हत्तीने सोंडेत सिंहाच्या बछड्याला पकडल्याचा तो व्हायरल फोटो खोटा आहे. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय

एका हत्तीने सोंडेत सिंहाचा बछडा घेतल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. जमीन तापलेली असल्यामुळे सिंहाच्या बछड्याला चालताना त्रास होत होता. हे पाहून हत्तीने त्याला सोंडेत धरले आणि  पाणवठ्याकडे नेले, असा दावा या फोटोविषयी केला जात आहे. या क्षणाचे टिपलेले हे छायाचित्र या शतकातील सर्वोत्कृष्ट फोटो मानला जातो, असे मेसेजमध्ये म्हटले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली असता हा फोटो खोटा असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

रणरणत्या उन्हात सोंडेत सिंहाचा बछडा घेतलेला हत्ती आणि सोबत बछड्याची आई चालतानाचा फोटो शेयर करून म्हटले की, या शतकातील हा सर्वोत्कृष्ट फोटो मानला जात आहे. एक सिंहीण आणि तिचा छावा जंगल पार करत होते पण उष्णता इतकी जास्त होती की, छाव्याला चालायलाही खूप त्रास होत होता. एका हत्तीणीला ते समजले की कदाचित तो छावा चालता चालताच मरून जाईल, म्हणून तिने त्याला आपल्या सोंडेत घेऊन पाणवठ्याच्या दिशेने ती चालायला लागली. ती सिंहिणही तिच्या बरोबर पाणवठ्याच्या दिशेने चालायला लागली, आणि आपण त्यांना जंगली जनावर समजतो. नवजातीसाठी हा एक उत्तम धडा आहे कारण आपण विनाकारण लढत आहोत आणि कित्येक माणस विनाकारण मरत आहेत वंशभेद, वर्णभेद, जातीभेद आणखी किती काही. एकमेकाला मदत करणे म्हणजेच माणुसकी आहे. हाच तर फरक आहे “ह्यूमन बिईंग” आणि “बिईंग ह्यूमन” मध्ये.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो 2018 पासून हा फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहे. समोर आलेल्या विविध लिंक्सची तपासणी केली असता कळाले की, हा फोटो सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्कने शेयर केला होता. 

एप्रिल फुल म्हणजेच 1 एप्रिल 2018 रोजी पार्कच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा फोटो शेयर करीत म्हटले होते की, एक मादा सिंह आपल्या बछड्यासह चालत असताना थकून गेली होती. एका हत्तीने तिला पाहिले आणि तिला मदत करायचे ठरवले. जवळ येत या हत्तीने आपली सोंड बछड्यासमोर धरली आणि त्याला सोंडेत धरून चालू लागली.

अर्काइव्ह

वरील ट्विटच्या शेवटी “Sloof Lirpa” असे लिहिलेले आहे. हे “April Fools” चे उलटे स्पेलिंग आहे. म्हणजे क्रगुर नॅशल पार्कने एप्रिल फुलनिमित्त केवळ गंमत म्हणून हा फोटो शेयर केला होता. तेव्हापासून हा फोटो अनेक जण मात्र खरा मानतात.

हत्तीचा फोटो आणि सिंहाच्या बछड्याचा फोटो दोन्ही वेगवेगळे आहेत. त्यांना फोटोशॉपच्या मदतीने एकत्र करून हा फोटो तयार करण्यात आला होता. खाली दोन्ही मूळ फोटो दिलेले आहेत. त्यावरून हे कसे केले असेल हे अधिक स्पष्ट होईल.

हत्तीचा मूळ फोटो क्रुगर नॅशनल पार्कमध्ये 2005 साली काढण्यात आला होता. बछड्याचा फोटो ऑस्ट्रेलियातील वेरिबी ओपन रेंज झू येथील आहे. बछड्याचा फोटो मिरर रिव्हर्स करून हत्तीच्या सोंडेत ठेवण्यात आला होता.

निष्कर्ष

सोंडेत सिंहाचा बछडा घेऊन चाललेल्या हत्तीचा फोटो खोटा आहे. दोन वेगवेगळे छायाचित्रे फोटोशॉपद्वारे एडिट करून सदरील व्हायरल फोटो तयार करण्यात आलेला आहे. एप्रिल फुल दिनानिमित्त केलेली गंमत अनेकजण खरी मानत आहेत.