कोविड-19 टेस्ट किट्सची 2017 पासूनच विक्री सुरू झाली होती का? वाचा सत्य

Coronavirus False

कोरोना विषाणूच्या महामारीविषयी जगभरात अचंबित करणारे दावे केले जातात. या विषाणूचा उगम कसा झाला यापासून ते तो पसरविण्यामागचा हेतू, याविषयी अनेक कन्सिपरसी थेयरीज आहेत. 

जगभरातील आयात-निर्यातीचा डेटा दाखवून आता दावा केला जात आहे की, कोरोनाच्या टेस्ट किट्स 2017 पासूनच काही देशांनी विकत घेऊन ठेवल्या होत्या. याचाच अर्थ की, कोरोना व्हायरसची माहिती 2019 च्या आधीच माहिती होती. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. जागतिक बँकेच्या माहितीचा चुकीचा अर्थ काढला जात आहे.

काय आहे दावा?

पोस्टमध्ये जागतिक बँकेच्या वेबसाईटवरील माहितीचे स्क्रीनशॉट शेयर करण्यात आले आहेत. देशागणिक 2017 आणि 2018 मध्ये कोविड-19 टेस्ट किट्सची कशी निर्यात करण्यात आली याची माहिती यामध्ये दिलेली आहे.

सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “World Integrated Trade Solution वर जागतिक पातळीवर ज्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात झाली होती त्याबद्दल माहिती असते. धक्कादायक बाब म्हणजे यावर COVID-19 च्या टेस्टकिट्स जगातल्या काही देशांनी 2017 सालीच विकलेल्या आहे असं दिसून येते. म्हणजे, कोव्हिडं-19 नामक बाळ जन्माला येणार आहे हे सगळीकडे माहीत होते.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

जागतिक बँक, संयुक्त राष्ट्राची व्यापार व विकास परिषद (UNCTD) आणि जागतिक व्यापार संघटना (WTO) यांच्या संयुक्त विद्यमाने World Integrated Trade Solution (WITS) हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. WITS च्या वेबसाईटवर जगभरातील व्यापार आणि आयात-निर्यातीची वस्तूनिहाय माहिती आणि आकडेवारी उपलब्ध करून देण्यात येते. 

कोविड-19 टेस्ट किट्सची देशानिहाय कशी देवाणघेवाण झाली याची माहिती घेण्यासाठी WITS च्या वेबसाईटला भेट दिली. तेथील उपलब्ध माहिती आणि आकडेवारीचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की, जागतिक बँकेने वैद्यकीय उत्पादनांना मार्च 2020 मध्ये नवीन नामावली लागू केल्यामुळे हा सगळा घोटाळा झाला. तो कसा हे टप्प्याने समजून घेऊया.

1. सहा-अंकी HS कोड

जागतिक बँकेने जगभरातील विविध उत्पादनांचे वर्गीकरण करण्यासाठी प्रत्येक वस्तूला एक सहा-अंकी कोड दिला जातो. या वर्गीकरण प्रणालीला Harmonized Systems (HS) म्हणतात. 

उदा. – ग्रीन टी (090210), सोयाबीन (120100)

या सहा-अंकाच्या कोडमधील पहिले दोन आकडे (HS-2) वस्तूचा मुख्य प्रकार दर्शवितात. उदा – 09 म्हणजे कॉफी, चहा आणि मसल्याचे पदार्थ. सहा-अंकी कोडचे मधले दोन आकडे (HS-4) वस्तूच्या मुख्य प्रकारामधील नेमका कोणता पदार्थ याची माहिती देतात. म्हणझे 09-02 चा अर्थ चहा होतो. सहा-अंकी कोडचे शेवटचे दोन आकडे (HS-6) पदार्थाबद्दल अधिक सखोल माहिती देतात. म्हणजे 09-02-10 याचा अर्थ ग्रीन टी होतो.

2. कोविड-19 निमित्त नवीन कोड

कोविड-19 महामारीच्या आधी काही वैद्यकीय उत्पादनांच्या मुख्य प्रकारांना क्लिष्ट तांत्रिक नावे दिलेली होती. जानेवारी 2020 मध्ये जेव्हा कोविड-19 टेस्ट किट्स तयार झाल्या. सुरुवातीला कोविड-19 टेस्ट किट्सचे पूर्वीच्या पद्धतीनुसारच वर्गीकरण करण्यात आले.

