
हरियाणामध्ये एका कामचुकार आमदाराला जनतेने मारहाण केली, अशा दाव्यासह एक व्हिडियो क्लिप व्हायरल होत आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार-पाच जण दोघांना बेदम मारहाण करताना दिसतात.
फॅक्ट क्रेसेंडोने व्हिडियोची पडताळणी केली असता कळाले की, हा व्हिडियो आमदाराला मारहाण केल्याचा नाही.
काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सदरील व्हिडियोतली की-फ्रेम्स निवडून रिव्हर्स इमेज सर्च केले असता इंडिया टीव्हीवरील एक बातमी आढळली. त्यानुसार, हा व्हिडियो हरियाणातील मुनक येथील आहे. 10 जुलै रोजी उपविभागीय अधिकाऱ्याच्या दालनातच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती.
या बातमीमध्ये पोलिस अधिकाऱ्याने माहिती दिली की, या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली होती. बातमीमध्ये कुठेही आमदाराला मारहाण झाल्याचे म्हटलेले नाही.
फॅक्ट क्रेसेंडोने मग मुनक पोलिस ठाण्याचे एसएचओ कुलदीप सिंग यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, “या व्हिडियोमध्ये कोणत्याही आमदाराला मारहाण झाली नव्हती. दोन गटांमधील वादामुळे ही घटना घडली होती. शेतावरून जाणाऱ्या तारांवर आकडा टाकण्यावरून दोन्ही गटांमध्ये भांडण होते. त्याची तक्रार घेऊन पीडित उपविभागीय अधिकाऱ्याकडे आले होते. तेव्हा त्यांना दालनात मारहाण झाली व सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.”
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, दोन गटांतील मारहाणीच्या व्हिडियोला चुकीच्या माहितीसह पसरविले जात आहे. हरियाणात आमदाराला मारहाण झाल्याचा हा व्हिडियो नाही.
(वाचकांना जलद आणि अचूक माहिती देण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने सुरू केली आहे चॅटबॉटची सुविधा. 9049053770 हा क्रमांक सेव्ह करा आणि पाठवा तुमची फॅक्ट-चेक रिक्वेस्ट.)

Title:हरियाणात कामचुकार आमदाराला जनतेने चोप दिला का? पाहा ‘त्या’ व्हिडियो मागील सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
