डोनाल्ड ट्रम्पच्या मुलीने अकबरुद्दीन ओवैसी यांच्या हॉस्पिटलला भेट दिली का? जाणून घ्या सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडियोद्वारे दावा करण्यात येत आहे की, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्येने एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे छोटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांच्या अत्याधुनिक रुग्णालयाला भेट दिली. व्हिडियोमधील विदेशी मुलगी या हॉस्पिटलमधील सुविधा आणि अकबरुद्दीन यांच्या सामाजिक कार्याची तोंडभरून कौतुक करीत आहे. झपाट्याने शेयर होत असलेल्या या व्हिडियोला आतापर्यंत लाखो व्ह्युव्ज मिळालेले आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमधील 25 सेकंदाच्या व्हिडियो क्लिपमध्ये एक विदेशी तरुणी इंग्रजीतून म्हणते की, Everyone’s been so hospitable. I think everyone…especially Akbaruddin Owaisi as well as the hospital…the community service that he is doing here…women empowerment. I am very grateful for what he is doing. The hospital is beautiful. It is taking care of the community. Everyone is really in safe hands. I am very appreciative of everyone. (हॉस्पिटलमधील लोक आणि सुविधा दोन्ही फार छान आहेत. हॉस्पिटलच्या माध्यमानतून अकबरुद्दीन ओवैसी अत्यंत महत्त्वाचे सामाजिक कार्य करीत आहेत. विशेषतः महिला सबलीकरणाचे काम उल्लेखनीय आहे. हॉस्पिटल फार सुंदर आहे.)

ही तरुणी डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी असल्याचे पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, अमेरिका डोनाल्ड ट्रंप की बेटी खुद कह रही हैं कि हम स्पेशल अकबरुद्दीन ओवैसी के हॉस्पिटल विजिट करने के लिए आई हो असादुद्दीन ओवैसी नाम नहीं ब्रांड है.

तथ्य पडताळणी

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवान्का किंवा टिफनी यांनी अलिकडे भारताला भेट दिलेली नाही. नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून इवान्का 2017 साली भारतात आली होती. हैदराबाद येथे झालेल्या आठव्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेमध्ये (Global Entrepreneurship Summit) त्या सहभागी झाल्या होत्या. मग तेव्हा त्यांनी ओवैसी यांच्या हॉस्पिटलला भेट दिली होती का याचा शोध घेतला.

यूट्यूबवर शोध घेतला असता शार्प इंडियन्स न्यूज चॅनेलवरील 1 डिसेंबर 2017 रोजी अपलोड केलेला एक व्हिडियो समोर आला. व्हिडियोच्या शीर्षकामध्ये ही मुलगी इवान्का ट्रम्प यांची मैत्रीण असल्याचे म्हटले आहे. एकुण 4.11 मिनिटांच्या या व्हिडियोतून सदरील पोस्टमधील 25 सेकंदाची क्लिप एडिट केलेली आहे.

व्हिडियोच्या सुरुवातीला ही मुलगी तिचे नाव ब्रियाना कूक (Brianna Cook) असे सांगते. तसेच ती इवान्का ट्रम्प यांच्या शिष्टमंडळातर्फे आल्याचीही माहिती देते. संपूर्ण व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. 

याविषयी अधिक शोध घेतल्यावर एनआरक्यू-24 चॅनेलचा एक व्हिडियो समोर आला. यामध्येसुद्धा स्पष्ट म्हटले आहे की, ब्रियाना कुक यांनी ओवैसी ग्रुपच्या हैदराबाद येथील प्रिन्सेस इसरा हॉस्पिटलला भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. अत्यंत कमी खर्चात गरीब-गरजू लोकांना अत्याधुनिक उपचार मिळत असल्याचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी हॉस्पिटल स्टाफ, डॉक्टर आणि रुग्णांशीदेखील चर्चा केली.

ब्रियाना कूक यांच्या भेटीचे फोटोदेखील त्यावेळी एमआयएमशी निगडीत फेसबुक पेजवरून शेयर करण्यात आले होते. अकबरुद्दीन ओवैसी – युथ आयकॉन नावाच्या पेजने 2 डिसेंबर 2017 रोजी फोटो शेयर करताना लिहिले की, नुकतेच पार पडलेल्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेसाठी आलेल्या अमेरिकेच्या शिष्टमंडळातील सदस्या ब्रियाना कूक यांनी प्रिन्सेस इसरा हॉस्पिटलला भेट दिली. ओवैसी ग्रुपतर्फे अत्यंत कमी खर्चात उपचार उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

कोण आहेत ब्रियाना कूक?

अमेरिकेतील फ्लोरीडा येथील ब्रियाना कूक या IoTeedom कंपनीच्या संस्थापक आहेत. कंपनीच्या वेबसाईटनुसार माहिती व तंत्रज्ञानाधिष्ठ सेवा पुरवणाऱ्या या कंपनीचे अमेरिका, भारत, कुवैत, मलेशिया आणि सिंगापूर येथे कार्यालये आहेत. इंटनेट ऑफ थिंग्स, स्मार्ट सिटी, अक्षय ऊर्जा, दूरसंचार आणि फायबर ऑप्टिक्स यासारख्या विविध क्षेत्रांसाठी ही कंपनी सुविधा पुरविते. मोहम्मद खिजरान खान या कंपनीचा सहसंस्थापक आहे. 

ब्रियाना यांनी 30 नोव्हेंर 2017 रोजी अकबरुद्दीन ओवैसी यांची भेटदेखील घेतली होती. अकबरुद्दीन ओवैसी – युथ आयकॉन नावाच्या ट्विटर हँडलवरून या भेटीचे फोटो शेयर करण्यात आले होते. 

अर्काइव्ह

निष्कर्ष

सदरील व्हिडियो क्लिपमधील विदेशी मुलगी डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या नसून, तिचे नाव ब्रियाना कूक आहे. हैदराबाद येथे 2017 साली झालेल्या आठव्या ग्लोबल आंत्रप्रन्युएरशीप समीटनिमित्त आलेल्या अमेरिकन शिष्टमंडळासोबत त्या भारतभेटीवर आल्या होत्या. यावेळी त्यांनी ओवैसी ग्रुपच्या प्रिन्सेस इसरा रुग्णालयाला भेट दिली होती. सदरील व्हिडियो या भेटीनंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा आहे. त्यामुळे सदरील पोस्टमधील दावा खोटा आहे.


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •