दिल्लीमधील दरोड्याचा व्हिडिओ मुंबईचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Crime False

चार-पाच जणांनी घरामध्ये एका कुटुंबाला चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून चोरी केल्याचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, मुंबईच्या नेरुळ भागात हा दरोडा घालण्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ नेरुळचा नाही. ही घटना दिल्लीमध्ये घडली होती.

काय आहे दावा?

सुमारे दोन मिनिटांचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, एका महिलेने दरवाजा उघडल्यावर तोंड लपविलेले चार-पाच घरात घुसतात. चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून ते कुटुंबाला धमकावतात. घरातील पुरुषाचे हात-पाय बांधतात. व्हिडिओमध्ये भेदरलेली एक लहान मुलगीसुद्धा दिसते.

सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, ‘नेरूल च्या बालाजी टॅावर मधे पार्सल घेण्यासाठी म्हणून दारं उघडल्यावर काय घडलं बघा….व सावध रहा.लॅाकडाऊन मुळे ह्या अशा गोष्टी पुढे घडतच राहतील’

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तारीख 7 जुलै 2021 दिसते. या तारखेच्या आसपास नेरुळमध्ये अशी काही घटना घडली का याचा शोध घेतला. तेव्हा कोणतीही बातमी आढळली नाही. 

मग व्हिडिओतील की फ्रेमद्वारे शोधल्यावर झी न्यूज वाहिनीतील क्राईम विभागाचे मुख्य संपादक जितेंदर शर्मा यांनी हेच सीसीटीव्ही फुटेज 7 जुलै 2021 रोजी शेअर केल्याचे आढळले. त्यांनी हा व्हिडिओ दिल्लीतील उत्तम नगर भागातील असल्याचे लिहिले.

ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या उत्तम नगर भागामध्ये प्रॉपर्टी व्यावसायिकाच्या घरामध्ये 7 जुलै रोजी ही चोरी घडली होती. वीजविभागाचे कर्मचारी म्हणून ते घरात घुसले. मग घरातील चौघांना ओलिस ठेवून या चार जणांच्या टोळीने पैसे आणि दागीने लंपास केले.

पीडित व्यावसायिक विनोदने सांगितले की, दुपारी चार वाजेच्या सुमारे हे चौघे घरात घुसले. ते वीज विभातील कर्मचारी असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरवाजा घडताच त्यांनी चाकू व बंदुक धाकवून आम्हाला बंधक बनवले. अर्धा तास ते घरात होते. चोरांनी 8 लाकांची रोकड, सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व इतर किंमती वस्तू नेल्या होत्या. 

ANI वृत्तसंस्थेच्या बातमीचा स्क्रीनशॉट

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 11 जुलै रोजी याप्रकरणी दोघांना अटक केली होती. एकाला अटक करताना चकमकदेखील झाली होती. त्यात आरोपीच्या पायाला गोळी लागली. त्याने दिलेल्या माहितीवरून दुसऱ्या आरोपीला पकडण्यात आले. तपासाअंती कळाले की, व्यावसायिकाकडे काम करणाऱ्यानेच घरात दागिने व पैसे कुठे ठेवले याची माहिती दिली होती.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, घरात लुटमार केल्याचे ते सीसीटीव्ही फुटेज नेरुळमधील नसून दिल्लीतील आहे. तसचे ते चोर पार्सल देणाऱ्या म्हणून आले नव्हते तर, वीज विभागातील कर्मचारी म्हणून आले होते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:दिल्लीमधील दरोड्याचा व्हिडिओ मुंबईचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False