‘उद्धव ठाकरे पळून गेले’: एबीपी माझाच्या नावाने बनावट ग्राफिक कार्ड व्हायरल, वाचा सत्य

False राजकीय

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रामधील ठाकरे आणि शिंदे गटाच्या सत्ता संघर्षावर आपला निर्णय देताना सांगितले की, उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणी करण्याचे राज्यपालांचे निर्देश बेकायदेशीर होता; परंतु ठाकरेंनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याने त्यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करता येणार नाही. 

या पर्श्वभूमीवर एबीपी माझाचा लोगो वापरून दावा केला जात आहे की, “उद्धव ठाकरे स्वत: पळून गेल्याने त्यांचे सरकार पुन्हा स्थापन होऊ शकत नाही,” असे ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट आहे.

काय आहे दावा ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटोसह ग्राफिक कार्डमध्ये लिहिलेले आहे की, “महाराष्ट्राचा माहानिकाल – उद्धव ठाकरे स्वत: पळून गेल्याने त्यांचे सरकार पुन्हा स्थापन होऊ शकत नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम एबीपी माझा यांनी खरंच अशी पोस्ट केली आहे का ? याची पडताळणी केल्यावर कळाले की, एबीपी माझाच्या सोशल मीडियापेजवर वेगळेच ग्राफिक कार्ड आढळले.

यात म्हटले आहे की, “उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं; सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य.”

फॅक्ट क्रेसेंडोने ‘एबीपी माझा’चे सोशल मीडिया प्रमुख मेघराज पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट आहे. तसेच ‘एबीपी माझा’ने ‘उद्धव ठाकरे स्वत: पळून गेले’ अशी कोणतीही बातमी सोशल मीडियावर शेअर केलेली नाही.

व्हायरल ग्राफिक हे लाल रंगाचे असून एबीपी माझाचे अधिकृत ग्राफिक काळ्या रंगाचे आहे. यावरून दोघांमधील फरकही लक्षात येते. 

मूळ पोस्ट – फेसबुक

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार निघून गेले होते. शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार देऊन सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा दिला. 

दरम्यान, तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला बहुमत चाचणीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविला. 

तसेच “जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणलं असतं,” असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

कोश्यारी यांच्याभूमिकेवर प्रश्न चिन्ह उभारताना कोर्टाने म्हटले की, “राज्यपालांपुढे बहुमत चाचणी बोलावण्यासारखी वस्तुनिष्ठ स्थिती नव्हती. कोणत्याही पक्षात अंतर्गत दुफळी निर्माण झाली असली, तरी राज्यपालांनी त्या राजकीय क्षेत्रात शिरकाव करणे, हे राज्यघटनेतील तरतुदींना अभिप्रेत नाही,” संपूर्ण बातमी आपण येथे पाहू शकतात.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट आहे. एबीपी माझाचे लोगो लावून फेक ग्राफिक तयार करण्यात आले आहेत. खोट्या दाव्यासह हे ग्राफिक व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:‘उद्धव ठाकरे पळून गेले’: एबीपी माझाच्या नावाने बनावट ग्राफिक कार्ड व्हायरल, वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False


Leave a Reply