
मुल पळवणारी टोळी पासुन सावध रहा आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, अशी माहिती देणारा व्हिडिओ Dilip Sonone यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
मुलं पळविणाऱ्या टोळीपासून सावध राहण्याची सुचना या पोस्टमध्ये करण्यात आली असली तरी या व्हिडिओत बोलणाऱ्या व्यक्ती या हिंदी भाषिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे आम्हाला हा व्हिडिओ उत्तर भारतातील असल्याची शक्यता वाटली. आम्हाला शोध घेताना दैनिक अमर उजाला या हिंदी दैनिकाच्या संकेतस्थळावर एक वृत्त दिसून आले. या वृत्तात उत्तर प्रदेशात अशा पध्दतीच्या अफवा पसरत असल्याचे आणि त्यामुळे निरापराध नागरिकांना मारहाण होत असल्याचे म्हटले आहे.
आम्ही उत्तर प्रदेश पोलिसांच्या संकेतस्थळावर या घटनेची काही माहिती मिळते का हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे अशी कोणतीही माहिती दिसून आली नाही. मग आम्ही उत्तर पोलिसांच्या विविध अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. बारागाव पोलीस ठाण्याचे अधिकारी संजय सिंग यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी ही महिला मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले. तिचा लहान मुलांच्या अपहरणाशी काही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निष्कर्ष
या व्हिडिओत दिसणारी महिला ही मुलांचे अपहरण करणारी महिला नसून मानसिक रुग्ण आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही बाब स्पष्ट केली आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.
