सीरियामधील जखमी बाळाचा फोटो काश्मीरमधील पेलेट गनचा पीडित म्हणून व्हायरल. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर काश्मीरसंदर्भात अनेक हिंसक फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर पसरविण्यात येत आहेत. कलम 370 रद्द करण्याला एक महिनापूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका जखमी बाळाचा फोटो शेयर केला जात आहे. सोबत दावा करण्यात आला की, काश्मीरमध्ये पेलेट गनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बाळाचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

तथ्य पडताळणी

पेलेट गनमुळे चेहरा छिन्नविच्छिन्न झालेल्या या बाळाचा फोटो खरंच काश्मीरमधील आहे का याचा शोध घेण्यासाठी सदरील फोटो यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केला. त्यातून एअरवॉर्स नावाच्या वेबसाईटवरील एक बातमी मिळाली. यानुसार हा फोटो सिरियामध्ये 29 डिसेंबर 2015 रोजी हवाई हल्ल्यात मृत पावलेल्या मुलीचा आहे. या मुलीचे नाव आयशा सलेह हसन अल हमिदी होते.

मूळ बातमी येथे वाचा – AirWarsअर्काइव्ह

इराक, सीरिया, लिबिया यासारख्या देशांत सैन्य व दहशतवादी कारवायांच्या पीडितांची माहिती गोळा करण्याचे काम एयरवॉर्स ही संस्था करते. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सीरियामधील अलेप्पो शहरापासून नजीक अझाझ गावात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात कारने प्रवास करीत असलेल्या हमीदी कुटुंबातील सदस्य जखमी झाले. यामध्ये आयशा सलेह हसन या लहान बाळाचा मृत्यू झाला. तिच्या कुटुंबातील इतर चार सदस्य जखमी झाले.

सीरियातील मानवधिकार समितीच्या 29 डिसेंबर 2015 रोजीच्या दैनंदिन जीवितहानी अहवालातही आयशाचे नाव आहे.

मूळ यादी येथे वाचा – The Syrian Human Rights Committee Report

सीरियामधील हसकाह प्रांतात काम करणाऱ्या Youth Union of Hasakah च्या फेसबुक पेजवरूनसुद्धा आयशाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली होती. 29 डिसेंबर 2015 रोजीच्या पोस्टमध्ये आयशाचे दोन फोटो आणि तिच्या कुटुंबातील जखमींचे फोटो शेयर करण्यात आले होते. युद्धग्रस्त गावापासून दूर तुर्कस्थानमध्ये जाण्यासाठी ते निघाले होते. मात्र अझाझ येथे हवाई हल्ल्यात त्यांची कार सापडली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसुबक 

निष्कर्ष

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जखमी बाळाचा फोटो काश्मीरमधील नाही. हा फोटो 2015 साली सीरियामध्ये हवाई हल्ल्यात मृत पावलेल्या मुलीचा आहे. या मुलीचे नाव आयश सलेह हसन होते. त्यामुळे अशी चुकीची पोस्ट न पसरविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Avatar

Title:सीरियामधील जखमी बाळाचा फोटो काश्मीरमधील पेलेट गनचा पीडित म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •