अकोल्यातील मुलीचा फोटो औरंगाबादमधील ‘कोरोना’ संशयित म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Coronavirus False वैद्यकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कोरोना विषाणूबाधित रुग्ण महाराष्ट्रातही आढळू लागले आहेत. पुणे आणि मुंबईनंतर आता औरंगाबादमध्येदेखील एका संशयित रुग्णावर उपचार सुरू आहेत. ही बातमी कळताच औरंगाबादमधील कोरोना संशयिताचा फोटो म्हणून एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा फोटो पाठवून याची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो औरंगाबादचा नसल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

रुग्णालयातील एका रुममध्ये दोन डॉक्टर एका मुलीला तपासत असतानाचा फोटो शेयर करण्यात येत आहे. सोबत म्हटले जातेय की, औरंगाबाद घाटी रुग्णालयात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण दाखल. संपूर्ण मेडिसिन बिल्डिंग केली खाली. 

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम औरंगाबादमध्ये उपचार सुरू असलेल्या संशयित रुग्णाची माहिती मिळवली. वर्तमानपत्रातील बातम्यांनुसार, उत्तर प्रदेश येथून आलेल्या एका 16 वर्षीय तरुण मुलाला कोरोनाचा संशयित रुग्ण म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्याचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले असून, त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली आहे की, नाही हे कळेल. दुबई आणि इटली येथून परतलेल्या चार जणांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यात एकाही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. 

औरंगाबादमधील संशयित रुग्ण एक मुलगा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोत मुलगी रुग्ण आहे. त्यामुळे हा फोटो कुठला आहे याचा शोध घेतला. गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की हा फोटो अकोला येथील आहे. 

लोकमतच्या बातमीनुसार, 7 मार्च रोजी जर्मनीहून परत आलेल्या एका 24 वर्षीय तरुणीला ताप आल्याने ती अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात गेली होती. तिला विलगीकरण कक्षात भरती करून उपचार सुरू करण्यात आले. यानंतर सगळीकडे अकोल्यात कोरोनाची संशयित रुग्ण आढळल्याची बातमी पसरली. यामुलीचे नाव आणि फोटो सोशल मीडियावर फिरू लागले. 

फॅक्ट क्रेसेंडोने अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी माहिती दिली की, “सोशल मीडियावरील व्हायरल फोटो अकोल्यातील आहे. ही मुलगी शनिवारी (7 मार्च) आमच्या रुग्णालयात आली होती; परंतु भरती न होताच निघून गेली. त्यानंतर तिचा शोध घेऊन सायंकाळी तिला विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी अहवालातून तिला कोरोना विषाणुची लागण झालेली नाही हे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला घरी सोडण्यात आले.”

मग हा फोटो कोणी काढला?

डॉ. घोरपडे यांनी सांगितले की, रुग्णालयातील एका प्रशासकीय अधिकाऱ्याने हा फोटो काढला होता. त्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, या प्रकरणी तीन सदस्यीय समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. येत्या एक-दोन दिवसांत चौकशीचा अहवाल आल्यानंतर तो आरोग्य संचालकांना पाठवण्यात येईल. 

दरम्यान, कोरोनाची संशयित म्हणून मुलीचे फोटो पसरल्यामुळे तिच्या वडिलांनी अधिष्ठाता आणि सायबर पोलिसांकडे यासंबंधी तक्रार केली. याप्रकरणामुळे आमची नाहक बदनामी झाल्याची त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, अशी माहिती डॉ. घोरपडे यांनी फॅक्ट क्रेसेंडोला दिली. 

तसेच संबंधित मुलीचे रिपोर्ट येण्यापूर्वी तिला करोना संशयित जाहीर करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

घाटीतील संपूर्ण मेडिसिन बिल्डिंग रिकामी करण्यात आली का?

नाही. ही निव्वळ अफवा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा मेसेज फिरत आहे. घाटी प्रशासनाने हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले असून, कोरोना व्हायरसविषयी अफवा किंवा खोडसाळ मेसेज न पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निष्कर्ष

सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो औरंगाबादमधील कोरोनाच्या संशयित रुग्णाचा नाही. हा फोटो अकोल्यातील असून, यामध्ये दिसणाऱ्या मुलीला कोरोना विषाणूची लागण झालेली नाही.

Avatar

Title:अकोल्यातील मुलीचा फोटो औरंगाबादमधील ‘कोरोना’ संशयित म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •