जो बायडन यांनी जॉर्ज फ्लॉईडच्या मुलीची गुडघ्यावर बसून माफी मागितली का? वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

अमेरिकेत गेल्या मे महिन्यात पोलिसांच्या हातून जॉर्ज फ्लॉईड नामक एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वांशिकवादाची ठिणगी पडून पोलिस अत्याचारांविरोधात संपूर्ण अमेरिकेत मोठे जनआंदोलन पेटले. ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ चळवळीने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी पोलिसांची बाजू घेतली होती.

नवनिर्वातित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पोलिस हिंसा कमी करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, त्यांचा एका लहान मुलासमोर गुडघ्यावर बसून बोलतानाचा एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, त्यांनी जॉर्ज फ्लॉईड यांच्या मुलीची अशी माफी मागितली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता कळाले की, सोशल मीडियावरील दावा खोटा आहे.

काय आहे दावा?

जो बायडन एका लहान मुलासमोर एका गुडघ्यावर बसून बोलत असल्याचे फोटोमध्ये दिसते. सोबत म्हटले आहे की, ही जी मुलगी आहे, जिच्या समोर जगातल्या सर्वात शक्तिशाली राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडेन आपल्या गुडघ्यावर वाकून क्षमा याचना करताहेत, ती जॉर्ज फ्लोयड ची मुलगी आहे. तिच्या  वडिलांना एका गोऱ्या वर्णाच्या पोलिसाने गुडघ्याखाली दाबून मारले होते. त्यानंतर सगळ्या पोलिसांनी श्यामवर्णीय समाजाची गुडघे टेकून माफी मागितली होती, त्या पोलिसाच्या पत्नीने घटस्फोट घेतला. सगळे पोलीस माफी मागताहेत. राष्ट्राचे अध्यक्ष माफी मागताहेत. पत्नी सोडून जातेय. हे वास्तव आहे त्या देशाच्या जगात अग्रेसर असण्याचे. आपल्याकडे मुस्लिमांवर, दलितांवर होणाऱ्या अनंत अत्याचाराबद्दल इतकी संवेदना आपले प्रधानमंत्री, आपले प्रशासन,आपला समाज कधी दाखवील.’

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, जो बायडन यांनी स्वतः हा फोटो 15 सप्टेंबर रोजी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेयर केला होता. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचार दरम्यानच्या या फोटोसोबत त्यांनी लिहिले की, ‘आपल्या देशाच्या पुढच्या पीढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला पर्यावरणाचे रक्षणासह आर्थिक सुबत्ता आणावी लागणार आहे.’

हा फोटो शेयर करताना त्यांनी कुठेही जॉर्ज फ्लॉईडच्या मुलीची माफी मागत असल्याचे म्हटलेले नाही.

यावरून मग हा लहान मुलगा/मुलगी कोण आहे ते शोधले. तेव्हा रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या अमेरिकेतील छायाचित्र विभागाच्या संपादिका कॉरिन पर्किन्स यांचे ट्विट आढळले. त्यांनी 10 सप्टेंबर रोजी बाय़डन यांचा हा फोटो शेयर करून म्हटले होते की, प्रचारादरम्यान डेट्रॉईट शहरात बायडन यांनी ‘थ्री थर्टिन’ नावाच्या एका दुकानातून नातवांसाठी काही गिफ्ट्स खरेदी केले. त्यावेळी सी. जे. ब्राऊन या मुलाशी त्यांनी संवाद साधला.

गेटी इमेजवरील माहितीनुसार, सी. जे. ब्राऊन हा मुलगा ‘थ्री थर्टिन’ या दुकानाच्या मालकाचा मुलगा आहे. त्यांच्या दुकानात खरेदी केल्यानंतर बायडन या मुलाशी थोड्या वेळ बोलले होते. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता.

बायडन यांचा हा फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल होऊ लागल्यानंतर हा फोटो काढणारे छायाचित्रकार लेह मिल्स यांनी स्वतः ट्विटरवर खुलासा केला की, जॉर्ज फ्लॉईड यांच्या मुलीची माफी मागतानाचा हा फोटो असल्याचा फेक न्यूज पसरविली जात आहे. हा फोटो सी. जे. ब्राऊन या मुलाचा असून, सोसल मीडियावरील दावे चुकीचे आहेत.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, बायडन यांचा एका लहान मुलासोबत बोलतानाचा फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे.

Avatar

Title:जो बायडन यांनी जॉर्ज फ्लॉईडच्या मुलीची गुडघ्यावर बसून माफी मागितली का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False