FACT CHECK: खरंच शबनम स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला ठरेल का?

False Headline सामाजिक

शबनम, स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला बनु शकते!अशा मथळ्याखाली एक बातमी सोशल मीडियावर शेयर होत आहे. यामध्ये दावा केला जातोय की, प्रेमाच्या आड येणाऱ्या आपल्याच कुटुंबातील सात जणांची हत्या करणारी उत्तरप्रदेशमधील शबनम स्वतंत्र भारतातील फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला ठरू शकते. खास रे या संकेतस्थळाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

मूळ बातमी येथे वाचा – खास रेअर्काइव्ह

फेसबुकवरदेखील या बातमीची लिंक शेयर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये लिहिले की, देशाला हादरवणाऱ्या या घटनेतील शबनमच्या कृत्याने आजही अंगावर शहारे येतात. तिच्या कृत्यामुळे पंचक्रोशीतील कोणीही मुलीचे नाव शबनम ठेवत नाही.

फेसुबकअर्काइव्ह

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी गावातील शबनम हिने 15 एप्रिल 2008 रोजी प्रियकर सलीमसोबत कट रचून प्रेमात अडसर ठरत असलेल्या स्वतःच्याच कुटुंबातील सात जणांची निघृणपणे हत्या केली होती. शबनम आणि सलीम यांना या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली असून, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रपतींनीदेखील शबनम हिचा दयेचा अर्ज फेटाळलेला आहे. त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी अपेक्षित आहे.

‘खास रे’ वेबसाईटवरील लेखात म्हटले की, (पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीत) तिची शिक्षा कायम ठेवली गेली तर स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा होणारी शबनम ही पहिली महिला असेल.

शब्दावली

बातमीची तथ्य पडताळणी करण्यापूर्वी न्यायव्यवस्थेतील शब्दावली समजून घेणे गरजेचे आहे.

  • फाशीची शिक्षा – Capital Punishment, Death Sentence, Death Penalty
  • फाशीची शिक्षा होणे/मिळणे/सुनावणे – To give/declare/award Death Penalty
  • फाशी देणे/ फाशीची अंमलबजावणी करणे – To execute death penalty, to be hanged

फाशीची शिक्षा होणे आणि फाशी देणे यामध्ये फरक आहे. फाशीची शिक्षा होणे म्हणजे तशी शिक्षा सुनावली जाणे किंवा तसा आदेश देणे. फाशी देणे म्हणजे त्या आदेशावर अंमलबजावणी करणे. औरंगाबाद येथील अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. स्वप्निल जोशी यांनी ही माहिती दिली.

‘खास रे’च्या बातमी – फाशीची शिक्षा होणारी – असे म्हटले आहे. म्हणजेच शबनम फाशीची शिक्षा मिळणारी/सुनावली जाणारी पहिली महिला ठरेल, असा याचा अर्थ होतो. याची फॅक्ट क्रेसेंडोने सत्य पडताळणी केली.

तथ्य पडताळणी

स्वतंत्र भारतामध्ये (1947 नंतर) आतापर्यंत कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतात फाशीची शिक्षा सुनावल्या गेलेल्या महिलांची माहिती पाहू.

सीमा गावित आणि रेणुका शिंदे

लहान मुलांचे अपहरण करून त्यांची निघृण हत्या करणाऱ्या रेणुका शिंदे आणि सीमा गावित या दोघी बहिणी होत्या. त्यांनी आई अंजनाबाई गावित व रेणुकाचा पती किरण शिंदे यांच्या मदतीने १९९० ते १९९६ दरम्यान भीकेसाठी १३ लहान मुलांचे अपहरण केले होते. अपहृत मुलांपैकी​ नऊ जणांचा त्यांनी खून केला होता. मात्र, सरकारला यातील पाच खून सिद्ध करता आले. अंजनाबाईचा मृत्यू १९९७ मध्ये झाला. (अधिक येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स)

कोल्हापूरमधील न्यायालयाने २८ जून २००१ रोजी या दोन्ही बहिणींना फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने ८ सप्टेंबर २००४ रोजी हा निर्णय कायम ठेवला. सर्वोच्च न्यायालयानेही 31 ऑगस्ट 2006 रोजी त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली. फाशीची शिक्षा माफ करावी यासाठी त्यांनी केलेला दयेचा अर्ज 2014 साली राष्ट्रपतींनी फेटाळल्याने त्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले.

जनसत्ता या संकेतस्थळाने 4 डिसेंबर 2017 रोजी दिलेल्या बातमीत स्पष्ट म्हटले आहे की, गावित भगिनी या स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा मिळालेल्या पहिल्या महिला आहेत. (अधिक येथे वाचा – जनसत्ता)

नागपूरस्थित वकील अ‍ॅड. सुदीप जैस्वाल यांनी दोन्ही बहिणींचा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला होता. या अ‍ॅड. जैस्वाल यांच्याशी आम्ही संपर्क केला. त्यांनी सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या महिलेला मिळालेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची पहिली वेळ म्हणजे गावित भगिनींचे प्रकरण. राष्ट्रपतींनीदेखील त्यांचा दयेचा अर्ज फेटाळला होता. फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झालेल्या (Confirmed) गावित भगिनी पहिल्या महिला आहेत.”

शबनम हिला जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा टाईम्स ऑफ इंडियाने केलेल्या बातमीत, भारतात आतापर्यंत कोणकोणत्या महिलांना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा फर्मावली आहे त्यांची नावे दिली आहेत. ती तुम्ही खाली पाहू शकता.

यानुसार, रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांचा पहिला क्रमांक आहे, त्यानंतर सोनिया नामक महिलेची 2007 साली सर्वोच्च न्यायालयाने फाशी कायम केली. फाशीची शिक्षा मिळालेली शबनम ही तिसरी महिला आहे, असे बातमीत म्हटले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियाअर्काइव्ह

‘खास रे’ संकेतस्थळावरील बातमी लल्लनटॉप या हिंदी वेवसाईटवरील बातमीशी बरीचशी साम्य असणारी आहे. लल्लनटॉपने 22 जानेवारी 2019 रोजी ही बातमी दिली होती. परंतु, त्यांनी शीर्षक – कहानी शबनम की, जो फांसी पाने वाली भारत की पहली औरत हो सकती है असे दिले. याचा अर्थ होतो की, शबनम ही भारतात फाशी दिली जाणारी पहिली महिला ठरू शकते.

मूळ बातमी येथे वाचा – लल्लनटॉपअर्काइव्ह

पहिल्या महिला ज्यांना स्वतंत्र भारतात फाशी मिळू शकते, अशा मथळ्याखाली गावित बहिणीविषयीदेखील बातम्या आल्या आहेत. त्या तुम्ही येथे वाचू शकता – आजतक, डीएनए, स्क्रोल सत्याग्रह.

निष्कर्ष

‘फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला’ आणि ‘जिला फाशी दिली जाईल अशी पहिली महिला’ या दोन्ही वाक्यांमध्ये फरक आहे. फाशीची शिक्षा होणाऱ्या पहिल्या महिला गावित भगिनी आहेत. त्यामुळे शबनम फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला बनू शकते हे विधान असत्य ठरते.

Avatar

Title:FACT CHECK: खरंच शबनम स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा होणारी पहिली महिला ठरेल का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False Headline