Fact Check : रामायणातील जटायू केरळमध्ये पाहण्यात आला?

False सामाजिक

रामायणात दिसणारा *जटायू पक्षी* केरळ मध्ये पाहण्यात आला. खूपच दुर्मिळ आहे हा पक्षी, तरी पहा आणि आनंद घ्या, असा दावा करणारा व्हिडिओ क्लब या फेसबुक पेजवरुन पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी 

हा पक्षी जटायू आहे का याचा शोध घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे या पक्षाचा शोध घेतला. त्यावेळी खालील परिणाम समोर आला. 

या परिणामातील द डोडो या संकेतस्थळावर 9 जून 2018 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात हा अँडियन कॉन्डोर प्रजातीचा  पक्षी म्हणजेच दक्षिण अमेरिकेत आढळणारे एक गिधाड असल्याचे म्हटले आहे. विषबाधा झालेला हा पक्षी डिसेंबर 2012 मध्ये अर्जेटिनात सापडला होता. ब्युनोस आयर्स प्राणीसंग्रहालयात या पक्षावर उपचार करण्यात आले. जवळपास 16 महिन्याच्या उपचारानंतर 28 मार्च 2014 रोजी हा पक्षी निसर्गात मुक्त करण्यात आला. एका पर्वतावर या पक्षाला मुक्त करण्यासाठी सगळे जमा झाले होते, त्यावेळी हा व्हिडिओ बनविण्यात आला. 

संकेतस्थळावरील मूळ वृत्त द डोडो / संग्रहित केलेले वृत्त

या पक्षाच्या सुटकेचा मूळ व्हिडिओ आम्हाला युटूयूब आढळला. तो आपण खाली पाहू शकता. यातील काही भागच समाजमाध्यमावर टाकून तो जटायू असल्याचे सांगण्यात येत आहे.

केरळमध्ये कोणते पक्षी आढळतात. केरळमध्ये खरंच जटायू आहे का? याचाही आम्ही शोध घेतला तेव्हा केरळमध्ये लंकन फ़्रॉगमाऊथ, रॅकेट टेल्ड ड्रॉंगो, ब्रॉंझ ड्रॉंगो, व्हाइटबिलियड ट्रीपि, शामा, पिवली भिवईवाला बुलबुल, रुफ़स बाबलर, मालाबार शुकपक्षी, व्हाइटबिलियड ब्ल्यू फ़्लायकॅचर, मालाबार ग्रे हॉर्नबिल (राखी धनेश), यासारखे पक्षी आढळत असल्याचे दिसून आले. केरळमध्ये पक्षाचा 300 हून अधिक पक्षांच्या प्रजाती आढळतात मात्र त्यात जटायूच्या नावाचा उल्लेख आम्हाला दिसून आला नाही. केरळा टूरिझम या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झव्‍‌र्हेशन फॉर नेचरच्या संकेतस्थळावरही याबाबतची माहिती दिसत नाही.

निष्कर्ष

हा अँडियन कॉन्डोर प्रजातीचा पक्षी म्हणजेच दक्षिण अमेरिकेत आढळणारे एक गिधाड आहे. अर्जेटिनात विषबाधा झाल्याने त्याच्यावर उपचार करुन त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे. हा पक्षी केरळमधील जटायू पक्षी आहे ही बाब फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळली आहे. 

Avatar

Title:Fact Check : रामायणातील जटायू केरळमध्ये पाहण्यात आला?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False