
केरळमध्ये एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चीनमध्ये या व्हायरसने आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही याचे संशयित रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाकडून याबाबत खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. त्यातच समाजमाध्यमात याबाबत वेगवेगळी माहिती पसरत आहे.
चीनमधील मटण मार्केटचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. योगेश पाखरे, संजीव कोळकुंभे, शैलेश पाटील आदींनी अशा माहितीसह हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरंच चीनमधील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
या व्हिडिओच्या सुरूवातीलाच ‘ Pasar Extream Langowan’ असे इंग्रजीत लिहिले असल्याचे दिसून आले. आम्ही हा शब्दप्रयोग करत युटुयूबवर शोध घेतला असता आम्हाला खालील व्हिडिओ दिसून आला.
आम्ही हाच शब्दप्रयोग करत आणखी शोध घेतला असता हे ठिकाण इंडोनेशियात असल्याचे दिसून आले.
या व्हिडिओतच 20 ते 21 व्या सेकंदाला एक इमारत दिसते. या इमारतीवर इंडोनेशियन भाषेत लिहिलेला फलक आहे. त्याचे मराठीत भाषांतर केल्यावर मिनाहास रीजेंसी, व्यापार विभाग, लंगोवन मार्केट ऑफिस असे लिहिले असल्याचे दिसून आले. याबाबत शोध घेतल्यावर लांगोवन हे इंडोनेशियातील उत्तर सुलावेसी प्रदेशातील एक ठिकाण असल्याचे दिसून आले आणि येथील बहुसंख्य लोकसंख्या मिनाहसन वांशिक आहे.
आम्हाला गेटी इमेजेसवरही याची खूप छायाचित्रे दिसून आली. यातील अनेक छायाचित्रे ही व्हिडिओतील दृश्यांशी मिळतीजुळती असल्याचे आपल्या लक्षात येते. यातून हे सिध्द होत आहे की, हा व्हिडिओ इंडोनेशियातील आहे. गेटी इमेजवरील छायाचित्र आणि व्हिडिओतील एका दृश्याची आम्ही केलेली तुलना आपण खाली पाहू शकता.
निष्कर्ष
हा व्हिडिओ इंडोनेशियातील आहे. कोरोना व्हायरसशी संबंध जोडत हा व्हिडिओ चीनमधील असल्याचा करण्यात येत असलेला दावा असत्य आहे.

Title:कोरोना व्हायरस : इंडोनेशियातील मटण मार्केटचा व्हिडिओ चीनमधील म्हणून व्हायरल
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
