ठाणे शहरात सिंहाचा कळप आला नव्हता. तो व्हिडियो गुजरातमधील आहे. वाचा सत्य

False सामाजिक

सुनसान रात्रीच्या अंधारात गल्लीतील कुत्रे भुंकत आहेत. हे भुंकणे नेहमीपेक्षा जरा वेगळे वाटतेय. रात्रीचे दीड-दोन झाले आहेत. गल्लीतले सगळे लोक झोपलेले. रिमझिप पाऊस सुरू आहे. रस्ते चिखलाने माखलेले. मग गल्लीत हळूच एक प्राणी येतो. त्याला पाहून कुत्रे आणखी जोरजोरात भुंकू लागतात. मग या प्राण्यांचा एक कळपच गल्लीच्या रस्त्यांवर फिरू लागतो. नीट पाहिल्यावर लक्षात येते की, हा सिंहाचा कळप आहे. दाटवस्तीच्या गल्लीत सात-आठ सिंहाचा कळप आला. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली नसती तर कोणी विश्वास ठेवला नसता. पाहता पाहता हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मग हा व्हिडियो नेमका कुठला यावरून निरनिराळे दावे करण्यात येऊ लागले. अनेक जणांनी हा व्हिडियो ठाणे शहरातील असल्याचा दावा केला. तशा फेसबुकवर पोस्टदेखील केल्या. ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावर 11 सप्टेंबरला रात्री दोन वाजता सिंहाचा कळप आल्याचे म्हटले जाऊ लागले. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

सुमारे दोन मिनिटांच्या व्हिडियोमध्ये सात सिंहाचा एक कळप गल्लीतील रस्त्यावर फिरताना दिसतो. कोणी तरी घराच्या गेटमधून हा व्हिडियो चित्रित केला आहे. हा व्हिडियो ठाण्यातील घोडबंदर रोडवरील असल्याचा दावा केला जात आहे.

तथ्य पडताळणी

मुंबईत राष्ट्रीय उद्यान आहे आणि तेथे बिबट्या दिसण्याच्या घटना घडत असतात. परंतु, मुंबई परिसरात सिंह आढळणे आश्चर्याची बाब आहे. ठाण्यात सिंह दिसला असता तर नक्कीच याची मोठी बातमी होईल. परंतु, इंटरनेवर सर्च केल्यावर ठाण्यात असे काही झाल्याची कोणतीही बातमी नाही. मग या व्हिडियोची सत्यता काय?

व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडियो गुजरातच्या जुनागड शहरातील आहे. एक-दोन दिवसांपूर्वी तेथे रात्री उशिरा सिंहाचा हा कळप दिसला होता. न्यूज-18 चॅनेलने यासंदर्भात बातमीसुद्धा दिली आहे. ट्विटरवर हा व्हिडियोसुद्धा शेयर केला आहे. त्यानुसार, गिरनार वन्यजीव अभयारण्यापाशी असलेल्या जुनागडच्या एका गल्लीत हे सिंह पाहायला मिळाले होते.

अर्काइव्ह

आशिया खंडात केवळ गिरनार जंगलातच सिंहाचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. यापूर्वीदेखील येथील लोकवस्तीमध्ये सिंह आल्याच्या घटना या परिसरात घडलेल्या आहेत. अतिवृष्टी आणि पूरामुळे सिंह लोकवस्तीमध्ये आले असावेत असा अंदाज आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने जुनागड येथील उप वनसंरक्षक सुनील बेरवाल यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, हा व्हिडियो जुनागडमधील आहे. तसेच त्यांनी ट्विटरवर यासंबंधी खुलास केल्याची माहिती दिली. गिरनार अभयारण्यातील हे सिंह अधूनमधून जुनागडच्या रस्त्यावर फिरतात. त्यात विशेष असे काही नाही. तसेच या व्हिडियोद्वारे चुकीचा दावा करून भीती न पसरिवण्याचे त्यांनी आवाहन केले.

अर्काइव्ह

यापूर्वी सांगलीमध्ये किंग कोब्रा साप आढल्याचाही व्हिडियो व्हायरल झाला होता. परंतु, फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा सिद्ध झाला होता. घरातून किंग कोब्रा पकडण्याचा व्हिडियो कर्नाटकमधील पश्चिम घाटातील एका खेड्याचा होता.

निष्कर्ष

ठाणे शहरात रात्री सिंह आल्याचा व्हिडियो मूळात गुजरातच्या जुनागड शहरातील आहे. तेथील उप वनसंरक्षक सुनील बेरवाल यांनी याला पुष्टी दिली आहे. गिरनार अभयारण्याजवळ असणाऱ्या जुनागडमध्ये सिंह येत असतात. त्यामुळे खोटी माहिती लोकांना शेयर करून भीतीचे वातावरण न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Avatar

Title:ठाणे शहरात सिंहाचा कळप आला नव्हता. तो व्हिडियो गुजरातमधील आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False