ऑस्ट्रेलियाच्या अंतराळवीराने अवकाशयानातून पृथ्वीवर उडी मारल्याचा हा व्हिडिओ आहे का?

False आंतरराष्ट्रीय

ऑस्ट्रेलियाच्या एका अंतराळवीराने भीमकाय पराक्रम करीत अवकाशयानातून 1236 किमी उंचीवरून पृथ्वीवर उडी मारली, असा एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे. केवळ 4 मिनिटामध्ये अंतर कापत तो पृथ्वीवर परतला, असेदेखील व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, ही माहिती दिशाभूल करणारी आहे. जाणून घेऊया सत्य काय आहे.

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अंडाकृती कॅप्सुलमधून उडी मारतो आणि फ्रीफॉल करत पृथ्वीचे दिशेने पडू लागतो. खाली त्याला तांत्रिक सपोर्ट देणारी टीम त्याला मार्गदर्शन करतात. व्हिडिओच्या शेवटी फेलिक्स नावाचा ही व्यक्ती पॅराशूटच्या आधारे जमिनीवर सुरक्षित उतरते.

या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “ऑस्ट्रेलियन अंतराळविराने स्पेसशिपपासून 128000 फूट उंचीवरून उडी मारली आणि 1236 किलोमीटरचा प्रवास करत 4 मिनिटे 5 सेकंदात पृथ्वीवर पोहोचला त्याने पृथ्वीला स्पष्टपणे फिरताना पाहिले चकित करणारा व्हिडिओ नक्की बघा. सौजन्य:BBC”

मूळ व्हिडिओ – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम बीबीसीचा लोगो असणारा हा मूळ व्हिडिओ शोधला. बीबीसी साऊंडसच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. सोबत दिलेल्या माहितीमध्ये म्हटले की, फेलिक्स बॉमगार्टनर नावाच्या स्कायडायव्हरने रेड बुल स्पेस जम्प नावाच्या मिशनअंतर्गत ही उडी मारली होती. त्याचा हा व्हिडिओ आहे. 

हा धागा पकडून अधिक शोध घेतल्यावर बीबीसी वेबसाईटवर 14 ऑक्टोबर 2012 रोजी प्रकाशित झालेली बातमी आढळली. त्यानुसार, फेलिक्स बॉमगार्टनर हा आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जाणारा पहिला व्यक्ती ठरला होता. 

त्याने एका फुग्यातून 1 लाख 28 हजार 100 फूट म्हणजेच सुमारे 39 किमी अंतरावरून उडी मारली होती. फेलिक्स हा युरोपातील ऑस्ट्रिया देशाचा नागरिक असून, त्याने 9 मिनिट 3 सेकंदामध्ये 39 किमी अंतर उडी मारून पूर्ण केले होते.

त्याने उडी का मारली होती?

रेड बुल कंपनीतर्फे स्टॅटोस नावाचा एक प्रकल्प चालविला जातो. मानवी क्षमतेची कसोटी पाहणारे स्टंट याद्वारे केले जातात. त्याअंतर्गतच फेलिक्सने सर्वात उंचावरून उडी मारण्याचे धाडस केले होते. 

एका बलूनच्या आधारे तो 39 किमी उंच अंतरावर पोहचला होता. तेथून त्याने न्यू मेकिस्कोच्या आकाशात उडी मारली. फ्रीफॉलदरम्यान त्याने ताशी 1342 किमी इतका वेग गाठला होता. सुमारे 4 मिनिट 20 सेंकद तो फ्रीफॉलमध्ये होता. जमिनीपासून सुमारे अडीच किमी अंतरावर असताना त्याने पॅराशूट उघडले आणि तो जमिनीवर सुरक्षित उतरला. 

फेलिक्स बॉमगार्टनर. सौजन्य – रेड बुल

येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे फेलिक्सने अवकाशातून उडी मारलेली नाही. अवकाशाची सीमा पृथ्वीपासून सुमारे 100 किमी दूर आहे. 

यशस्वी उडीसह फेलिक्सने 1960 सालचा 31 किमीवरून उडी मारण्याचा विक्रम मोडीत काढला. परंतु, 2014 साली अ‍ॅलन युस्टेस याने 41 किमी उंचावरून उडी मारून फेलिक्सचाही विक्रम मोडला.

कोण आहे फेलिक्स बॉमगार्टनर?

फेलिक्सचा जन्म 1969 साली ऑस्ट्रिया देशात झाला. वयाच्या सोळाव्या वर्षीपासून त्याने स्कायडायव्हिंग सुरू केली. आतापर्यंत त्याने 2500 वेळा अशी जोखमीची उडी मारलेली आहे. 

तो ऑस्ट्रियन सैन्यदलाच्या डेमोस्ट्रेशन टीमचा सदस्यदेखील होता. त्याच्या कर्तबागारीमुळे त्याला ‘नॅशनल जिओग्राफिकच्या पीपल्स चॉईस अ‍ॅडव्हेंचरर ऑफ द इयर’ हा पुरस्कारदेखील मिळालेला आहे. 

रेड बुल स्टॅटोस प्रकल्पाच्या वेबसाईटवर फेलिक्सच्या उडीचे सुमारे दोन तासांचे संपूर्ण प्रक्षेपण पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सदरील व्हिडिओ ऑस्ट्रेलियाच्या अंतराळवीर नाही, तो ऑस्ट्रियन स्कायडाईव्हर आहे. त्याने अवकाशयानातून नाही, तर बलूनमधून उडी मारली होती. तसेच त्याने 1236 किमी उंचीवरून नाही, तर 39 किमी उंचीवरून उडी मारली होती. शिवाय त्याने हे अंतर 4 मिनिटांत नाही, तर 9 मिनिटांमध्ये पूर्ण केले होते. थोडक्यात काय तर या व्हिडिओसोबत दिशाभूल करणारी माहिती शेअर केली जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:ऑस्ट्रेलियाच्या अंतराळवीराने अवकाशयानातून पृथ्वीवर उडी मारल्याचा हा व्हिडिओ आहे का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False