तन्मय बक्षी गुगलमध्ये नोकरी करीत नाही आणि त्याला 60 लाख रुपये दरमाह पगारही नाही.

False सामाजिक

बुद्धिमत्तेच्या जोरावर लहान वयातच देदिप्यमान यश मिळवणाऱ्या मुलांची अनेक उदाहरण आहेत. तन्मय बक्षी हे नावदेखील अशाच एका बुद्धिमान मुलाचे आहे. वयोवर्ष अवघे 15. जगभरात तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विषयातील तज्ज्ञ मानला जातो. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, तन्मय बक्षी गुगलमध्ये नोकरी करीत असून त्याला महिन्याला 60 रुपये आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्टमध्ये तन्मय बक्षीच्या मुलाखतीचा सुमारे सहा मिनिटांचा व्हिडियो शेयर केलेला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 13 वर्षाचा तन्मय बक्षी हा भारतीय वंशाचा मुलगा दरमहा 60 लाख रु. पगारावर गुगलमध्ये नोकरीत आला आहे। त्याचा हा इंटरव्ह्युव बघा.

तथ्य पडताळणी

पोस्टमध्ये दिलेल्या मुलाखातीमध्ये कुठेही म्हटलेले नाही की, हा मुलगा गुगल कंपनीत नोकरी करतो. व्हिडियोमध्ये तो लहानपणापासून कॉम्प्युटर आणि तंत्रज्ञानात कशी आवड निर्माण झाली हे सांगतो. त्यामुळे गुगलवर त्याचा शोध घेतला.

तन्मय बक्षीच्या लिंक्डइन आणि ट्विटर प्रोफाईलनुसार, तो कॅनडा येथील आहे. तो आयबीएन चॅम्पियन (क्लाऊड), गुगल डेव्हलपर्स एक्सपर्ट, टेड व कीनोट स्पीकर आणि हॅलो स्वीफ्ट पुस्ताकाचा लेखक आहे. त्याचे तन्मय टीचेस नावाचे युट्यूब चॅनेलदेखील आहे. येथेसुद्धा तो गुगलमध्ये नोकरी करण्याचा उल्लेख नाही.

मूळ प्रोफाईल येथे पाहा – LinkedIn

गुगल डेव्हलपर्स एक्सपर्ट काय आहे?

गुगल कंपनीतर्फे गुगल डेव्हलपर्स एक्सपर्ट (GDE) नावाचा एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गुगल तंत्रज्ञानातील विविध विषयांच्या तज्ज्ञांना कंपनीतर्फे प्रमाणित करण्यात येते. तन्मय बक्षी हा मशीन लर्निंग विषयातील एक्सपर्ट आहे. कंपनीच्या वेबसाईटवर स्पष्ट म्हटले आहे की, गुगल डेव्हलपर्स एक्सपर्ट हे गुगलचे कर्मचारी नसतात. ते गुगलमध्ये नोकरी करीत नाही.

मूळ नियम येथे वाचा – GDE

या उपक्रमाच्या नियम व अटींमध्येसुद्धा नमुद करण्यात आले आहे की, जे उमेदवार गुगल डेव्हलपर्स एक्सपर्ट असतात ते गुगलचे कर्मचारी नसतात. कंपनीतर्फे त्यांना पगार किंवा मानधन दिले जात नाही. तसे करणाऱ्याला या उपक्रमातून बेदखल करण्यात येते. 

मूळ नियम व अटी येथे वाचा – GDE Conditions

वरील गोष्टींवरून सिद्ध होते की, तन्मय बक्षीला गुगल डेव्हलपर्स एक्सपर्ट म्हणून मान्यता असली म्हणजे तो गुगलमध्ये नोकरी करत नसतो. त्याच्याविषयी जगभरात जेव्हा असे दावे करण्यात येऊ लागले, तेव्हा त्याने ट्विट करून जाहीर केले होते की, तो गुगल किंवा फेसबुक या कंपन्यांमध्ये नोकरीला नाही. ते ट्विट तुम्ही खाली पाहू शकता.

अर्काइव्ह

कोण आहे तन्मय बक्षी?

भारतीय वंशाच्या तन्मयचे वडिल पुनीत बक्षी हे कॉम्प्युटर प्रोग्रामर आहेत. लहानपणापासून त्याला कॉम्प्युटर प्रोग्रामिंगची आवड आहे. वयाच्या सातव्या वर्षी त्याने तन्मय टीचेस नावाचे युट्यूब चॅनेल सुरू केले होते. त्यावर तो लहान मुलांना तंत्रज्ञानाविषयी माहिती देत असे. त्यानंतर अकराव्या वर्षी त्याने आयबीएमच्या एका सॉफ्टवेयरमधील एक त्रुटी शोधून काढली होती. त्यानंतर आयबीएम कंपनीने त्याला बोलावून कौतुक केले होते. तन्मयने विविध देशामध्ये भाषण केले आहे. तो कोणत्याही कंपनीत कार्यरत नसून, शिक्षण घेत आहे.

निष्कर्ष

तन्मय बक्षी गुगलमध्ये नोकरी करीत नाही, तसेच त्याला दरमाह 60 लाख रुपये पगार नाही. तो गुगल डेव्हलपर्स एक्सपर्ट आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:तन्मय बक्षी गुगलमध्ये नोकरी करीत नाही आणि त्याला 60 लाख रुपये दरमाह पगारही नाही.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False