परंतु, मार्च 2020 मध्ये कोरोनाला जागतिक महामारी (Pandemic) घोषित केल्यानंतर कोरोनाची चाचणी आणि उपचाराच्या उत्पादनांची अधिक सुलभ माहिती ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि जागतिक सीमाशुल्क संघटनेने (WCO) कोविड-19 टेस्ट किट्सचे वर्गीकरण करण्यासाठी तीन कोड – 382200, 300215, 902780 – निश्चित केले.

मूळ परिपत्रक येथे पाहा – WCO

एवढेच नाही तर पटकन समजावे म्हणून तांत्रिक क्लिष्टता टाळून या उत्पादनांना सरळसोपे “COVID-19 Test Kits” असे नाव देण्यात आले. त्यामुळे झाले असे की, हँडसॅनिटायझर आणि व्हेंटिलेटरसुद्धा “COVID-19 Test Kits” अंतर्गत नुमद करण्यात येऊ लागले. या नव्या वर्गीकरणामुळे अनेक वैद्यकीय उत्पादने “COVID-19 Test Kits” म्हणून दिसू लागली. 

उदाहरणार्थ, जर एखाद्या देशाने 2017 मध्ये हँड सॅनिटायजर जरी निर्यात केले असते तर WITS च्या वेबसाईटवर तेसुद्धा “COVID-19 Test Kits” म्हणूनच दर्शविले गेले असते.

2017 आणि 2018 साली जी उत्पादने “COVID-19 Test Kits” म्हणून दिसत आहेत ती मुळात कोविड-19 चाचणी किट्स नाहीत. 

व्हायरल पोस्टमध्ये दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये उत्पादनाचा कोड 300215 आणि उत्पादनाचे वर्णन COVID-19 Test kits असे केलेले दिसते. खरं तर ते रोगप्रतिकारक उत्पादने आहेत. त्यांचा कोविडशी काही संबंध नाही. 

3. घोटाळा झाला रे…

या नव्या नामावलीमुळे कोविडविषयी थोतांड पसरविणाऱ्यांना आयते कोलितच मिळाले. WITS च्या वेबसाईटवरील माहितीचे स्कीनशॉट काढून कोविड येणार हे पहिल्यापासूनच माहित होते असा अपप्रचार केला जाऊ लागला.

हे प्रकरण वाढू लागल्यानंतर 8 सप्टेंबर 2020 रोजी जागतिक बँकेने नामावलीमध्ये सुधारणा करीत याविषयी खुलासा केला. 

मूळ परिपत्रक येते वाचा – जागतिक बँक

“डिसेंबर 2019 पूर्वी कोविड महामारी येणार याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे त्याआधी कोविड-19 टेस्ट किट्स तयार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोविडविषयी उत्पादनांची माहिती चटकन आणि एकाच ठिकाणी मिळावी म्हणून मार्चमध्ये बदलण्यात आला होता. परंतु, त्याचा चुकीचा अर्थ निघत असल्यामुळे नामावली आणि WITS वेबसाईटवरील डेटामध्ये बदल करण्यात आला आहे जेणेकरून संभ्रम निर्माण होऊ नये,” असे जागतिक बँकेने म्हटले.

4. सुधारित माहिती

आता COVID-19 Test kits हे नाव बदलून Medical Tests असे करण्यात आले आहे. 

नवीन नामावलीमुळे आता 300215 कोडची उत्पादने आता Medical Tests अंतर्गत दर्शविली जात आहेत.

मूळ डेटा – WITS 2017

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, नामावलीच्या बदलामुळे हा संपूर्ण घोटाळा झाला होता. वैद्यकीय उत्पादनांना सरसकट कोविड-19 किट्स असे वर्गीकरण केल्यामुळे जुन्या डेटामध्येसुद्धा कोविडचे नाव गेले. परंतु, आता नामावलीमध्ये सुधारणा केलेली आहे. त्यामुळे कोविड-19 विषयी जगाला आधीच माहित होते आणि त्यांनी 2017 सालीच कोविड-19 टेस्ट किट्स खरेदी केल्या हा दावा असत्य आहे.

Avatar

Title:कोविड-19 टेस्ट किट्सची 2017 पासूनच विक्री सुरू झाली होती का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False