FAKE: रेशन कार्ड नसल्यावर मोफत धान्य मिळवण्याचा तो फॉर्म खोटा आहे. वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात 21 दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे गोरगरीब, कामगार, मजुरांवर रोजगार नसल्यामुळे मोठे संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत रेशन कार्ड नसल्यावरही मोफत अन्नधान्य देण्यात येत असल्याची अफवा उठली आहे. अशा दाव्यासह एक फॉर्म (अर्ज) देखील व्हायरल होत आहे. 

परंतु, यावर विश्वास ठेवू नका. हा फॉर्म खोटा आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने भरण्यासाठीचा फॉर्म शेयर करून म्हटले की, सदरचा फॉर्म तलाठी यांचेकडे भरून द्यावा. ज्या गरीब कुटुंब दुसऱ्या ठिकाणाहून तालुक्यात आले आहे परंतु त्यांना रेशनकार्ड नाही त्यांची कोरोना मुळे रोजीरोटी चा प्रश्न निर्माण झाला आहे अशा कुटुंबासाठी शासनाच्या वतीने धान्य देण्यात येणार आहे अशा कुटुंबाना सदरचा फॉर्मवर रेशन मिळणार आहे तरी सदरचा फॉर्म सगळीकडे पाठवा .

Droll.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

सरकराने खरंच असा काही निर्णय घेतला का याचा शोध घेतला असता हा मेसेज खोटा असल्याचे कळाले.

अन्न, नागरी पुरवठा विभागातर्फे खुलासा करण्यात आला की, सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केली नसून, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फॉर्म बनावट आहे. राज्य सरकारने असा कोणताही अर्ज प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून लोकांनी आपली फसवणूक होऊ न देण्याचे विभागातर्फे आवाहन करण्यात आले.

जिल्हा माहिती कार्यलयातर्फे जारी करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले की, रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरविल्या जात आहे. सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी राज्यसरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठलाही फॉर्म भरून देऊ नये.

शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयानेदेखील ट्विटरवर हा फॉर्म बनावट असल्याचे स्पष्ट केले.

अर्काइव्ह

मग शासनाची योजना काय?

सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न ,नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळवण्यासाठीचा तो फॉर्म बनावट आहे. शासनाने असा कोणताही अर्ज प्रसारित केलेला नाही. त्यावर विश्वास ठेवू नका.

Avatar

Title:FAKE: रेशन कार्ड नसल्यावर मोफत धान्य मिळवण्याचा तो फॉर्म खोटा आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False