
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीतून धक्कादायक पराभव झाला. भाजपच्या स्मृती ईराणी यांनी त्यांना मात दिली. मात्र, राहुल गांधी केरळमधील वायनाड येथूनदेखील निवडणूक लढविली आणि जिंकलीसुद्धा. सोशल मीडियावर एक फोटो पसरवली जात असून यामध्ये कार्यकर्ते हिरवे झेंडे घेऊन जल्लोष करताना दिसतात. हा फोटो राहुल गांधीच्या विजयानंतर वायनाड येथे साजरा करण्यात आलेल्या विजयोत्सवाचा म्हटले आहे. शिवाय फोटोत काँग्रेसचा झेंडादेखील गायब असल्याचे निदर्शनात आणून दिले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली आहे.
काय आहे पोस्टमध्ये
पोस्टमध्ये हाती हिरवे झेंडे घेऊन जल्लोष करणारे कार्यकर्ते दिसतात. या फोटोला कॅप्शन दिली की, वायनाडमध्ये राहुल गांधीचा विजयानंतरची दृश्य. एक जरी तिरंगा झेंडा सापडून दाखवा. बक्षीस मिळवा.
तथ्य पडताळणी
पोस्टमधील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर वेगळेच तथ्य समोर येते. द हिंदू दैनिकाच्या वेबसाईटवरील एका लेखात हुबेहुब असाच फोटो दिलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पी. के. कुन्हालीकुट्टी यांच्या केरळमधील मल्लापुरम मतदारसंघातील लोकसभेच्या पोटनिवडणूकीतील विजयासंदर्भात हा लेख 17 एप्रिल 2017 रोजी प्रसिद्ध झाला होता. बातमीतील कॅप्शननुसार, हा फोटो मल्लापुरम जंक्शन येथे आययूएमएलचा विजयोत्सव साजरा करतानाचा आहे.

मूळ बातमी येथ वाचा – द हिंदू । अर्काइव्ह
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, काँग्रेस-युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट पुरस्कृत मुस्लिम लीगचे उमेदवार कुन्हालकुट्टी यांनी 1.7 लाख मताधिक्याने 17 एप्रिल 2017 रोजी मल्लापुरम पोटनिवडणूक जिंकली होती. त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पुरस्कृत एलडीएफचे एम. बी. फैसल यांचा दारुण पराभव केला होता. मुस्लिम लीगचा बालेकिल्ला म्हणून मल्लापुरम ओळखले जाते.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया । अर्काइव्ह
याचाच अर्थ की, सदरील फोटो दोन वर्षांपूर्वीचा आहे. तसेच तो वायनाड येथील नसून मल्लापुरम येथील आहे. हा फोटो नेमका कुठे घेतला याचा आम्ही शोध घेतला. तेव्हा असे कळाले की, हा फोटो मल्लापुरम शहरातील अप हिल भागातील मनोरमा सर्कल येथील आहे. खाली एम्बेड केलेल्या गुगल मॅपमध्ये हा चौक तुम्ही पाहू शकता.
गुगल इमेजेसवर शहुल्हाहमीद मुनीस या युजरने एप्रिल 2017 साली मनोरमा सर्कल येथील एक फोटो शेयर केला होता. त्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोची तुलना केल्यावर हे सिद्ध होते की, हे फोटो जूने असून वायनाड येथील नाही. वायनाड आणि मल्लापुरम यामध्ये 110 किमी अंतर आहे.

निष्कर्ष
सोशल मीडियावरील व्हायरल फोटो राहुल गांधी यांच्या विजयानंतर हिरवे झेंडे घेऊन वायनाड येथे करण्यात आलेल्या जल्लोषाचे नाही. तो फोटो दोन वर्षांपूर्वी मल्लापुरम येथील मुस्लिम लीगच्या विजयोत्सवाचा आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:PHOTO FACT: हा फोटो राहुल गांधींच्या विजयानंतर वायनाड येथे केलेल्या जल्लोषाचा नाही
Fact Check By: Mayur DepkarResult: False
