2012 मधील लाठीचार्जचे फोटो सध्या सुरू असलेल्या जेएनयू आंदोलनाचे म्हणून व्हायरल. पाहा सत्य

False सामाजिक

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांनी वसतिगृहासह इतर शुल्कवाढीविरोधात सुरू केलेले आंदोलन शमण्याचे नाव घेत नाहीए. विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेरसुद्धा आंदोलन पसरू लागले असून, विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांना अनेक आंदोलकांवर गुन्हेदेखील दाखल केले आहेत. पोलिसांनी जेएनयू विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

दिल्ली पोलिस कर्मचारी एका तरुणीवर काठीने वार करतानाचा एक फोटो शेयर करून लिहिले की, फक्र है! आज कॅम्पस च्या बाहेर सापडलेल्या, संसदेवर मोर्चा काढणाऱ्या JNU वाल्यांना दिल्ली पोलिसांनी मस्त तुडवलंय, थँक यु दिल्ली पोलीस. ही पोस्ट आतापर्यंत 1200 पेक्षा जास्त वेळा लाईक करण्यात आली असून, 269 वेळा शेयर करण्यात आली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

‘जेएनयू’विषयी सध्या अनेक प्रकारच्या अफवा पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे सदरील फोटो खरंच सध्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यानचा आहे का, हे तपासण्यासाठी हा फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्च केला. इंडिया टुडेच्या 2014 मधील एका बातमीत हा फोटो वापरल्याचे आढळले. फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, 2012 मध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्काराविरोधात प्रदर्शन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा हा फोटो आहे.

हा धागापकडून अधिक शोध घेतला असता, जेंडर बाईट्स नावाच्या ब्लॉवरील 22 डिसेंबर 2012 रोजीच्या पोस्टमध्ये हा फोटो आढळला. त्यानुसार, निर्भायाप्रकरणी पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यासाठी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी धरणे आंदोलने केली होती. आंदोलकांना पसरविण्यासाठी पोलिसांनी त्यावेळी बलप्रयोग करीत लाठीचार्ज केला होता.

गुगलवर  Delhi Police Lathi Charge On Women 22 December 2012 असे सर्च केले असता रिमा कलिंगल नामक ट्वटिर युजरने 22 डिसेंबर 2012 रोजी हा फोटो ट्विट केल्याचे आढळले. त्यानुसार, हा फोटो दिल्लीच्या रायसिना हिल भागात काढण्यात आला होता.

इंडिया टुडेच्या 23 डिसेंबर 2012 रोजीच्या बातमीतही हा फोटो वापरण्यात आलेला आहे. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जवरून मोठी टीका झाली होती. केंद्र सरकारनेदेखील दिल्ली पोलिसांचे तत्कालिन कमिश्नर नीरज कुमार यांच्याकडे याप्रकरणी स्पष्टीकरण मागितले होते. 

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडे

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, तरुणीवर लाठीचार्ज करतानाचा हा फोटो जेएनयू आंदोलनाचा नाही. हा फोटो 2012 साली निर्भया सामूहिक बलात्काराविरोधी करण्यात आलेल्या प्रदर्शनातील आहे. त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर अशाप्रकारे बलप्रयोग केला होता. त्यामुळे सदरील पोस्ट चुकीची ठरते.

Avatar

Title:2012 मधील लाठीचार्जचे फोटो सध्या सुरू असलेल्या जेएनयू आंदोलनाचे म्हणून व्हायरल. पाहा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False