तो व्हिडिओ शिवनाग वृक्षाच्या मुळांचा नाही; त्या तर हॉर्सहेअर अळ्या आहेत, वाचा सत्य

False सामाजिक

दोरे किंवा वायरचा गुंता वाटावा तशा हालचाल करणाऱ्या एका गोष्टीचा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, ती शिवानाग नामक वृक्षाची मुळं आहेत. सोबत म्हटलंय की, हे झाड तोडल्यानंतर ही मुळं 10 ते 15 दिवस जिवंत राहतात.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याची पडताळणी करण्याची विनंती केल्यावर कळाले की, हा दावा खोटा आहे. कारण हा व्हिडिओ हॉर्सहेअर नामक अळ्यांचा आहे.

काय आहे दावा?

30 सेकंदाच्या व्हायरल क्लिपमध्ये वायरप्रमाणे एकमेकांत गुंतलेली व वळवळ करणारी एक गोष्ट दिसते. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, शिवनाग वृक्षाची मुळे आहेत. तोडल्यानंतर ही मुळ सुकायला 10 ते 15 दिवस लागतात. तोपर्यंत अशीच वळवळत रहातात. हे बऱ्याच जणांना माहीत नसेल म्हणून पोस्ट केलंय.”

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडिओतील कीफ्रेम्स निवडून सर्च केल्यावर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडियो वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असल्याचे आढळले. युट्युबवरील एका व्हिडियोखाली अनेकांनी शिवनाग वृक्षांच्या मुळांचा दावा खोटा सांगितल्याचे दिसते. काहींनी हा व्हिडिओ ‘हॉर्सहेअर वर्म’चा (Horsehair Worm) असल्याचे सांगितले.

हा धागा पकडून अधिका शोध घेतला असता कळाले की, हॉर्सहेअर वर्म नावाची हा अळी घोड्यांच्या केसांप्रमाणे दिसते. अ‍ॅडॉबी स्टॉक इमेज वेबसाईटवर या अळ्यांचा एक व्हिडिओ उपलब्ध आहे. त्याचा प्रिव्ह्युव तुम्ही खाली पाहू शकता.

काय आहे हॉर्सहेअर वर्म?

केसांप्रमाणे बारीक व लांब आकाराच्या या अळ्या परजीवी प्रकारातील आहेत. रातकिडे, टोळ, झुरूळ अशा प्राण्यांच्या शरीरात जाऊन ते आपली उपजीविका भागवितात. शरीरात गेल्यावर त्या प्राण्यांना आतून खाण्यास सुरुवात करतात. तसेच त्यांच्या मेंदूवर ताबा मिळवून त्याला पाण्यापाशी घेऊन येतात. पाण्यात आल्यावर मग त्या प्राण्याच्या शरीरातून बाहेर पडतात. 

फॅक्ट क्रेसेंडोने मग मल्याळम टीमच्या सहाय्याने केरळ विद्यापीठातील जलीय जीवशास्त्र व मत्स्यशास्त्र विभागाचे प्रा. बिजू कुमार यांच्याशी संपर्क साधला. 

त्यांनी सदरील व्हायरल व्हिडिओ पाहून सांगितले की, “ही कोणत्याही झाडांची मुळे नाहीत. या अळ्या आहेत. या अळ्या सहसा प्राण्यांच्या पोटात आढळतात. परंतु, पाणी आणि जमिनीवरही त्या राहू शकतात. व्हिडिओवरून स्पष्ट होते की, या अळ्या आहेत.”

शिवनाग वृक्ष : एक मिथक

इंटरनेटवर शिवनाग वृक्ष नावाची एखादी वनस्पती असते का याचा शोध घेतल्यावर कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. मग आम्ही केरळ कृषी विद्यापीठातील सुवासिक व औषधी वनस्पती संशोधन केंद्राच्या डॉ. अ‍ॅन्सी जोसेफ यांच्याकडे विचारणा केली.

“शिवनाग वृक्ष नामक कोणत्याही वनस्पती मी कधी पाहिली अथवा ऐकली नाही. व्हिडिओ पाहून मी सांगू शकते कोणत्याही झाडाची मुळे अशी हालचाल करीत नाहीत. काही झाडांची मुळे वाळण्यासाठी 10 ते 15 दिवस लागू शकतात. अशी काही उदाहरणे आहेत पण त्यांची मुळे अशी वळवळ करीत नाहीत,” असे डॉ. जोसेफ यांनी स्पष्ट केले.

निष्कर्ष

शिवनाग वृक्षाची मुळं म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडियो खरं तर हॉर्सहेअर वर्म नामक एका अळीचा आहे. कोणत्याही झाडाची मुळे अशा प्रकारे हालचाल करीत नाहीत, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदरील व्हिडिओसोबत केला जाणारा दावा असत्य आहे.

Avatar

Title:तो व्हिडिओ शिवनाग वृक्षाच्या मुळांचा नाही; त्या तर हॉर्सहेअर अळ्या आहेत, वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False