
सध्या पावसाने थैमान घातलेले आहे. महाराष्ट्रात मुंबई, नाशिकसह इतर अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळतेय. शहातून ओथंबून वाहणाऱ्या पाण्याचे व्हिडियो सोशल मीडियावर सध्या प्रचंड गाजत आहेत. असाच एक भर रस्त्यावरून जणुकाही नदी वाहताना दिसणारा व्हिडियो कोल्हापूरमधील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडतळणी केली.
मूळ व्हिडियो आणि पोस्ट येथे पाहा – फेसुबक
काय आहे व्हिडियोमध्ये?
सोशल मीडियावर 45 सेंकदाची एक व्हिडियो क्लिप शेयर केली जात आहे. यामध्ये रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहताना दिसते. गुडघ्याइतक्या पाण्याचे हे रौद्ररूप कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाल्याचे म्हटले जात आहे. कोणी कोल्हापुरात भवानी मंडपात पाणी म्हणेतय तर कोणी कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात पाणी असा दावा करीत आहे. अनेक कोल्हापूरवासीयांनी मात्र हा व्हिडियो तेथील नसल्याचे कमेंट्समध्ये सांगितले आहे. मग हा व्हिडियो मूळ कुठला आहे?
तथ्य पडताळणी
विविध पेजरवरून शेयर करण्यात आलेल्या पेजेसवरील कमेंटमध्ये अनेकांनी हा व्हिडियो गुजरातमधील वडोदरा येथील असल्याचे म्हटले आहे. त्यादृष्टीने शोध घेतला असता, तसे काही आढळून आले नाही. युट्यूब शोध घेतला असता हा व्हिडियो कोल्हापूरचा म्हणूनच अपलोड करण्यात आल्याचे दिसले. काही ठिकाणी मात्र हा व्हिडियो राजस्थानमधील बिकानेर येथील असल्याचे म्हटले आहे.
व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर दिसते की, एका लाल-विटकरी रंगाच्या वेशीतून पाणी येत आहे. एक तर ही वेश आहे किंवा दरवाजा (गेट) आहे. हा धागा पकडून मग गुगलवर बिकानेर गेट असे सर्च केले. त्यातून बिकानेर शहरातील प्रसिद्ध कोट गेटची माहिती मिळाली. कोट गेटचे फोटो पाहिल्यावर लगेच कळते की, व्हिडियोत दिसणारे गेटशी ते मिळते जुळते आहे. म्हणजे हा व्हिडियो बिकानेर येथील असल्याची शक्यता वाढते.

पण हा व्हिडियो तेथीलच असल्याचे कसे कळणार?
फॅक्ट क्रेसेंडोने कोट गेटजवळील दुकानदारांशी संपर्क केला. तेथील हरिओम मेडिकल स्टोरचे सुरेश कुमार अगरवाल यांनी सदरील व्हिडियो बिकानेरचाच असल्याचे सांगितले. 31 जुलै आणि 1 ऑगस्ट दरम्यान बिकानेरमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हाच कोट गेट परिसरात हे पाणी साचले होते, असे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर श्री अगरवाल यांनी त्यादिवशी त्यांच्या मोबाईलमध्ये कोट गेटचे काढलेले अनेक व्हिडियोसुद्धा पाठविले.
कोट गेट जवळच राहणारे विष्णू लखानी यांनीदेखील सदरली व्हिडियो बिकानेरच्या कोट गेटचा असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी त्यांच्या घरातून मोबाईलमध्ये दुसऱ्या अँगलने काढलेला व्हिडियो फॅक्ट क्रेसेंडोला पाठविला. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये कोट गेट स्पष्ट दिसते.
व्हायरल व्हिडियो आणि विष्णू लखानी यांनी पाठविलेल्या व्हिडियोतील स्क्रीनशॉटची खाली तुलना केलेली आहे. यावरून सबळ सिद्ध होते की, हा व्हिडियो बिकानेर, राजस्थानचा आहे. त्यामुळे सदरील व्हिडियो कोल्हापूरचा आहे हा दावा खोटा ठरतो.

निष्कर्ष
सदरली व्हायरल व्हिडियो कोल्हापुरचा नसून, राजस्थानमधील बिकानेर शहरातील आहे. 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे बिकानेरमधील कोटगेट परिसरात साचलेल्या पाण्याचा हा व्हिडियो आहे. त्यामुळे कोल्हापुरचा दावा असत्य ठरतो.

Title:राजस्थानमधील पुराचा व्हिडियो कोल्हापूरचा म्हणून व्हायरल. शेयर करण्यापूर्वी वाचा
Fact Check By: Agastya DeokarResult: False
