
मुंबई-पुणे महामार्गावर लिची आणि सफरचंद रंग लावून विकले जात आहेत. त्यामुळे या महामार्गावर विकली जाणारी फळे खाऊ नयेत अथवा ती खात्री करुनच विकत घ्यावी अशी माहिती असलेला एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. सलीम अन्सारी, मनोज पवार आदींनी अशा माहितीसह हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
मुंबई-पुणे महामार्गावर लिची आणि सफरचंद रंग लावून विकले जात आहेत का, हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला त्यावेळी असे कोणतेही वृत्त आम्हाला दिसून आले नाही. त्यानंतर आम्ही या व्हिडिओतील स्क्रीनशॉट घेत ही दृश्ये रिव्हर्स इमेज केली. त्यावेळी मिळालेल्या परिणामात ब्रिटनमधील डेली मेल या वृत्तपत्राच्या अधिकृत युटूयूब चॅनलवर 10 सप्टेंबर 2018 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असल्याचे दिसून आले. या व्हिडिओखाली दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, एका ब्रिटीश पर्यटकाने इशारा दिला आहे की, रस्त्यावरील विक्रेते पांढऱ्या द्राक्षांना लाल रंग देत आहेत. 23 वर्षीय लैला खान आणि तिच्या चुलतभावाने त्यांची मावशी आजारी पडल्यावर आणि तिला अतिसाराचा त्रास झाल्यावर रस्त्यावर चालणाऱ्या या गैरप्रकाराचा शोध घेतला. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.
डेली मेलने या घटनेचे आपल्या संकेतस्थळावर सविस्तर वृत्तही दिले आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानमधील मिरपूर जिल्ह्यातील अफझलपूर या गावातील आहे.
द स्कॉटीश सन या संकेतस्थळाने या व्हिडिओसह एक वृत्तात प्रसारित केला होता. तो आपण खाली पाहू शकता.
न्यूज.कॉम.एयूने दिलेल्या वृत्तानुसार, घटनेनंतर लैला खान यांनी पोलिसांशी संपर्क साधून याबाबत तक्रार दिली आहे.
निष्कर्ष
हा व्हिडिओ मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अथवा महाराष्ट्रातील नाही. तो पाकिस्तानमधील मिरपूर जिल्ह्यातील आहे.

Title:मुंबई-पुणे महामार्गावरील म्हणून व्हायरल झालेला व्हिडिओ पाकिस्तानमधील
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
