डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजस्थानमध्ये मनुच्या पुतळ्याचे अनावरण केले नव्हते. वाचा सत्य

False राजकीय सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते, हे तर सर्वश्रुत आहे. असे असताना हा ग्रंथ लिहिणाऱ्या मनुच्या पुतळ्याचे डॉ. आंबेडकरांनी अनावरण केले होते, असा दावा सोशल मीडियावर पाहायला मिळाला. 

राजस्थान उच्च न्यायालयाच्या परिसरातील मनुच्या पुतळ्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते अनावरण झाले होते, असे एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली तेव्हा ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

राजस्थान उच्च न्यायालयाच्या इमारतीसमोरील मनुच्या पुतळ्याचे फोटो शेयर करून लिहिलेले आहे की, राजस्थान उच्च न्यायालय जयपूरच्या प्रांगणातील “महर्षी मनू महाराज” यांच्या मूर्तीचे अनावरण डॉ. राजेंद्रप्रसाद (राष्ट्रपती भारत सरकार) आणि डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (कायदा मंत्री भारत सरकार) यांचे हस्ते झाले होते. या प्रसंगी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या भाषणातील एक वाक्य “Manu was the first ‘LAW GIVER’ of the world ” हे त्या पुतळा स्तंभावर कोरलेले आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम राजस्थान उच्च न्यायालयातील मनुच्या पुतळ्याची माहिती गुगलवर शोधली. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, जयपुर येथील उच्च न्यायालयाच्या परिसरात मनुचा पुतळा आहे. हा पुतळा 1989 साली बसविण्यात आल्याची माहिती या बातमीत दिलेली आहे. समेंद्र शर्मा नावाच्या कलाकाराने हा सिमेंटचा पुतळा तयार केला होता. त्यांचा मुलगा संदीप याने दिलेल्या माहितीनुसार, 1989 मध्ये त्यांच्य वडिलांनी अडीच महिन्यात हा पुतळा बनवला होता.

10 फेब्रुवारी 1989 रोजी राजस्थान हायर ज्युडिशयल ऑफिसर्स असोसिएशनचे तत्कालिन अध्यक्ष पद्मकुमार जैन यांनी उच्च न्यायालयाच्या परिसराचे सौंदर्य वाढवण्यासाठी हा मनुचा पुतळा बसविण्याची मुख्य न्यायाधीश एन. एम. कासलीवाल यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार त्यावर्षी 3 मार्च रोजी पुतळा बसविण्याची परवानगी देण्यात आली.

लायन्स क्लबच्या आर्थिक मदतीतून हा पुतळा तयार करण्यात आल्यानंतर तो बसविण्यात आला. संदीप शर्म यांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्कालिन प्रभारी मुख्य न्यायाधीश मिलापचंद जैन यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन होणार होते. परंतु, अनेक संघटनांनी या पुतळ्या विरोधात आंदोलन व विरोध केला. त्यामुळे पुतळ्याचे अधिकृत उद्घाटन झाले नाही.

सविस्तर बातमी येथे वाचा – इंडियन एक्सप्रेसटाईम्स ऑफ इंडिया

पुढे 28 जुलै 1989 रोजी राजस्थान उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी एकमताने हा पुतळा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, विश्व हिंदु परिषदेचे नेते आचार्य धर्मेंद्र याविरोधात कोर्टात जनहित याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने पुतळा हटविण्यास स्थगिती दिली. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

आता राहिला प्रश्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा तर या दोघांचे अनुक्रमे 1956 व 1963 साली निधन झाले होते. त्यामुळे 1989 साली त्यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

हा दावा आला कुठून?

16 जुलै 2018 रोजी न्यूज-18 लोकमत वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतमीमध्ये शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी दावा केला होता की, राजस्थानच्या विधानभवनासमोर मनुचा पुतळा बसवण्यात आला आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. मनु हा जगातील पहिला कायदेपंडित होता, असे बाबासाहेबांनी मनुचा गौरव केलेले वाक्य त्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर लिहिले आहे, असे ते म्हणाले होते. सदरील फेसबुक पोस्ट 17 जुलै 2018 रोजीची आहे. 

यानंतर हा दावा खोडणाऱ्या लेखात वरीष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी लिहिले होते की, राजस्थान विधानभवनासमोर मनूचा पुतळा नाही, त्यामुळे राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्याचे अनावरण होणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी उपस्थित असणे या गोष्टी धादांत खोट्या ठरतात. बाबासाहेबांनी मनूचा गौरव केलेले वाक्यसुद्धा काल्पनिकच ठरते. जयपूरमध्ये मनूचा पुतळा आहे, पण तो जयपूर हायकोर्टासमोर.

मूळ लेख येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, राजस्थान उच्च न्यायालयाच्या परिसरातील मनुच्या पुतळ्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी अनावरण केले नव्हते. हा पुतळा 1989 साली बसविण्यात आला होता. त्याआधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1956) आणि डॉ. राजेंद्रप्रसाद (1963) यांचे निधन झाले होते. त्यामुळे सदरील पोस्टमधील दावा खोटा ठरतो.

Avatar

Title:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजस्थानमध्ये मनुच्या पुतळ्याचे अनावरण केले नव्हते. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False