्टमध्ये दिलेली नाही. त्यामुळे या फोटोची सतत्या जाणून घेण्यासाठी गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून वेगळेच तथ्य समोर आले.

इंडियन एक्सप्रेस दैनिकाच्या बातमीनुसार, फोटोत दिसणाऱ्या पोलीस तरुणीचे नाव मानवी असून ती उत्तर प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल आहे. आणि सदरील वृद्ध महिला तिच्या आजी नाहीत. कित्येक दिवस उपाशी असलेल्या या ज्येष्ठ महिलेला मानवीने पोटभर जेऊ घातले होते. तिच्या दयाळूपणाचे आणि मानवतेचे सगळीकडे कौतुक करण्यात आले होते.

मूळ बातमी येथे वाचा – इंडियन एक्सप्रेस

पत्रिका दैनिकातील बातमीनुसार, उत्तर प्रदेशमधील संत कबीर नगर जिल्ह्यातील धनघटा ठाण्यात कार्यरत असणारी कॉन्स्टेबल मानवी सिंग 1 एप्रिल रोजी बँकेत गेली होती. तेथे तिला एका ज्येष्ठ महिला उन्हात बसलेली दिसली. हे पाहून मानवी सिंगने त्यांची आस्थाने विचारपूस केली. तेव्हा कळाले की, आजीबाई गेल्या अनेक दिवसांपासून उपाशी होत्या. जेवणासाठी त्यांच्याकडे पैसेदेखील नव्हते. हे ऐकून मानवी सिंग यांनी स्वतःचे काम सोडून लगेच त्यांना जेऊ घातले. एवढेच नाही तर, घरापर्यंत सोडलेदेखील.

मूळ बातमी येथे वाचा – पत्रिका

मानवी सिंग यांच्या या सत्कृत्याची सोशल मीडियावर लोकांनी दखल घेतलीच, पण उत्तर प्रदेश पोलिसांनीसुद्धा कौतुक केले. यूपी पोलीस महानिरीक्षक ओ. पी. सिंग यांनी तिला पत्र पाठवून स्तुती केली. पोलिसांनी कर्तव्याच्या पलिकडे जाऊन नागरिकांची मदत केली पाहिजे आणि मानवी सिंगने ते करून दाखविले, असे ते म्हणाले. यूपी पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनदेखील मानवीचा आजीबाईंसोबतचा फोटो शेयर करण्यात आला होता.

अर्काइव्ह

निष्कर्ष

वरील पुराव्यांवरून हे सिद्ध होते की, सदरील फोटो हा आजी आणि नातीचा नाही. यूपी पोलीस कॉन्स्टेबल मानवी सिंग यांनी या उपाशी आजीबाईला मदत केली होती. त्यावेळी काढलेला हा फोटो आहे. म्हणून ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:फोटोतील आजीबाईंनी काबाड कष्ट करून या मुलीला इन्स्पेक्टर केले का? वाचा या फोटोमागील सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False