ALERT: रस्ता वाहून गेल्याच्या व्हिडियोमुळे औरंगाबाद-जळगाव मार्ग बंद झाल्याची अफवा

False सामाजिक

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई तर जलमय झाली आहे. जोरदार पावसामुळे नागरिकांची दैना उडाली असून, दळवळणावरही परिणाम जाणवत आहे. धो धो पावसामुळे रस्ता वाहून गेल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येत आहे. अनेकांनी दावा केला की, हा व्हिडियो औरंगाबाद ते जळगाव मार्गादरम्यानचा असून त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोच्या एका वाचकाने व्हॉटसअ‍ॅपवर (9049043487) सदरील व्हिडियो पाठवून याची शहानिशा करण्याची विनंती केली.

मूळ व्हिडियो आणि पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पाण्यामुळे रस्ता वाहून गेल्याचा दीड मिनिटांचा व्हिडियो मंगळवारी शेयर करून सांगण्यात आले की, औरंगाबाद ते जळगाव रोड बंद झाला आहे. व्हिडियोमध्ये मुसळधार पावसानंतर वाहण्याऱ्या पाण्याबरोबर रस्ता खचलेला दिसतो. त्यावरून एक जीप गेल्यानंतर रस्ताचा एक मोठा भाग पाण्यासह वाहून जातो. रस्त्याला असे भेदून पाण्याच्या प्रवाहाने रस्ता बंद केल्याचे दिसते. लोक वाहने मागे घेण्यास सांगत आहेत. हा व्हिडियो कुठला आहे याची पोस्टमध्ये माहिती देण्यात आलेली नाही.

तथ्य पडताळणी

गुगलवर पावसाच्या पाण्यामुळे रस्ता वाहून गेला असे सर्च केल्यानंतर विविध बातम्या समोर आल्या. सामानाने दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात 30 जून रोजी (रविवारी) मुसळधार पावसाच्या आगमानानंतर एक रस्ता वाहून गेला. बातमीत म्हटले की, पाण्यातून काही गाड्या गेल्यानंतर रस्ताच पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला. रस्ता वाहून जात असताना गाडी चालकाने प्रसंगावधान राखत गाडी जागीच थांबवली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडियो एएनआय वृत्तसंस्थेने व्हिडियो ट्विट केला होता.

अर्काइव्ह

टीव्ही-9 चॅनेवरील बातमीनुसार, जालना जिल्ह्यातील भोकरदन ते जाफराबाद रस्त्यादरम्यान विरेगाव येथील हा पुल पाण्यासह वाहून गेला. भोकरदन तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली आहे. भोकरदनपासून 6 किमी अंतरावरील विरेगाव येथील पुलावरून वाहने जात असताना रस्ता खचून मोठा खड्डा पडला. त्यामुळे एक जीप बालंबाल वाचली. आमदार अर्जुन खोतकर यांनी या घटनेची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती दिली.

महाराष्ट्र टाईम्सनेदेखील हा व्हिडियो त्यांच्या फेसबुक आणि युट्यूबवर शेयर केलेला आहे. पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूनक ठप्प झाली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली.  यावरून हे स्पष्ट होते की, सदरील व्हिडियो औरंगाबाद किंवा जळगाव जिल्ह्यातील नाही. पावसामुळे विरेगाव (ता. भोकरदन, जि. जालना) येथे पावसामुळे रस्ता वाहून गेला होता. 

मग याचा औरंगाबाद-जळगाव मार्गावर काही परिणाम होऊ शकतो?

औरंगाबादहून फुलंब्री – सिल्लोड – अजिंठा – मार्गे जळगाव असा प्रमुख मार्ग आहे. गुगल मॅपद्वारे स्पष्ट दिसते की, भोकरदन तालुक्यातील विरेगाव या मार्गावर येत नाही. त्यामुळे औरंगाबाद – जळगाव मार्ग बंद झाल्याचा दावा असत्य आहे.

निष्कर्ष

सोशल मीडियावर फिरवला जाणाऱ्या व्हिडियोतील रस्ता वाहून गेल्याची घटना विरेगाव (ता. भोकरदन, जि. जालना) येथे 30 जून रोजी घडली होती. हे गाव भोकरदनपासून 6 किमी अंतरावर आहे. तसेच हे गाव किंवा तो रस्ता औरंगाबाद – जळगाव मार्गावर येत नाही. म्हणून पोस्टमधील दावा असत्य आहे.

Avatar

Title:ALERT: रस्ता वाहून गेल्याच्या व्हिडियोमुळे औरंगाबाद-जळगाव मार्ग बंद झाल्याची अफवा

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False