केरळमधील एका वर्षापुर्वीचा व्हिडिओ CAA, NRC समर्थकांच्या रॅलीचा म्हणून व्हायरल

False राजकीय

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी म्हणजेच एनआरसीच्या समर्थनार्थ आणि विरोधात आंदोलन सुरु आहे. केरळमध्ये CAA आणि NRC समर्थनार्थ एक रॅली निघाली होती. या रॅलीवर हल्ला झाल्याचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सचिन जयंतराव लोणकर आणि प्रशांत गजभिये यांनीही अशाच माहितीसह हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आम्ही या व्हिडिओचा युटुयूबवर शोध घेतला. त्यावेळी आम्हाला द टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाने त्यांच्या युटूयूब चॅनलवर 3 जानेवारी 2019 रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ दिसून आला. हा तोच व्हिडिओ आहे जो सध्या समाजमाध्यमात सीएए आणि एनआरसी समर्थकांचा म्हणून पसरत आहे. या व्हिडिओच्या शीर्षकात लिहिले होते की, केरळमधील मल्लापूरम जिल्ह्यात एडप्पल येथे जमावाने शबरीमाला प्रकरणात बंदचे समर्थन करणाऱ्यांवर हल्ला केला. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास विरोध दर्शविण्यासाठी शबरीमाला कर्म समितीने हा बंद पुकारला होता. या माहितीतुन हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ सीएए आणि एनआरसी समर्थकांचा नाही.

Archive

त्यानंतर एशियानेटद्वारे 3 जानेवारी 2019 रोजी प्रकाशित करण्यात आलेले वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्ताच्या शीर्षकात लिहिले आहे की, सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी एडप्पल येथे भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली. या व्हिडिओत वृत्तनिवेदक सांगत आहे की, शबरीमाला येथील मंदिरात महिलांच्या प्रवेशाला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने व्यापारी आणि स्थानिक लोक रस्त्यावर उतरले होते. मलप्पुरम जिल्ह्यातील एडप्पल येथे भाजप आणि सीपीएमच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. हा संघर्ष मिटविण्याचा प्रयत्न करणारे सहा पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भाजप कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली त्यावेळी सीपीएम कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

Archive

त्यानंतर आम्ही एशियानेटचे प्रतिनिधी प्रशांत निलाम्बुर यांच्याशी संपर्क साधला. निलाम्बुर यांनी एक वर्षापुर्वी या घटनेचे वृत्तांकन केले होते. त्यांनी ही घटना एक वर्षापुर्वीची असल्याच्या बाबीला दुजोरा दिला. हिंसाचाराची ही घटन किरकोळ स्वरुपाची होती. ती वेळीच आटोक्यात आणण्यात आली. या दुचाकी जप्त करण्यात आल्या आणि त्या पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आल्या होत्या. या घटनेचा आणि CAA, NRC समर्थनाचा कोणताही संबंध नाही.

निष्कर्ष  

समाजमाध्यमात पसरत असलेला केरळमधील व्हिडिओ हा गतवर्षीचा आहे. त्याचा सीएए आणि एनआरसी समर्थनाशी कोणताही संबंध नाही. 

Avatar

Title:केरळमधील एका वर्षापुर्वीचा व्हिडिओ CAA, NRC समर्थकांच्या रॅलीचा म्हणून व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False