Fact Check : ‘ब्रम्हधनुष्य’ म्हणून सांगण्यात येणारी ही घटना 90 वर्षांनंतर घडली आहे का?

False सामाजिक

ही घटना दुर्मिळ आहे का? असा विचारणा करणारा एक व्हिडिओ फॅक्ट क्रेसेंडोला प्राप्त झाला. हा व्हिडिओ नेमका कसला आहे, याचा तपास केला असता तो ‘Sun Halo’चा असल्याचे लक्षात आले.

ही घटना दुर्मिळ आहे का? असा विचारणा करणारा संदेश.

फेसबुक आणि ट्विटरवर हा संदेश आहे का, याचा आम्ही शोध घेतला असता आम्हाला हा संदेश मागील अनेक वर्षांपासून व्हायरल होत असल्याचे दिसून आले. ते आपण खाली पाहू शकता.

याबाबत Adarsh Lambole यांनी ” ब्रम्हधनुष्य ” ९० वर्षानंतर आज संध्याकाळी गुजरात मध्ये पहावयास मिळाले , फारच विलोभनीय नजारा, अशी माहिती फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने 90 वर्षानंतर अशी घटना घडली आहे का, ही दुर्मिळ घटना आहे का, याची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

‘ब्रम्हधनुष्य’ दिसणे ही दुर्मिळ घटना आहे का? अशी घटना गुजरातमध्ये घडली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला अपेक्षित परिणाम न मिळाल्याने आम्ही हा व्हिडिओतील काही दृश्ये रिव्हर्स इमेज सर्च केली. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला.

यातील ब्रम्हधनुष्य या हॅशटॅगवर आम्हाला वेगवेगळे दावे दिसून आले. यातील काही दाव्यात हा व्हिडिओ गुजरातमधील तर काही दाव्यात हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे 2015 पासूनचे दावे दिसून आले. हे ब्रम्हधनुष्य नसून ‘Sun Halo’ असल्याचे यात स्पष्टपणे म्हटले आहे. ‘Sun Halo’ म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला त्याबाबत खालील माहिती मिळाली. या तेजोवलयाला मराठीत २२° चे खळे (Halo) म्हटले जाते.

विकीपीडियावरील मराठीतील माहिती / संग्रहित माहिती

तेजोवलयाची ही घटना नुकतीच घडली का, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी 5 जून 2018 रोजी औरंगाबाद येथे अशी घटना घडली असल्याचे वृत्त द टाईम्स ऑफ इंडियाने दिल्याचे आम्हाला दिसून आले. त्यापूर्वीही 31 ऑगस्ट 2015 रोजी औरंगाबाद शहरात ही घटना घडलेली आहे.

द टाईम्स ऑफ इंडिया / Archive

पंढरपुरातही असे इंद्रवज्र, वर्तुळाकार इंद्रधनुष्य दिसल्याचे वृत्त जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने 28 जून 2019 रोजी दिलेले आहे. आपण हे वृत्त खाली पाहू शकता. 

शिमोगा येथे इंद्रवज्र दिसल्याचे वृत्त द हिंदूने 24 सप्टेंबर 2018 रोजी आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेले आहे. सकाळ वृत्तपत्र समुहाच्या Agrowon या क़षीविषयक दैनिकाने 19 ऑगस्ट 2013 रोजी आपल्या व्हेरिफाईड फेसबुक अकाऊंटवर प्रवीण ताकवले यांनी टिपलेले एक छायाचित्र दिले आहे. या छायाचित्रावरील ओळीत दुपारी सव्वाएकच्या सुमारास पुण्यात सूर्याभोवती गोलाकार इंद्रधनुष्याचे विलोभनीय दृष्य दिसल्याचे म्हटले आहे. 

निष्कर्ष 

सूर्याभोवती गोलाकार तेजोवलय म्हणजेच २२° चे खळे दिसण्याची घटना दुर्मिळ असल्याचे दिसून येत नाही. अशा प्रकारची घटना गेल्या 90 वर्षात घडली नसल्याचा दावा असत्य असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर या पोस्टमधील व्हिडिओ मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या दाव्यांसह व्हायरल होत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : ‘ब्रम्हधनुष्य’ म्हणून सांगण्यात येणारी ही घटना 90 वर्षांनंतर घडली आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False