पुराच्या पाण्यात गायी वाहून जात असलेला व्हिडियो कोल्हापूर-सांगलीचा नाही. तो अर्जेंटिनाचा आहे.

False सामाजिक

गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातले आहे. दोन्ही शहरं आणि अनेक गावांना पुराने वेढा घातलेला असून, लाखो नागरिकांना याचा फटका बसला आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविणे आणि त्यांना मदत पोहचविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या महापुराचे रौद्र रूप दाखविणारे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अशाच एका व्हिडियोमध्ये शेकडो गायी पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. हा व्हिडियो महाराष्ट्रीतील पूरग्रस्त कोल्हापूर-सांगली येथील असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याद्वारे विद्ममान सरकारच्या मदतकार्यावर टीका केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये एक 30 सेंकदाची व्हिडियो क्लिप शेयर करण्यात आली आहे. यामध्ये पुराच्या पाण्यात गायी वाहून जाताना दिसतात. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या व्हिडियोमध्ये मुख्यमंत्र्यावर टीका करताना म्हटले की, कोल्हापूर आणि सांगली पुराच्या संकटात असताना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत रॅली करीत होते. मदत कार्याचे स्टीकर्स आधीच छापले. आता तत्वतः, अंशतः असे शब्द येतील. मग जाहिरातबाजी, मीडियाबाजी होईल. फक्त घोषणांचा पाऊस पडेल. मग हळूच फडणवीस आकडेवारी आणि मदत कार्य माहिती लोकांच्या तोंडावर मारतील. मग या जीवांचे काय? या मुक्या जीवांचा शाप कोणाला?

तथ्य पडताळणी

कोल्हापूर-सांगली महापूरासंदर्भात यापूर्वी अनेक खोटे व्हिडियो आणि फोटोज परविण्यात आले आहेत. त्यामुळे या व्हिडियोची सत्य पडताळणी करण्यासाठी व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून काळाले की, हा व्हिडियो महाराष्ट्रीतील नाही. तो तर अर्जेंटिनामधील आहे.

अर्जेंटिना येथील Telefe Córdoba टीव्ही चॅनेलने युट्युबवर वर 14 जानेवारी 2019 रोजी वरील व्हिडियो अपलोड केला होता. स्पॅनिश भाषेतील व्हिडियोचे नाव “धक्कादायक: पुरात वाहून गेल्या गायी” असे आहे. अर्जेंटिनामध्ये पुराच्या पाण्यात गायी वाहून जात असल्याचा व्हिडियो व्हायरल झाला होता.CNN स्पॅनिश वेबसाईटवरील 14 जानेवरी रोजीच्या बातमीनुसार, अर्जेंटिना देशातील सॅंटा फी, चाको आणि कोरिएंटिस प्रभागात वर्षाच्या सुरुवातीला जोरदार पावसामुळे महापूर आला होता. हजारो लोकांना या भागातून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. परंतु, मुक्या जनावरांपर्यंत ही मदत लवकर पोहोचली नाही. नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने अनेक मुके जनावरे वाहून गेली. नदीच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या गायींच्या या व्हिडियोमुळे पुराची भयावह स्थिती सर्वांमसोर आणली.

मूळ व्हिडियो आणि बातमी येते वाचा – CNN Spanish

अर्जेटिंनामधील स्पॅनिश भाषिक वृत्त वेबसाईट TN – Todo Noticias ने 18 जानेवारी 2019 रोजी ट्विट करून शेतकरी वाहून गेलेल्या गायींना कसे वाचवत आहेत याचा एक व्हिडियो ट्विट केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये लिहिले की, सँटा फी आणि चाकोच्या सीमेवरील ग्रामीण भागात महापुराचे नाट्य सुरू आहे. पुरात वाहून जात असलेल्या गायींना वाचविण्यासाठी शेतकरी असे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

अर्काइव्ह

उत्तर अर्जेटिंनामध्ये जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पावसाने थैमान घातले होते. सरसराची पाचपट अधिक पाऊस या काळात पडल्याने महापूर आला. यामध्ये मोठे नुकसान झाले होते. प्रशांत महासागरातील स्थिती आणि एल-निनो चक्रीवादळ हे या विक्रमी पावसामागचे कारण सांगण्यात आले.

मूळ बातमी येते वाचा – Al Jazeeraअर्काइव्ह

निष्कर्ष

पुराच्या पाण्यात गायी वाहून जात असलेला व्हिडियो कोल्हापूर किंवा सांगली किंवा महाराष्ट्रातील नाही. तो व्हिडियो अर्जेंटिना देशातील आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात सरासरीपेक्षा पाचपट अधिक पाऊस पडल्याने तेथे महापूर आला होता. त्यामुळे ही जनावरे नदीपात्रात वाहून गेली होती. 

आवाहन

कोल्हापूर, सांगली येथे पुराची भयावह परिस्थीती आहे. पुरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी हातदेखील पुढे केले जात आहेत. अशा आपत्कालिन परिस्थितीमध्ये आपण आणखी एक मदत करू शकतो. ती म्हणजे खोट्या बातम्या पसरू न देण्याची

फॅक्ट क्रेसेंडोतर्फे वाचकांना आवाहन करण्यात येत आहे की, पुराविषयीच्या पोस्ट, बातम्या, फोटो आणि व्हिडियोची सत्यता जाणून घेतल्याशिवाय शेयर/फॉरवर्ड करू नका. शंका असल्यास असे पोस्ट, बातम्या, फोटो, व्हिडियो फॅक्ट क्रेसेंडोला 9049043487 या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकवर पाठवा. आम्ही त्याची तथ्य पडताळणी करून सत्य माहिती कळवू.

हेदेखील वाचा:

राजस्थानमधील पुराचा व्हिडियो कोल्हापूरचा म्हणून व्हायरल. शेयर करण्यापूर्वी वाचा

माळशेज घाटात दरड कोसळल्याचा व्हिडियो जम्मू काश्मीरमधील आहे. शेयर करण्यापूर्वी सत्य वाचा

कसारा घाटातील रस्त्याला तडे गेल्याचा फोटो पुणे-बंगळुरू महामार्गाचे (NH-4) म्हणून व्हायरल

Avatar

Title:पुराच्या पाण्यात गायी वाहून जात असलेला व्हिडियो कोल्हापूर-सांगलीचा नाही. तो अर्जेंटिनाचा आहे.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False