
नागरिकत्व सुधारित कायद्याला (CAA) विरोध करणाऱ्यांना धमकी देणारा एक व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडियोतील व्यक्ती भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देताना दिसतो. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, धमकी देणारा हा व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी करून सत्य समोर आणले.
काय आहे पोस्टमध्ये?
सोशल मीडियावरील चार मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये सदरील व्यक्ती म्हणतो की, “…नरेंद्र मोदी के खिलाफ जो भी बोलेगा, अभी तो कॉलेज में घुस के मार रहे है ना…अगर बहुत ज्यादा बोलोगे तो हम तुम्हारे घरों मे भी घुसेंगे और जान से भी मार देंगे. हम को कोई नहीं रोकेगा…सब पत्रकार हमारे साथ, पुरा आरएसएस हमारे साथ है…”
भाजप सरकारच्या टीकाकारांना कथितरीत्या धमकी देणारा हा व्यक्ती भाजप कार्यकर्ता असल्याचा दावा केला जात आहे. मग सत्य काय आहे?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक
तथ्य पडताळणी
व्हिडियोमध्ये Times of Today नावाच्या चॅनेलचे माईक दिसते. त्यानुसार सर्च केल्यावर युट्यूबवर या नावाचे अकाउंट आढळले. तेथे हा व्हायरल होत असलेला व्हिडियो सापडला. हा व्हिडियो ज्या मुलाखतीमधून घेतला आहे तो संपूर्ण 19 मिनिटांचा व्हिडियोसुद्धा या अकाउंटवर उपलब्ध आहे. तो 6 जानेवारी रोजी अपलोड करण्यात आला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. व्हिडियोच्या शीर्षकानुसार, हा व्यक्ती “बनारस वाले मिश्रा जी” आहे.
संपूर्ण व्हिडियो ऐकल्यावर कळते की, हा व्यक्ती भाजप सरकारवर कडाडून टीका करीत आहे. भाजप कशाप्रकारे विरोधकांना दडपून टाकतेय, त्यांना देशद्रोही, दंगेखोर म्हणून जेलमध्ये टाकत आहे चिंताजनक असल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे. व्हायरल होत असलेल्या अर्धवट क्लिपमध्ये असे भासवले जातेय की, तो धमकी देत आहे. परंतु, हे खोटं आहे. भाजप कशाप्रकारे टीकाकारांचे तोंड बंद करण्याचे काम करते हे तो या व्हिडियोत सांगत आहे. तो कोणालाही धमकी देत नाहीए.
मग हे मिश्रा भाजपचे कार्यकर्ते आहेत का?
याचे उत्तर – “नाही”
या व्यक्तीचे नाव हरीश मिश्रा आहे. ते वाराणसीमध्ये राहतात. याच युट्यूब चॅनेलवरील एका मुलाखतीमध्ये त्यांनी स्वतःविषयी माहिती सांगितलेली आहे. त्यानुसार, महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी भगत सिंग युथ ब्रिगेड ही विद्यार्थी संघटना सुरू केली होती. नंतर 2016 साली ते काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष झाले. परंतु, 2018 मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. ते भाजपचा कार्यकर्ते नाहीत.
‘आज तक’नुसार मिश्रा यांनी सेवा दल सोडल्यानंतर मुलायम सिंग यांचे लहाने भाऊ शिवपाल यादव यांच्याशी ते जोडले गेले. परंतु, काँग्रेसशी त्यांची निष्ठा कायम आहे. सोशल मीडियावर ते “बनारस के मिश्रा जी” म्हणून प्रसिद्ध आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोने हरीश मिश्राशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, ते भाजपचे कार्यकर्ते नाहीत. CAA विरोधकांवर भाजपने केलेल्या हिंसाचारावर टीका करताना या व्हिडियोमध्ये त्यांनी उपरोधाने असे म्हटले होते. त्याचा उलटा अर्थ काढला जात आहे.
यापूर्वीदेखील या हरीश मिश्रांचा एक व्हिडियो अशाच चुकीच्या दाव्यासह व्हायरल झाला होता. तेव्हादेखील फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी करून सत्य समोर आणले होते.
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, व्हिडियोतील व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता नाही. तसेच त्याने धमकीदेखील दिलेली नाही. हा अर्धवट व्हिडियो आहे. या व्यक्तीचे नाव हरीश मिश्रा आहे. ते काँग्रेस सेवा दलाचे 2016 ते 2018 दरम्यान वाराणसी जिल्हाध्यक्ष होते

Title:टीकाकारांना ठार मारण्याची “धमकी” देणारा हा कार्यकर्ता भाजपचा नाही. शेयर करण्यापूर्वी वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
