अमेरिकेने 19 फेब्रुवारीला जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित केले का? वाचा सत्य

False सामाजिक

मुघल सत्तेला कडवी झुंज देणारे, आपल्या मुठभर मावळ्यांच्या जोरावर हजारोंच्या फौजेला सळो की पळो करणारे, मराठा सम्राज्याची उभारणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज न केवळ महाराष्ट्राचे तर संपूर्ण देशाचा अभिमान आहेत. त्यांच्या शौर्य-पराक्रमाचे थोरवी सर्वत्र पसरलेली आहे, यात काही दुमत नाही. अशा या महान राजाचा सन्मान करण्यासाठी अमेरिकेने शिवजयंतीला (19 फेब्रुवारी) जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित केल्याचा सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे. एवढेच नाही तर शंभर डॉलरच्या नोटेवरसुद्धा महाराजांचा फोटो छापल्याचेही म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेली 100 डॉलर्सच्या नोटेचा फोटो आहे. सोबत लिहिलेले आहे की, सर्वात मोठी आनंदाची बातमी. भारतासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. अमेरिकेने घोषित केले की, 19 फेब्रुवारी हा दिवस जागतिक “छत्रपती दिन” म्हणून पाळला जावा. कारण या दिवशी जगतविख्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. या बद्दल अमेरिकेचे विशेष आभार. हा संदेश आपणास जेवढा पसरविता येईल तेवढा पसरवा. भारताला मिळालेला हा शिवराय यांच्यामुळे आणखी एक मोठा सम्मान आहे. जे काम भारताने करायला हवे ते अमेरिकने करून दाखवले. हा असतो खरा सन्मान.

तथ्य पडताळणी

अमेरिकेने खरंच असा काही निर्णय घेतला आहे का याचा शोध घेतला असता कोणतीही अधिकृत बातमी अथवा माहिती आढळली नाही. शिवाजी महाराजांच्या नावे जर अमेरिकेने असा निर्णय घेतला असता तर नक्कीच मोठी बातमी ठरली असती. मोठ्या गाजावाजासह या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असते. परंतु, तसे काही झाल्याचे कोणतीही बातमी किंवा घटना इंटरनेवर उपलब्ध नाही.

एखादी व्यक्ती, गट, प्रदेश, किंवा घटना अशा काही गोष्टींचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या नावे एखादा दिवस, आठवडा किंवा महिना घोषित करण्याची सगळ्या जगात पद्धत आहे. अमेरिकेतही विविध दिन साजरे केले जातात. मग अमेरिकेत एखादा दिवस घोषित करण्याची पद्धत काय याचा फॅक्ट क्रेसेंडोने शोध घेतला.

अमेरिकेत एखादा दिन घोषित करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला देण्यात आला आहे. अमेरिकेच्या कोड ऑफ रेग्युलेशन 19.4 नुसार, अमेरिकेत विशेष दिन अथवा कार्यक्रम घोषित करण्यात येतो. एखादा तारखेला विशेष दिन घोषित करण्याचा प्रस्ताव त्या तारखेच्या किमान 60 दिवसांच्या आधी व्हाईट हाऊसमधील मेनेजमेंट व बजेट ऑफिसचे संचालकांकडे पाठवावा लागतो. मग तो प्रस्ताव राष्ट्राध्यक्षांकडे पाठवला जातो. राष्ट्राध्यक्षांच्या सहीनंतर त्याची घोषणा करण्यात येते.

मूळ नियम येथे वाचा – US Government InformationCongressional Research Service

अमेरिकेत साजरे केले जाणारे दिवस कोणते याचा शोध घेतला असता त्या यादीमध्ये शिवाजी महाराजांचे नाव नाही. अमेरिकेत शिवाजी महाराजांच्या नावे कोणताही दिवस साजरा केला जात नाही. तसेच, संयुक्त राष्ट्रातर्फे (UN) जागतिक दिन घोषित करण्यात येतात. प्रत्येक देश आपापल्या देशातील दिन निवडू शकतो. त्यामुळे अमेरिकेने जागितक दिन घोषित केला, असे म्हणने चूकीचे ठरते.

मग 100 डॉलर्सवर शिवाजी महाराजांचा फोटो कसा?

100 डॉलरच्या नोटेवर तुम्हीसुद्धा तुमचा फोटो टाकू शकता. FAKE Personalized 100 Dollar Bill असे गुगलवर सर्च केल्यावर तुम्हाला असे अनेक ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन्स मिळतील. यामध्ये तुम्हाला हवा तो फोटो 100 डॉलरच्या नोटेवर एडिट करून टाकता येतो. विशेष म्हणजे सगळ्या नोटांवर एकच नंबर येतो. केवळ फोटो बदलतो. याची काही उदाहरणे खाली दिलेली आहेत.

अमेरिकेतील चलनी नोटा आणि नाण्यांची डिझाईन आणि निर्मितीची जबाबदारी एनग्रेविंग आणि प्रिंटिंग ब्युरोकडे (BEP) आहे. अमेरिकेच्या कोषागार विभागांतर्गत हा विभाग येतो. त्यांच्या वेबसाईटवर अमेरिकेत चलनात असलेल्या 1 डॉलरपासून ते 100 डॉलरपर्यंतच्या नोटांची सविस्तर माहिती दिलेली आहे. अमेरिकेत 1914 मध्ये सर्वप्रथम शंभर डॉलरची नोट चलनात आली. त्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती राहिलेले बेंजमिन फ्रँकलिन यांचे छायाचित्र वापरण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत नोटेवर बेंजमिन फ्रँकलिन यांचाच फोटो कायम ठेवण्यात आला. आहे.

निष्कर्ष

अमेरिकेने 19 फेब्रुवारी जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित केलेले नाही. तसेच, शंभर डॉलर्सच्या नोटेवरदेखील शिवाजी महाराजांचा फोटो छापलेला नाही. शिवाजी महाराजांचा पराक्रम सर्व जगाने मान्य केलेला आहे. महाराजांचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की, त्यांना अशा अफवांची गरज नाही. अमेरिकेने घोषित करो अथवा ना करो, त्यांची जयंती ही तमाम भारतवासीयांसाठी छत्रपती दिनच आहे!

Avatar

Title:अमेरिकेने 19 फेब्रुवारीला जागतिक छत्रपती दिन म्हणून घोषित केले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False