चीनमधील धरणाचा व्हिडिओ कोयना धरणातील पाणी विसर्ग म्हणून व्हायरल

False सामाजिक

मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, पाणी साचल्याने व दरड कोसळल्याने अनेक महामार्ग बंद करावे लागले.

या पार्श्वभूमीवर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कोयना धरणातून पाणी सोडतानाचा आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ चीनमधील धरणाचा आहे.

काय आहे दावा?

धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याचे व्हायरल क्लिपमध्ये दिसते. सोबत म्हटले की, हे कोयना धरण आहे. 

मूळ पोस्ट – इन्स्टाग्राम

तथ्य पडताळणी

व्हिडिओतील कीफ्रेम निवडून रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, इंटरनेटवर हा व्हिडिओ अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. हा व्हिडिओ 2020, 2019 आणि 2018 साली चीनमधील येलो नदीवरील धरण म्हणून शेअर करण्यात आलेला आहे. 

येलो नदी चीनमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. 2018 साली या नदीला अनेकदा पूर आले होते.

चीनमधील हिनान प्रांतामध्येस्थित या धरणाचे नाव Xiaolangdi Dam असे आहे. धरणामध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडे करून असे पाणी सोडण्यात येते. 

या धरणाची रचना अशी आहे की, यातून पाणी सोडल्यावर ते उंचावर फेकले जाते आणि मग खाली कॅनॉलमध्ये पडून ते नदीद्वारे पुढे जाते.

मूळ बातमी – HitFull

या धरणातून पाणी सोडताना पाहणे चीनमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. धरणातून पाणी बाहेर पडताना पाहण्यासाठी हजारो पर्यटक तेथे येतात.

गुगल मॅपवर हे धरण तुम्ही पाहू शकता. विशेष चीनमधील याच धरणाचा व्हिडिओ 2019 साली पुण्याजवळी पवना धरण म्हणूनदेखील शेअर करण्यात आला होता.

मग कोयना धरणाचे काय?

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे कोयना धरणाचा साठा वाढला आहे. केवळ चोविस तासांमध्ये सुमारे 10 टीएमसी पाणी धरणात वाढले. 

त्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गेल्या आठवड्यात धरणाचे दीड फुट दरवाजा उघडण्यात आले होते, ज्यातून 10 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला होता.

कोयना धरणातून पाणी सोडतानाचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, चीनमधील येलो नदीवरील धरणाचा व्हिडिओ महाराष्ट्रतील कोयना धरण म्हणून शेअर करण्यात येत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:चीनमधील धरणाचा व्हिडिओ कोयना धरणातील पाणी विसर्ग म्हणून व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False