35 हजार कोटींचे कर्ज बुडवून सुभाष चंद्रा देश सोडून फरार झाले का? वाचा सत्य

False राजकीय सामाजिक

विजय मल्ल्या, नीरव मोदी यांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून आणि घोटाळा करून परदेशात पळून गेले. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा पळपुट्या उद्योगपतींमध्ये आणखी एक नाव सामील झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. भाजपचे राज्यसभा खासदार आणि झी समूहाचे चेयरमन सुभाष चंद्रा कर्ज थकवून देशातून फरार झाल्याचा दावा केला जात आहे. एकुण 35 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून चंद्रा यांनी देशातून पलायन केल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

दैनिक जनसत्ताच्या 24 सप्टेंबर 2019 रोजीच्या बातमीनुसार, सुभाष चंद्रा यांनी शेअरच्या बदल्यात कर्ज घेतल्याचे घेतले होते. अर्थविषयक घडामोडींचे वार्तांकन करणाऱ्या एनडीटीव्ही प्रॉफिटनेही सुभाष चंद्रा यांचा उद्योगसमुह आर्थिक संकटात सापडल्याचे वृत्त दिले होते. त्यामुळे सुभाष चंद्रा यांच्या कर्जाचा बोजा तर होता हे स्पष्ट होते. परंतु, ते बुडवून ते भारतातून पळून गेले का? याचा फॅक्ट क्रेसेंडोने शोध घेतला.

सुभाष चंद्र यांच्यासारखा मोठा उद्योगपती पळून गेला असेल तर ही नक्कीच मोठी बातमी ठरेल. सगळ्या मीडियामध्ये ती दाखवली जाईल. परंतु, तशा कोणत्याही बातम्या आढळल्या नाही. फॅक्ट क्रेसेंडोने श्री. चंद्रा यांच्या कार्यलयाशी संपर्क केला असता, त्यांचे स्वीय सहाय्यक अभिषेक जाधव यांनी सोशल मीडियावरील पोस्ट खोट्या असल्याचे सांगितले. सुभाष चंद्रा भारतातच असून, ते देश सोडून पळून गेलेले नाही, असे ते म्हणाले.

सोशल मीडियावर त्यांच्या पलायनाचा मेसेज व्हायरल झाल्यानंतर सुभाष चंद्रा यांनी स्वतः 27 सप्टेंबर रोजी ट्विट करत या अफवांना पूर्णविराम लावला. त्यांनी ट्विट केले की, “सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईत पाऊस थांबत असतो. यंदा मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत मुंबईत पाऊस पडतोय म्हणजे आश्चर्यच आहे. हवामान बदलाचे हे परिणाम आहेत.”

आर्काइव्ह लिंक

याच दिवशी त्यांनी दुसरे ट्विट करून माहिती दिली की, त्यांनी 27 सप्टेंबर रोजी मुंबईत त्यांच्या आईच्या श्राद्ध घातले. त्यांनी लिहिले की, “मला माहित नाही की, श्राद्धा घातल्याने स्वर्गीय पूर्वजांना मुक्ती मिळते की नाही. पण मी आज कुटुंबासमवेत मुंबईमध्ये माझ्या आईचे श्राद्ध घातले.”

आर्काइव्ह लिंक

मग 29 सप्टेंबर रोजी सुभाष चंद्रा यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. सोबत सांगितले की, मी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईच्या डॉ. रश्मिकांत पटेल यांच्या दवाखान्यात जात आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत वापस येईल.

आर्काइव्ह लिंक

याच दिवशी रात्री त्यांनी एक फोटो ट्विट करून लिहिले की, माझ्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी शुभकामना देण्यासाठी माझे नातेवाईक पवन जैन माझ्या मुंबईतील घरी आले होते.

आर्काइव्ह लिंक

याच दरम्यान, सुभाष चंद्रांचा मुलगा पुनीत गोयनकाने 29 सप्टेंबर रोजी ट्विट करत सांगितले की, माझे वडिल मुंबईतच आहेत. ते देश सोडून गेल्याच्या अफवा आहेत. ते कुठेही गेलेले नाहीत. ते भारतातच आहेत. प्रत्येक आव्हानाला धैर्याने समोर जाण्याची त्यांची वृत्ती आहे. संकटाला पाहून पळून जाणाऱ्यांपैकी ते नाही. त्यामुळे अशा खोट्या अफवा पसरविणाऱ्यांनी जीवनात सकारात्मक गोष्टींवर ध्यान दिले पाहिजे.

आर्काइव्ह लिंक

आर्काइव्ह लिंक

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, भाजपचे खासदार आणि झी समुहाचे चेयरमन सुभाष चंद्रा 35 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून भारतातून पळून गेलेले नाहीत. सोशल मीडियावर पसरविल्या जाणाऱ्या या अफवा आहेत. सुभाष चंद्र मुंबईतच असून, नुकतेच त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे सदरील पोस्ट असत्य ठरते.

Avatar

Title:Fact Check : सुभाष चंद्रा हे देश सोडून फरार झाले आहेत का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False