VIDEO: ही गायिका किशोर कुमार यांची नात नाही. तिचे नाव अंकिता भट्टाचार्या आहे.

False सामाजिक

भारतीय संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या किशोर कुमार यांची नात म्हणून एका मुलीचा व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. किशोरदांचे प्रसिद्ध गाणे “मेरा नाम झुम झुम झुमरू” गाणाऱ्या या मुलीचा आवाजही नेटीझन्सला साद घालत आहे. तिचे गाणे ऐकून साक्षात किशोर कुमार यांच्या गायकीची झलक दिसत असल्याचे युजर्स कमेंट करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ व्हिडियो आणि पोस्ट येथे पाहा – फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुकवर शेयर करण्यात आलेल्या व्हिडियोमध्ये एक मुलगी “मेरा नाम झुम झुम झुमरू” हे गाणे गात आहे. झी-बांग्ला नावाच्या वाहिनीवरील एका कार्यक्रमातील हा व्हिडियो आहे. युजरने कॅप्शनमध्ये म्हटले की, किशोर कुमार यांची नात, हिने किशोर कुमार यांचे प्रसिद्ध गाणे गायले आणि अत्यंत सुंदर आवाज आणि हावभाव, अगदी किशोर कुमार सारखे.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या व्हिडियोतील मुलगी कोण आहे याचा शोध घेतला. फेसबुक पोस्टमध्ये झी-बांग्ला चॅनेलवरील “सारेगम-2018” या गायनाच्या रिअ‍ॅलिटी शोची लिंक मिळाली. या कार्यक्रमात 4 मे 2019 रोजी प्रक्षेपित झालेल्या एपिसोडमध्ये सदरील व्हायरल क्लिप आहे. कार्यक्रमातील स्क्रीनशॉटमध्ये स्पष्ट दिसते की, या मुलीचे नाव अंकिता भट्टाचार्या असून, ती पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यातील गोबरदंगा येथील रहिवासी आहे.

संपूर्ण एपिसोड येथे पाहा –  झी-5

विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वीच ती सारेगमप-2018 शोची विजेती ठरली. टाईम्स ऑफ इंडियाने तिची मुलाखतदेखील घेतली. त्यानुसार, तिचे वडिल सिंचन विभागात नोकरी करतात. तिने आई शाश्वती यांच्यासोबत स्टार प्लस वाहिनीवरील दिल है हिंदुस्तान या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या मुलाखतीमध्ये कुठेही ती किशोर कुमार यांची नातलग असल्याचे म्हटले नाही. ती जर किशोर कुमारची नात असती तर ही बाब नक्कीच नमुद करण्यात आली असती. अंकिताने इन्स्टाग्रामवर तिच्या पालकासोबतचा फोटो शेयर केला होता.

View this post on Instagram

Amar MA baba r sathe ????Happy Sunday everyone #love#family#cute

A post shared by Ankita Bhattacharyya (@ankita.bhattacharyya.9041) on

किशोर कुमार यांची नात कोण?

किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांना दोन मुली आहेत. त्यांची नावे वृंदा (22) आणि मुक्तिका (13) अशी आहेत. अमित कुमार यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर या दोघींची फोटो शेयर केलेले आहेत. ते तुम्ही येथे आणि येथे पाहा. अमित कुमार यांनी वडिल किशोर कुमार यांच्या 86 जन्मदिनानिमित्त 2015 साली ‘बाबा मेरे’ नावाचा अल्बम प्रसिद्ध केला होता. यामध्ये मुक्तिका हिने गाणे गायले होते. ते तुम्ही खाली पाहू शकता. यावेळी ती 10 वर्षांची होती. तसेच ती इंडियन आयडॉल ज्युनियर-2015 या कार्यक्रमातही वडिलांसोबत समील झाली होती.

वृंदा आणि मुक्तिका गांगुली यांचे फोटो आणि अंकिता भट्टाचार्य यांच्या फोटोंची तुलना केल्यावर कळते की, ती नातींपैकी एक नाही. वरील पुराव्यांवरून सिद्ध होते की, किशोर कुमार यांची नात म्हणून व्हायरल होत असलेल्या व्हिडियोतील मुलीचे नाव अंकिता भट्टाचार्या असून ती त्यांची नात नाही.

निष्कर्ष

किशोर कुमार यांच्या नातीचे नाव वृंदा व मुक्तिका गांगुली आहे. सदरील व्हायरल व्हिडियोतील मुलीचे नाव अंकिता भट्टाचार्या असून, ती पश्चिम बंगालमधील गोबरदंगा येथील आहे. त्यामुळे या पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे.

Avatar

Title:VIDEO: ही गायिका किशोर कुमार यांची नात नाही. तिचे नाव अंकिता भट्टाचार्या आहे.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False