FACT CHECK: टिपू सुलतानने महिलांना कंबरेच्यावर कपडे घालण्याचा अधिकार दिला होता का?

False सामाजिक

टिपू सुलतान यांच्याविषयी इतिहासामध्ये अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. त्यात भर म्हणजे सोशल मीडियावरील एक दावा आहे. त्यात म्हटले आहे की, महिलांचा योग्य सन्मान राखण्यासाठी टिपू सुलतानने त्याकाळातील अनिष्ट प्रथेला संपुष्टात आणून स्त्रियांना कंबरेच्यावर कपडे घालण्याचा अधिकार दिला. यासाठी त्यांना सवर्णांचा मोठा विरोध पत्करावा लागला. प्रसंगी या सुधारणेला विरोध करणाऱ्या 800 ब्राह्मणांचा बळीदेखील घेतला. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये म्हटले की, टिपू सुलतान ने महिलाओं को स्तन ढकने का अधिकार दिया. जिसका विरोध ब्राह्मणों ने किया. इसलिए टिपू सुलतानने 800 ब्राह्मणों को मार डाला.

पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट 443 वेळा शेयर करण्यात आली होती. अनेकांनी ही पोस्ट सत्य मानत टिपू सुलतान यांची वाहवा केली तर, काहींनी कमेंट करून या माहितीच्या सत्यतेवर शंका घेतली.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम महिलांना कंबरेच्यावर कपडे घालण्याचा अधिकार नव्हता का हे तपासले. तेव्हा आम्हाला “Upper Cloth Movement” या चळवळीविषयी माहिती मिळाली. शोधगंगा वेबसाईटवरील एका शोधनिबंधानुसार, केरळमधील दक्षिण त्रावणकोर संस्थानामध्ये त्याकाळी दलित महिला व पुरुष दोघांना कमरेच्यावर आणि गुडघ्याच्याखाली अंग झाकेल असे कपडे घालण्यास मनाई होती. विशेष करून दलित महिलांना स्तन झाकण्यास परवानगी नव्हती. सवर्णांसमोर कंबरेच्यावर कपडे घालणे त्याकाळी अनादर मानला जाई.

याविषयीची अधिक संशोधन केल्यावर बर्नार्ड कोहेन लिखित Colonialism and Its Forms of Knowledge (1996) पुस्तक आढळले. त्यानुसार, त्रावणकोर संस्थानामध्ये बहुतांश नाडार व इतर ब्राह्मणेत्तर महिलांना कंबरेच्यावर कपडे घालण्यास मनाई होती. जातव्यवस्थेनुसार नायर यांच्यानंतर नाडर जातीचा क्रमांक लागतो. ते अस्पृश्य होते आणि सवर्ण आणि संस्थानासाठी गुलामासारखे काम करणे त्यांना बंधनकारक होते. विशेष म्हणजे नायर जातीतील महिलांना जरी कंबरेच्यावर कपडे घालण्याची परवानगी होती, तरी ब्राह्मण किंवा इतर उच्चजातीय व्यक्तीसोमोर आदर म्हणून त्यांना छातीवरील कपडा काढावा लागत असे. (पान क्र. 139)

मूळ पुस्तक येथे वाचा – Colonialism and Its Forms of Knowledge (1996)

त्रावणकोर संस्थानामध्ये इंग्रजांचा वावर वाढल्यानंतर लंडन मिशनरी सोसायटीने दलित आणि विशेष करून नाडर समाजातील लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. रॉबर्ट हार्डग्रेव्ह लिखित The Nadars of Tamilnad (1969) या पुस्तकामध्ये म्हटले की, नाडार समाजातील लोकांचा इंग्रजांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातील लोकांशी संपर्क वाढला तेव्हा त्यांना सामाजिक बदलाची गरज जाणवू लागली. पारंपरिक व्यवस्थेने दाबून ठेवल्याची भावना जोर पकडू लागली. त्यामुळे नाडार समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्म स्वीकारला. यामुळे त्यांच्या जीवनशैलीमध्ये मोठा बदल झाला. ख्रिश्चन धर्मातील मोकळीकता अनुभवता येत असल्यामुळे कंबरेच्यावर कपडे न घालण्याची सक्ती त्यांना जाचक वाटू लागली.

