FACT CHECK: पंतप्रधान नरेंद्र मोदी चप्पल घालून मंदिरात गेले का? जाणून घ्या सत्य

False राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिर भेटीचे फोटो शेयर करून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, त्यांनी मंदिरात चप्पल काढली नाही. या फोटोत त्यांच्यासोबत असणाऱ्या इतरांच्या पायात चप्पल नाही. मात्र, मोदींच्या पायात पादत्राणे दिसत असल्याचे फोटो दाखवत त्यांच्यावर टीका केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

नरेंद्र मोदींच्या मंदिर भेटीचे दोन फोटो सदरील पोस्टमध्ये शेयर करण्यात आले आहेत. यामध्ये मोदींच्या पायातील पादत्राणांकडे लक्ष वेधून म्हटले की, या व्यक्तीला देवाची पण भीती नाही. मोदींच्या सोबत असणाऱ्या लोकांच्या पायात चप्पल नसल्याचे दिसते.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हे फोटो कोणत्या मंदिरातील आहेत याचा शोध घेतला. फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळते की, हे फोटो केरळ येथील गुरुवायूरच्या प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरातील आहे. नरेंद्र मोदींनी 8 जून रोजी या मंदिराला भेट दिली होती. एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, नरेंद्र मोदींनी गुरूवायूर मंदिरात शनिवारी दर्शन घेतले. यावेळी त्यांची 112 किलो कमळांच्या फुलांनी तुलाभरण करण्यात आले. याच फुलांनी कृष्णाची विशेष पूजा करण्यात आली.

मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्हीअर्काइव्ह

दूरदर्शनने (DD News) मोदींच्या या भेटीचे सविस्तर वार्तांकन केले होते. त्यांच्या युट्यूब चॅनेलवर या भेटीचा व्हिडियो उपलब्ध आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. व्हिडियोची सुरुवात श्रीवलसम गेस्ट हाऊसपासून होते. येथून ‘मुंडू’ नावाचे पारंपरिक वस्त्र परिधान करून मोदी मंदिराकडे पायी प्रस्थान करताना दिसतात. 27 मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये त्यांची संपूर्ण मंदिर भेट दाखविण्यात आली आहे.

वरील व्हिडियोमध्ये नरेंद्र मोदी मंदिरात आल्यावर पूजारी आणि इतरांना हात जोडून अभिवादन करतात. मग ते 3.45 मिनिटाला चप्पल काढताना दिसतात. त्यानंतर ते मंदिरात प्रवेश करतात. खाली दिलेल्या GIF इमेजमध्ये तुम्ही मोदींना चप्पल काढताना पाहू शकता.

यानंतर मोदी तब्बल 18 मिनिटे मंदिरात होते. व्हिडियोच्या 17.10 मिनिटावर मोदींचे तुलाभरण सुरू होते. यावेळी त्यांच्या पायात नसल्याचे स्पष्ट दिसते. ANI वृत्तसंस्थेने केलेल्या ट्विटमध्येसुद्धा याप्रसंगाचा फोटो आहे. ते ट्विट येथे पाहू शकता.

पूजा-अर्चना झाल्यावर मोदी 23.31 मिनिटाला मंदिरातून बाहेर पडताना दिसतात. बाहेर उभे असलेल्या लोकांना अभिवादन करीत ते जेथे चप्पल काढली होती त्या ठिकाणी जातात. येथे त्यांना चप्पल घालताना आपण पाहू शकतो. त्याची GIF तुम्ही खाली पाहा. यावरून हे तर सिद्ध होते की, नरेंद्र मोदी चप्पल घालून मंदिरात गेले नव्हते. चप्पल काढूनच त्यांनी मंदिरात प्रवेश केला होता.

मग पोस्टमधील फोटो कुठले आहेत?

मंदिराबाहेर पडल्यावर नरेंद्र मोदी परत श्रीवलसम गेस्ट हाऊसकडे परत जाताना दिसतात. व्हिडियोमध्ये 24.12 मिनिटाला मोदी जेथून जात आहेत तेथील स्क्रीनशॉट घेऊन त्याची पोस्टमधील फोटोशी तुलना केली असता लक्षात येते की, हा फोटो घेतला तेव्हा मोदी मंदिरात नव्हते. ते मंदिरातून परत गेस्टहाऊसकडे जात होते. त्यांच्या सोबतचे व्यक्ती आणि भिंतीवरील श्रीकृष्णाची चित्रे यावरून हे सिद्ध होते.

निष्कर्ष

सदरील फोटो नरेंद्र मोदींनी 8 जूनला केरळमधील गुरूवायूर मंदिराला दिलेल्या भेटीचे आहेत. यावेळी मोदींनी चप्पल घालून मंदिरात प्रवेश केला नाही. पोस्टमधील त्यांचे चप्पल घातलेले फोटो मंदिरातून बाहेर पडल्यानंतरचे आहेत. त्यामुळे ही स्टोरी असत्य आहे.

Avatar

Title:FACT CHECK: पंतप्रधान नरेंद्र मोदी चप्पल घालून मंदिरात गेले का? जाणून घ्या सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False