सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून नियुक्तीचा फेक मेसेज पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय | Political

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली, असे मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत. विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी आणि सुमित्रा महाजन येणार म्हणून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, ही निव्वळ अफवा आहे. सुमित्रा महाजन यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली नाही. 

काय आहे दावा?

मूळ पोस्ट – इन्स्टाग्राम | फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सुमित्रा महाजन यांची अशी नियुक्ती झाली आहे का याचा गुगलवर शोध घेतला असता कोणत्याही मीडिया वेबसाईटवर अधिकृत बातमी आढळली नाही. राज्यपालांची नियुक्ती ही मोठी बातमी आहे. ती जाहीर होताच सर्व दैनिकांनी प्राधान्याने प्रकाशित केली असती. परंतु, तसे काही आढळून आले नाही. 

सुमित्रा महाजन यांच्या ट्विटर अकांउटवरदेखील याविषयी काही ट्विट केलेले नाही. 

राज्यपाल नियुक्तीची घोषणा सर्वप्रथम राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रसारित केली जाते. राष्ट्रपती कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर सुमित्रा महाजन यांच्या नियुक्तीची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. 

मग महाजन यांची नियुक्ती झाली का?

नाही. सुमित्रा महाजन यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. 

अमर उजालाशी बोलताना त्यांनी म्हटले की, “सोशल मीडियावर माझ्या नियुक्तीच्या वावड्या उठल्यानंतर मला खूप जणांचे शुभेच्छा देण्यासाठी फोन आले. परंतु, या बातम्या केवळ अफवा आहेत. राज्यपालपदासाठी मला अद्याप अधिकृत विचारणा झालेली नाही.”

‘सकाळ’नेसुद्धा राज्यपाल कार्यालयाच्या हवाल्याने वृत्त दिले की, महाजन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली नाही.

मूळ बातमी – अमर उजाला

सुमित्रा महाजन यांच्या नियुक्तीची अफवा पसरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2019 सालीसुद्धा अशाच पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. 

त्यावेळी फॅक्ट क्रेसेंडोने राजभवनाशी संपर्क करून याबाबत पुष्टी करून घेतली. तेथील जनसंपर्क कार्यालयाने माहिती दिली होती की, राज्यपालांच्या नियुक्तीची माहिती राष्ट्रपती भवनाद्वारे दिली जाते. त्यांनी अद्याप सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्तीची माहिती दिलेली नाही.

राष्ट्रपती कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने सांगितले होते की, राष्ट्रपतींच्या सर्व निर्णय आणि नियुक्तीची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे राज्यपालांची नियुक्ती झाली की नाही हे खात्रीशीरपणे जाणून घेण्यासाठी राष्ट्रपती कार्यालयाची वेबसाईट तपासावी.

निष्कर्ष

यावरुन स्पष्ट होते की, सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली नाही. ही केवळ अफवा आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून नियुक्तीचा फेक मेसेज पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False