इंग्रज आणि मिशनरीने त्रावणकोर संस्थानात आपले वजन वापरून काही अटींवर 1814 साली ख्रिश्चन धर्म स्वीकरलेल्या महिलांना कंबरेच्यावर कपडे घालण्यास परवानगी मिळवली. अट अशी होती की, या महिलांनी सवर्ण स्त्रियांच्या वस्त्रांचे अनुकरण करायचे नाही. यामुळे प्रथमच काही प्रमाणात दलित स्त्रियांना कंबरेच्यावर कपडे घालण्याचा अधिकार मिळाला. (पान 59-60)

मूळ पुस्तक गुगल बुक्सवर वाचा – The Nadars of Tamilnad (1969)

संस्थानकडूनच परवानगी मिळाल्याने धर्मपरिवर्तीत दलितांचा आत्मविश्वास दुणावला. पुढे चालून अनेकांनी सवर्णांसारखे कपडे घालण्यास सुरुवात केली. यामुळे उच्चजातीय समुदायाकडून मिशनरी आणि या नव्या निमयाचा विरोध होऊ लागला. यावरून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटनादेखील घडल्या. अखेर 3 फेब्रुवारी 1829 साली त्रावणकोर संस्थानाने नवा आदेश जारी केला. त्यानुसार, अटी आणखी कडक करण्यात आल्या.

The Travancore State Manual (1906) खंड पहिला या ग्रंथात अधिकृतरीत्या या सर्व प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, 1829 च्या आदेशानंतरही नाडार समाजातील महिलांनी सवर्ण स्त्रियांसारखे कपडे परिधान करणे चालू ठेवले. यामुळे सवर्ण आणि दलित यांच्यामध्ये तणाव वाढत गेला. यातून दोन्ही गटांकडून हिंसाचाराचा मार्ग अवलंबण्यात आला. अनेकांचे बळी गेले. त्यात इंग्लंडच्या राणीने 1858 साली ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता मोडित काढून भारतीय वसाहत स्वतःच्या अधिपत्याखाली घेतल्यानंतर आणखी वाढ झाली.

अखेर मद्रासचे गव्हर्नर चार्ल्स ट्रेव्हेलियन यांनी त्रावणकोर संस्थानातील इंग्रज अधिकाऱ्याला पत्र पाठवून दलितांनी कंबरेच्यावर कपडे न घालण्याची बंदी पूर्णतः नष्ट करण्यासाठी संस्थानाला राजी करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्रावणकोर संस्थानाने 26 जुलै 1859 रोजी अधिकृत आदेश काढून सर्व दलितांना कंबरेच्यावर कपडे घालण्याचा अधिकार दिला. (पान 531)

मूळ पुस्तक येथे वाचा – The Travancore State Manual (1906)

यापूर्वी केवळ धर्म परिवर्तित केलेल्या दलितांना हा अधिकार होता. परंतु, 1859 नंतर तो इतर दलितांनाही लागू झाला. थोडक्यात काय तर, दलित महिलांना कंबरेच्यावर कपडे घालण्याचा अधिकार ब्रिटिशांमुळे मिळाला.

मग टिपू सुलतानचा त्रावणकोरशी संबंध काय?

टिपू सुलतान यांचे वडिल हैदर अली यांनी 1766 आणि 1776 साली असे दोनदा त्रावणकोर संस्थान उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण डचांच्या मदतीमुळे तो अयशस्वी ठरला होता. टिपू सुलताननेसुद्धा 1789 साली पुन्हा त्रावणकोरवर हल्ला केला. पण इंग्रजांच्या मदतीमुळे ते त्याला शक्य झाले नाही. त्रावणकोरने टिपूचा अनेक लढायांत पराभव केला. टिपू सुलतानचा मृत्यू 4 मे 1799 रोजी झाला. याविषयी अधिक येथे वाचा – मराठी विश्वकोष

800 ब्राह्मणांची हत्या

टिपू सुलतानच्या हिंसक कृत्याबद्दल अनेक वादविवाद आहेत. इतिहासतज्ज्ञांमध्ये यावरून दोन गट पडलेले आहेत. इंटरनेटवरील काही ब्लॉगमध्ये दावा करण्यात आला आहे की, दोन शतकांपूर्वी केरळमधील मंड्या जिल्ह्यातील मेलकोट येथे दिवाळीच्या दिवशी 800 अय्यंगर ब्राह्मणांची हत्या केली होती. परंतु, याची पुष्टी केल्या जाऊ शकत नाही. टिपू सुलतानच्या वादग्रस्त निर्णय आणि कारवायांविषयी या पुस्तकात वाचा – Tipu Sultan: Villain or Hero

निष्कर्ष

दलित महिलांना कंबरेच्यावर कपडे घालण्याचा अधिकार टिपू सुलतानने नाही तर, ब्रिटिशांमुळे 1859 साली त्रावणकोर संस्थानाकडून मिळाला. टिपू सुलतान हा म्हैसुर साम्राज्याचा राजा होता. त्याचा मृत्यू 1799 सालीच झाला. त्यामुळे दलित महिलांना अधिकार मिळवून देण्याचा आणि 800 ब्राह्मणांची हत्या करण्याचा संबंध नाही. म्हणून ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:FACT CHECK: टिपू सुलतानने महिलांना कंबरेच्यावर कपडे घालण्याचा अधिकार दिला होता का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False