FACT CHECK: अहमदनगरच्या माळीवाडा बसस्थानकातून खरंच स्फोटके व चार जण ताब्यात घेण्यात आले का?

False सामाजिक

गणेशोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी चोख बंदोबस्त केलेला आहे. सणोत्सवाच्या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून ही काळजी. या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर मेसेज पसरत आहे की, अहमदनरच्या माळीवाडा बसस्थानकामध्ये स्फोटके घेऊन जाताना चार जणांना पकडण्यात आले. पोलीस व शिघ्रकृतीदलाच्या जवानांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडियोसुद्धा व्हायरल होत आहे. यामुळे भीती व चिंता व्यक्त केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा व्हिडियो पाठवून तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येतोय की, अहमदनगरच्या माळीवाडा बसस्थानकात स्फोटके आणल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई करून चार जणांना पकडण्यात आले. या कारवाईचे व्हिडियोसुद्धा समोर आले आहेत. यामध्ये पोलीस आणि शीघ्रकृती दलाचे जवान पोलिस बसच्या छतावर चढतात, काही जण खिडकीतून बसमध्ये जातात. एक-एक करून चार “अतिरेक्यांना” जमिनीवर झोपवण्यात येते. त्यानंतर अटक करून पोलिस व्हॅनमध्ये नेण्यात येते. काहींना स्ट्रेचरवर घेऊन जातानाही दिसतात. 

तथ्य पडताळणी

अहमदनगरच्या माळीवाडा बसस्थानकात खरंच अशी कारवाई झाली का याचा शोध घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने अहमदनगरमधील कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी माहिती दिली की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडियो मंगळवारी माळीवाडा बसस्थानकावर करण्यात आलेल्या मॉकड्रीलचे आहेत. ही खरी कारवाई नव्हती. सुरक्षेचा उपाय आणि सराव म्हणून ही मॉकड्रील करण्यात आली होती. त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

या मॉकड्रीलमध्ये कोतवाली पोलीस ठाणे, अग्निशमन दल, शिघ्रकृती दल, बॉम्बशोधक व नाशक पथक आणि माळीवाडा बसस्थानक यांचा समावेश होता. अचानक सुरू झालेल्या या कारवाईबद्दल प्रवाशांना काहीच माहिती नव्हती. तब्बल अर्धातासानंतर ही मॉक ड्रील असल्याचे त्यांना सांगण्यात आले व बसेस सोडण्यात आल्या.

महाराष्ट्र टाईम्सने 4 सप्टेंबर रोजी या मॉकड्रीलची बातमी प्रसिद्ध केली होती. यात म्हटले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने मंगळवारी सायंकाळी माळीवाडा बसस्थानकात मॉकड्रील आयोजित केला होता.

मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स

यापूर्वीदेखील मॉकड्रीलचे व्हिडियो शेयर करून अफवा पसरविण्याच्या घटना घटलेल्या आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी करून अनेकांचे सत्य बाहेर काढले आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा.

मुंबईत जागृती नगरमध्ये दहशतवादी पडकण्यासाठी NSG कमांडो तैनात करण्यात आले का?

अमरावतीमधील अंबादेवी मंदिरात दहशतवादी पकडण्यात आले का?

निष्कर्ष

अहमदनगरच्या माळीवाडा बसस्थानकातून स्फोटके आणि चार जण ताब्यात घेतल्याच्या अफवेवर विश्वास ठेवू नका. पोलिसांनी मंगळवारी घेतलेल्या मॉक ड्रीलचा तो व्हिडियो आहे. सध्या सुरू असलेल्या सणोत्सवाच्या काळात अशी खोटी माहिती प्रसारित न करण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे. 

Avatar

Title:FACT CHECK: अहमदनगरच्या माळीवाडा बसस्थानकातून खरंच स्फोटके व चार जण ताब्यात घेण्यात आले का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False