Fact Check : वृक्षतोडीचे हे छायाचित्र मुंबईतील आरे कॉलनीतील आहे का?

False राजकीय | Political सामाजिक

आरेतील उर्वरीत वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टाने तूर्तास स्थगिती दिली आहे. आरेतील वृक्षतोडीचा विरोध केल्याप्रकरणी अटक केलेल्या आंदोलकांना सोडण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, असे असतानाच आरे कॉलनीतील वृक्षतोडीचा आणि आरेचे पक्षी बेघर म्हणून काही छायाचित्रे सध्या समाजमाध्यमात पसरत आहेत. असेच एक छायाचित्र Sunil Jadhav यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहे. हे छायाचित्र ‘आरे’त करण्यात आलेल्या वृक्षतोडीचे आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

फेसबुकवरील मूळ पोस्ट

वेगवेगळे दावे करत हे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करण्यात येत असल्याचे आपण खाली पाहू शकता. आरे हा हॅशटॅग वापरुनही हे छायाचित्र पोस्ट करण्यात येत आहे. माध्यमांनी मुद्दामच आरेचे हे छायाचित्र प्रसिध्द न केल्याचा दावाही काहीजण करत आहेत. 

तथ्य पडताळणी 

आरे कॉलनीतील हे छायाचित्र आहे का, हे शोधण्यासाठी आम्ही हे छायाचित्र रिव्हर्स सर्च केले. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला. 

या परिणामात आम्हाला राष्ट्रबोध या नियतकालिकाचा जून 2016 मधील एक अंक दिसून आला. या अंकाच्या मुखपृष्ठावर हेच छायाचित्र वापरल्याचे दिसून येते. आपण राष्ट्रबोधच्या या अंकाचे मुखपृष्ठ खाली पाहू शकता.  

हे छायाचित्र आरे कॉलनीतील नसून दुसरे कुठले तरी असल्याचे आणि ते जुने असल्याचे सिध्द होत असले तरी ते नेमके कुठले आणि कधीचे आहे हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी propelsteps.wordpress.com या ठिकाणी हे छायाचित्र जानेवारी 2014 मध्ये प्रकाशित करण्यात आले असल्याचे आम्हाला दिसून आले. 

जानेवारी 2013 मध्येही एका तामिळ ब्लॉगवर हे छायाचित्र दिसून येते. बंगाली भाषेतील एका ब्लॉगवरही जुलै 2012 मध्ये हे छायाचित्र दिसून येते. आमच्या संशोधनात हे छायाचित्र नेमके कुठले आहे आणि ते कधी घेण्यात आले ही बाब स्पष्ट झाली नाही. हे छायाचित्र जुने असल्याचे आणि ते मुंबईतील आरे कॉलनीतील नसल्याचे स्पष्ट झाले.

निष्कर्ष 

मुंबईतील आरे कॉलनीत नुकत्याच करण्यात आलेल्या वृक्षतोडीचे हे छायाचित्र नाही. हे छायाचित्र जुने म्हणजेच ऑगस्ट 2012 पुर्वीचे आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : वृक्षतोडीचे हे छायाचित्र मुंबईतील आरे कॉलनीतील आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False