गुजरातमधील मनोरुग्णाचे व्हिडियो कोरोना पेशंट म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Coronavirus False राजकीय | Political

तीन व्हिडियो सध्या कोरोनाबाधित रुग्णांचे म्हणून प्रचंड व्हायरल होत आहेत. या सर्व व्हिडियोमध्ये एक पांढरा शर्ट घातलेल्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत असून, लोक त्याच्यापासून दूर पळत असल्याचे दिसते. हे व्हिडियो कोरोनाबाधित रुग्णांचे असल्याचे म्हटले जात आहेत. सोशल मीडियावर हे व्हिडियो शेयर करून लोकांमध्ये भीती पसरविली जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडियो व्हॉट्सअपवर पाठवून त्यांची सत्य पडताळणी करण्याची विनंती केली.

तथ्य पडताळणीती हे तीन्ही व्हिडियो एकाच व्यक्तीचे असल्याचे समोर आले. त्याला कोरोनाची लागण झालेली नाही. 

व्हिडियो क्रमांक 1

या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती घराच्या बाल्कनीमध्ये श्वास घेण्यासाठी धडपडत असल्याचे दिसते. तो गॅलरीवर रेलून शुद्ध हरपल्यासारखे दिसतो.

व्हिडियो क्रमांक 2

या व्हडियोमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर धावत असून, वैद्यकीय कर्मचारी त्याच्यापासून दूर पळताना दिसतात. मग एका मोटरसायकरलवर त्याला घेऊन जातात.

व्हिडियो क्रमांक 3

साडेतीन मिनिटांच्या या क्लिपमध्ये एक व्यक्ती भर उन्हात रस्त्यावर पडलेला आहे. त्याला श्वसनास त्रास होत आहे. मास्क घातलेले दवाखान्यातील कर्मचारी सुरूवातीला त्याच्यापासून दूर-दूर राहतात. मात्र, नंतर ते त्याला रुग्णवाहिकेमध्ये टाकून नेतात. 

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

तिन्ही व्हिडियोमधील व्यक्तीने पांढरा शर्ट घातलेला आहे. तसेच व्हिडियोमध्ये गुजराती भाषेतून लोक बोलत आहेत. व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून युट्युबवर व्हिडियो क्र. 3 मिळाला. त्यात हा व्हिडियो गुजरतच्या सुरमधील डिंडोली भागातील असल्याचे म्हटले आहे. तो व्हडियो तुम्ही येथे पाहू शकता – युट्युब

हा धागा पडकून सर्च केले असता दिव्य भास्कर या गुजराती वर्तमानपत्रातील बातमी मिळाली. यामध्ये व्हिडियो क्रमांक 1 बद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार, हा व्हिडियो सुरतमधील डिंडोली येथील आहे. गुजरातमध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन कोरोनाविषयी सर्वेक्षण करीत आहेत. डिंडोलीमधील अंबिका पार्क येथे मेडिकल टीम पोहचली असता या व्यक्तीने त्यांच्यावर धावून जात घराच्या बाल्कनीत येऊन “मला कोरोना झाला अशी ओरड केली”. त्यानंतर मेडिकल टीमला त्याने पळवून लावले. जेव्हा रुग्णवाहिका आली तेव्हा स्वतःहून स्ट्रेचरवर जाऊन बसला व त्याला दवाखान्यात नेण्यात आले. बातमीत हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे म्हटले आहे.

Divya-1.png

मूळ बातमी येथे वाचा – दिव्य भास्कर 

गुजरात समाचार वर्तमानपत्रात व्हिडियो क्रमांक 3 बद्दलची बातमी आढळली. यामध्ये म्हटले की, हा व्हिडियो सुरतच्या डिंडोली येथील असून, हा व्यक्ती मनोरुग्ण आहे. त्रिशुल न्यूज वरील बातमीत म्हटले की, हा कोरोनाचा रुग्ण नाही. तो मानसिक रोगी आहे. त्याच्यावर सुरत येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडियो चुकीच्या माहितीसह पसरविला जात आहे.

image6.png

मूळ बातमी येथे वाचा – गुजरात समाचारअर्काइव्ह

यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने सुरत येथील सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. केतन नायक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, सदरील व्हायरल व्हिडियोतील व्यक्तीला कोरोना झालेला नाही. तो एक मनोरुग्ण आहे. त्यामुळे कोरोनाचा रुग्ण म्हणून हा व्हिडियो व्हायरल करू नये.

सुरत येथील आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. आशिष नायक यांनी माहिती दिली की, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. हा व्हिडियो कोरोनाबाधित रुग्णाचा नाही. तो एक मनोरुग्ण आहे.

तिन्ही व्हिडियो एकाच व्यक्तीचे

फॅक्ट क्रेसेंडोने मग व्हिडियो क्रमांक तीनमध्ये दिसणाऱ्या रुग्णवाहिकेवर फोन लावला असता सांगण्यात आले की, हे तिन्ही व्हिडियो एकाच मनोरुग्णाचे आहेत. सुरत सिव्हिल रुग्णालयातील अधीक्षक डॉ. नायक यांनीदेखील याची पुष्टी केली, की हे तिन्ही व्हिडियो एकाच व्यक्तीचे आहेत.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, हे व्हिडियो कोरोनाबाधित रुग्णाचे नाहीत. गुजरातमधील डिंडोली (सुरत) येथील हा व्हिडियो आहे. व्हिडियोत दिसणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. त्याला कोरोनाची लागण झालेली नाही.

Avatar

Title:गुजरातमधील मनोरुग्णाचे व्हिडियो कोरोना पेशंट म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False