पेट्रोल पंपावर आग लागल्याचा ‘तो’ व्हायरल व्हिडियो राजस्थानमधील आहे; महाराष्ट्रातील नाही

False सामाजिक

पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरताना आग लागल्याचा एक व्हिडियो प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडियो महाराष्ट्रातील विविध शहरांच्या नावांनी शेयर केला जात आहे. कोणी हा व्हिडियो औरंगाबादजवळील किनगाव येथील म्हणतेय तर कोणी भोकर, अहमदनगर, जळगाव, नेवासा येथील पेट्रोल पंपावर घडलेली घटना म्हणून दावा करीत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली असता हा व्हिडियो राजस्थानमधील असल्याचे समोर आले आहे.

काय आहे व्हिडियो?

48 सेकंदाच्या क्लिपमध्ये दिसते की, दुचाकीमध्ये पेट्रोल भरताना आग पेट घेते. पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून लगेच ती आग विझवली. हा व्हिडियो शेयर करताना लिहिले जातेय की, किनगांव येथील पंपावर घडलेली घटना गाडीवर सॅनीटायझर लाऊ नये व चावीला पण लाऊ नये.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

एकच व्हिडियो वेगवेगळ्या शहरांच्या नावे फिरत असल्यामुळे तो नेमका कुठला आहे हे निश्चित करणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम व्हिडियोतील की-फ्रेम निवडून रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा न्यूजफ्लेयर नावाच्या व्हिडियो सर्व्हिस वेबसाईटवर हा व्हिडियो आढळला. त्यांनी हा व्हिडियो राजस्थानमधील चिडवा गावातील असल्याचे म्हटले आहे. 24 जुलै रोजी ही घटना घडली होती. अमर उजालानेसुद्धा हीच माहिती दिली.

त्याआधारे शोध घेतला असता राजस्थानमधील एका लोकल न्यूज चॅनेलवरील पुढील व्हिडियो आढळला. त्यातही हा व्हिडियो राजस्थानच्या झुंझुनूमधील चिडवा गावातील पेट्रोलपंपावरील असल्याचे म्हटले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने चिडवा पोलिस ठाण्याचे एसएसओ लक्ष्मीनारायण सैनी यांच्याशी संपर्क साधला. ही घटना चिडवा गावात घडली होती, असा त्यांनी दुजोरा दिला. घटनेत कोणतेही नुकसान झाले नव्हते. त्यामुळे ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली नाही.

तेथील रेल्वे स्टेशन रोडवरस्थित सरदार फिलिंग स्टेशन नामक पंपावर ही घटना घडली होती. त्याचे मालक सुरेंद्र राव यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले की, हा व्हिडियो त्यांच्याच पंपाचा आहे. 24 जुलै रोजी अचानक ही आग लागली होती. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. 

सॅनिटायझरमुळे ही आग लागली होती का?

सुरेंद्र यांनी सांगितले की, आगीचे नेमके कारण काय हे कळाले नाही. भारत पेट्रोलियमच्या तज्ज्ञांनी तपासणीसुद्धा केली. परंतु, सॅनिटायझरमुळे आग लागली असे म्हणू शकत नाही.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, हा व्हिडियो राजस्थानमधील चिडवा येथील आहे. तो चुकीच्या माहितीसह महाराष्ट्राच्या विविध शहरांच्या नावे व्हायरल होत आहे.

Avatar

Title:पेट्रोल पंपावर आग लागल्याचा ‘तो’ व्हायरल व्हिडियो राजस्थानमधील आहे; महाराष्ट्रातील नाही

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False