Coronavirus: औरंगाबादेत कोरोना व्हायरस पोहचल्याचा खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य

Coronavirus False आरोग्य

जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस आता औरंगाबाद शहरातही पोहचल्याचा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक व्हायरल मेसेजमध्ये NEWS-18 LOKMAT ची बातमी म्हणून पसरणाऱ्या मेसेजनुसार, औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरसचे दोन संशयिच आढळले असून, त्यांना एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे दोन्ही संशयित एन-3 भागातील आहेत, अशी माहिती औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही माहिती खोटी असल्याचे समोर आले.

काय आहे मेसेजमध्ये?

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकफेसबुक 

तथ्य पडताळणी

मेसेजमध्ये लिहिले की, ही बातमी NEWS-18 लोकमतने 24 जानेवारी रोजी प्रकाशित केली होती. त्यानुसार, शोध घेतल्यावर कळाले की, ही बातमी औरंगाबादची नाही तर मुंबईची आहे. खऱ्या बातमीत जेथे मुंबई होते तेथे औरंगाबाद लिहून हा चुकीचा मेसेज पसरविण्यात आला आहे.

मूळ बातमी येथे वाचा – NEWS-18 लोकमतअर्काइव्ह

मुंबईत दोन जणांना कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण म्हणून कस्तुरबा रुग्णालयात भरती केले होते. या बातमीतील ‘मुंबई’, ‘कस्तुरबा रुग्णालय’, ‘मुंबई महानगरपालिका’, ‘नालासोपारा’ या शब्दांच्या जागी अनुक्रमे औरंगाबाद, एमजीएम रुग्णालय, औरंगाबाद महापालिका आणि एन-3 असे लिहून हा खोटा मेसेज पसरविण्यात येत आहे. खाली दिलेल्या तुलनेवरून लक्षात येईल.

फॅक्ट क्रेसेंडोने औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हा मेसेज पूर्णतः खोटा असल्याचे सांगितले. ‘औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरस संशयित रुग्ण अद्याप आढळलेले नसून, यासंबंधी खोट्या बातम्या आणि अफवा पसरवून नये. नागरिकांनीदेखील अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 

एमजीएम रुग्णालयाचे संचाकल व क्रिटिकल केयर डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. आनंद निकाळजे यांनीदेखील औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरस आल्याची बातमी खोटी असल्याचे सांगितले. “एमजीएम रुग्णालयात कोरोना व्हायरसचे संशयित दाखल करण्यात आलेले नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, औरंगाबाद शहरात अद्याप कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण आढळलेले नसून, तसे सांगणारा व्हायरल मेसेज खोटा आहे. न्यूज-18 लोकमतच्या मुंबईतील बातमीला खोडासाळपणे औरंगाबादची म्हणून पसरविण्यात येत आहे.

Avatar

Title:Coronavirus: औरंगाबादेत कोरोना व्हायरस पोहचल्याचा FAKE मेसेज व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False